भारतीय सिनेमाचा जस जसा प्रेक्षक वर्ग दाद देऊ लागला तसा चित्रपटांचा आलेख सर्वार्थाने उंचावत गेला, आणि मग संहिता, आशय-विषय यावर आपसूकच प्रभाव पडला, कारण बदलाचे वारे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, राष्ट्र प्रधान कडून प्रेमाची, भावनिक साद घालणार्या चित्रपटांकडे सरकले. हळुहळू मराठी चित्रपटांवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसू लागला, तसंच जेव्हा “सो कॉल्ड बोल्ड विषय” ज्यासाठी आपला प्रेक्षक अगदी नवखा होता, असे विषय जेव्हा ७० mm च्या पडद्यावर अवतरले त्यावेळी प्रेक्षकवर्गाकडूनच टिका झाली. पण, विरोध करणारा हाच प्रेक्षक वर्ग अगदी आवडीनं “अशा विषयांचा आस्वाद” घेऊ लागला, तेव्हा मात्र “बोल्ड विषयांचा सिलसिला” सुरु झाला. मराठीत ही बोल्ड विषय आले, पण त्यामध्ये “अर्थहीन दृश्य” नव्हती. जर बोल्ड सीन्स किंवा विषय असतील तर त्याची मांडणी, अशा रीतीने व्हायची की त्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन होईल पण खूप काही शिकता येईल. अशा चित्रपटांना सामाजिक तर कधी कौटुंबिक पार्श्वभूमी असायची; चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांच्या ही लक्षात येत असे की अशी दृश्य, ही चित्रपटाच्या कथा, पटकथानुसार व दिग्दर्शकीय कौशल्यानुसार अगदी समर्पकच होती, म्हणूनच असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणि अनेक चित्रपट महोत्सवामध्ये लोकप्रिय ठरले. त्यापैकी बर्याच चित्रपटांनी राष्ट्रीय पातळीच्या पुरस्कारांवर मोहोर ही उमटवली होती.
सर्वप्रथम तर १९३७ रोजी प्रदर्शित झालेल्या ब्रम्हचारी चित्रपटामध्ये त्याकाळची नायिका मीनाक्षी शिरोडकर यांनी बिकनी कॉश्च्युम वर मास्टर विनायकांसोबत एक गाणं ही साकारलं आहे, पण त्या गाण्याचा हेतू हा नायिकेच्या कपड्यांवर “फोकस” करण्याचा नव्हता तर नायकाची, मानसिकतेत चल-बिचलता होऊ शकते का? हा उद्देश होता; तरीही सिनेमा या प्रसंगामुळे गाजला, अर्थातच दमदार विषयामुळेच.
“जैत रे जैत” व अलिकडच्या काळात प्रदर्शित झालेला “अजिंठा” ज्यामध्ये नायिकांनी (म्हणजे “जैत रे जैत” मध्ये स्मीता पाटील तर अंजिठा मध्ये सोनाली कुलकर्णी) स्वत:ला बर्यापैकी एक्सपोज केलं आहे, पण त्या व्यक्तिरेखाच मुळात तशा होत्या, एका वर्गाचं प्रतिनिधीत्व करणार्या; म्हणून त्यांच्या अभिनयात किंवा वेशभूषेत जराही कृत्रिमता न वाटता उलट हुबेहूब व्यक्तिरेखा साकारल्यात असंच म्हणावं लागेल.
“सनई चौघडे” मधून कुमारी माता आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या याबर, अगदी नेमक्या विषयावर बोट ठेवण्यात आलं; तर “लिव्ह-इन-रिलेशनशिप” वर आधारित मणी-मंगळसूत्र या चित्रपटातनं प्रेमाची व्याख्या, अधिक अधोरेखीत करुन, वेगळ्या अंगांनी अनेक बदलत्या नात्यांवर भाष्य होतं.
“सेक्स” हा विषय मराठी सिनेमांना नवीन नाही; पण समलैंगिकता यावर कधी फारसं कधी, कुठे बोललं जात नाही., याच विषयाला अनुसरुन “थांग” हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला. फारशी पब्लिसीटी आणि लोकांपर्यंत हा चित्रपट मात्र पोहोचलाच नाही. तरीही “गे सेक्स” वर दिग्दर्शकांनी अनेक पैलू उघडले आहेत.
खरंतर, अनेक “ग्लॅमरस” हिरॉइन्स वर मराठी चित्रपटांमध्ये आवश्यकतेनुसार किंवा आवश्यकतेपेक्षा ही कमी-जास्त प्रमाणात तसे सिन्स चित्रपटात दाखवण्यात आले आहेत, पण फारसा बोध किंवा नवीन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न झालाच नाही, म्हणूनच असे सिनेमे लक्षात ही रहात नाही, “नो एंट्री”, “अशाच एका बेटावर”, “ती रात्र”, “कुणासाठी कुणीतरी”, किंवा “दुभंग” मधून काही सिन्स दाखवले असूनही मराठी चित्रपट रसिकांनी सपशेल नाकारले.
खरंतर अशा बोल्ड चित्रपटांची प्रेक्षकांना सवय झाली आहे. पण चित्रपटाच्या मागणीनुसार आणि उत्तम कलाकारांसह ती जर लोकांच्या (प्रेक्षकांच्या) समोर आली तर, कदाचित त्यामध्ये उथळता वाटणार नाही व दिग्दर्शकीय कौशल्य ही सफल होईल मग तो किती बोल्ड असला तरी बोधकच वाटेल…..!
— सागर मालाडकर
Leave a Reply