हे संबोधन मी १९८२ पासून ऐकत आलोय.
बजाज ऑटो मधील एका गुरुवारच्या सुट्टीत आम्ही मित्र-मित्र गेलो होतो बालगंधर्वला ! तेथील कलादालनात “काव्य-चित्र ” प्रदर्शन अशी पाटी दिसली म्हणून आम्ही उत्सुकतेने घुसलो. अनेक नामवंत मराठी कवींच्या काव्य ओळींचे चित्रातून हृदगत मांडलेले दृष्टीस पडले. हा प्रकारच अनोखा होता आणि काव्याचे असे interpretation आम्हांला नवे वाटले.
सहज चित्रकाराचा शोध घेतला आणि कोपऱ्यात एक गंभीर गृहस्थ (ते आजतागायत गंभीर मुद्रेनेच वावरत असतात) दिसले. हेच श्री शिरीष घाटे – जोडणारा मुद्दा म्हणजे सोलापूर, अर्थात “गांववाले ! ”
गप्पांच्या वाटेने ओळख आणि शेवटी दोस्ती झाली. तिला आता चाळीस वर्षे होऊन गेली. सोलापुरातील अत्यल्प वास्तव्यात जिवलग झालेला वर्गमित्र – राजेंद्र गांधी आणि आजपर्यंतचा टिकलेला दुसरा जिवलग-शिरीष ! ही माझी अभिमानास्पद जमापूंजी !
नंतर मैत्रीला आम्हीं थोडं वेगळं परिमाण दिलं. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या पुस्तकांची मुखपृष्ठे शिरीष ने बनवायची असा प्रघात झाला. माझ्या येथवरच्या अकरा पुस्तकांपैकी नऊ आणि माझ्या पत्नीची सहा पुस्तके शिरीषची मुखपृष्ठे मिरवीत आहेत. बरेचदा माझी त्याच्या मुशाफिरीच्या क्षेत्रात लुडबुड ( मुखपृष्ठाचे संकल्पन, आकृती अशी काहीतरी) असते. तो ती शांतपणे खपवून घेतो आणि माझ्याशी मिळत्या-जुळत्या संरेखनावर स्थिरावतो. बरेचदा मला त्याची दोन-तीन रेखाटने हवी असतात आणि त्यातून एकाचा पोत /दुसऱ्याची रंगसंगती असं काहीतरी फायनल करायचे असते. तो त्या आग्रहालाही बळी पडतो. माझा फोन गेला की पलीकडून “बोल मित्रा ” हे शब्द कानी पडतात. कधीतरी तो सोलापुरातील लहरी पाणीपुरवठ्यावर अवलंबून असतो म्हणून उत्तरत नाही आणि नंतर इमानेइतबारे खुलासेवजा फोनतो.
मुखपृष्ठाबद्दलची माझी घायकुती तो समर्थपणे परतवून लावतो आणि व्हाट्सअप वर एक गुलाबाचे फूल टाकतो. ( जो अर्थ काढायचा तो काढ !).
पण कधीच तोंडघशी पाडत नाही. ठरलेल्या वेळेच्या किंचित अलीकडे-पलीकडे त्याचे काम माझ्याकडे पोहोचते. बँक खात्यात पाठविलेल्या पैशाची आठवण करून दिली की किंचित त्रासिकपणे म्हणतो- ” मी बघत नाही रे, खात्यात पैसे जमा झालेत की नाहीत ते ! ”
खूपदा तर मी मनानेच त्याचे मानधन पाठविले पण त्यांवर त्याने कधीच प्रतिक्रिया दिली नाही. सोलापूरच्या प्रत्येक फेरीत त्याच्याशी भेट मस्ट ! एकदा त्याच्या घरीही जाऊन आलोय आणि फिट्टमफाट म्हणून एकदाच तोही माझ्या पुण्यातील घरी आलाय. बरेचदा सोलापुरात मी असलेल्या हॉटेलवर माझ्या मुक्कामाचा अदमास घेत आम्ही भेटलोय- तेही रिसेप्शनवरून आल्याची वर्दी देणारा फोन या शिरस्त्यानुसार ! क्वचितच रूममध्ये गप्पांचा बार (?). एकदा तर पठ्या पायाला पट्टी आणि लंगडत वगैरे हॉटेलवर भेटायला आला -मला त्याची काहीही माहिती न देता. मलाच कानकोंड्यासारखे झाले होते तेव्हा !
दोन-तीन प्रसंग –
(१) माझ्या पत्नीने माझ्या सासऱ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांवर आधारीत पुस्तक लिहिले. त्यावेळी मी पुण्याहून सांगली आणि तो सोलापुरातून सांगली अशी दोन दिवस भेट झाली. माझ्या सासऱ्यांच्या विविध शाळांना आम्ही भेटी देत ते फोटो सेशन केले. माझ्या सासऱ्यांचेही अनेक फोटो आम्ही काढले आणि या सर्वांची मस्त रेखाटने त्या पुस्तकात समाविष्ट झाली (मुखपृष्ठ वेगळेच).
(२) आमच्या हरीभाईच्या स्नेहमेळाव्याची स्मरणिका काढताना २०२० साली आम्ही त्याला असेच सतावले पण त्याने नेहेमीचेच अप्रतिम काम केले. त्याची स्मरणिकेची प्रत त्याने collect केली की नाही मला अजून माहिती नाही.(ही उदासीनता म्हणू की तटस्थता/अलिप्तता, पण ” चित्रवाटा” या पुस्तकाच्या बाबतीत आमचे नुकतेच बोलणे झाले तेव्हा तो सहजगत्या म्हणाला- “हजाराहून मुखपृष्ठे नक्कीच केली आहेत पण माझ्याकडे फारशी जतन करून ठेवलेली नाहीत ‘).
मध्यंतरी मी सोलापूरला त्याची स्मरणिकेची प्रत आठवणीने नेलेली,पण त्या भेटीत शिरीष “आजोबा” नव्या भूमिकेत गुंग असल्याने आमची भेट झाली नाही.त्याहीवेळी ” मी घेऊन जाईन रे हॉटेलवरून ” हेच उत्तर.
(३) माझे “गुलज़ार ” वरील त्रैभाषिक पुस्तक ऐन कोरोना काळातील. त्याने सोलापुरात DTP करून घेतले, मुखपृष्ठ केले आणि गुलजारच्या सोळा चित्रपटांवरील सुंदर सोळा रेखाटने त्या पुस्तकाच्या परडीत टाकली.
आता त्याच्या “चित्रवाटा ” स्वयंभू प्रकाशाने उजळल्या आहेत. मी प्रत नोंदवली तर ” आधी हाती तर येऊ दे पुस्तक ” म्हणून मला तिष्ठत ठेवलंय. त्याच्या चित्रवाटा आमच्या गल्लीतून गेल्या आहेत कां याची उत्सुकता आहे.
मित्र विवेक नगरकरने शिरीषच्या पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची स्मृती चित्रे थोड्या वेळापूर्वी पाठविली आणि त्यासाठी मुद्दाम थकवलेली ही पोस्ट मी आता शेअर करतोय.
आता “बोल मित्रा ! “- तुझी पाळी आलीय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply