आपल्या मराठी बांधवांच्या बोलीभाषेची कुचेष्टा करूं नका.
माझा एक विचार किंवा मत म्हणून लिहितोय. पटतं कां पहा :
आपल्याला माझी एक विनंती आहे कीं कृपया आपल्याच मराठी माणसांची आणि त्यांच्या त्यांच्या बोली भाषेची टवाळी करूं नका.
घरचं ‘पाणी’ शुद्ध आणि हाॅटेलातल्या ग्लासातलं ‘पानी’ अशुद्ध ? मराठीतला तोंच चणा हिंदीत चना होतो…भैय्या, पान्च्य (पांच नव्हे ना !) रुपये का चना देना)….आगला टेशन थाना (ठाणे नव्हे) .. खाना खानेको गये है.. हे जर आपण चालवून घेतो तर आपल्याच मराठी माणसांचे कांही आपल्याला न पटणारे उच्चार चालवून घ्यायला काय हरकत आहे ? ती त्यांची बोली भाषा असेल तर असूंदे. त्यांची इतकी टवाळी कां करावी ?
प्रमाण, लिखित भाषा वेगळी आणि बोली भाषा वेगळी. आपलीच बोली शुद्ध आणि त्यांची (म्हणजे नक्की कोणा कोणाची आणि कुठली कुठली) अशुद्ध, हे असं कसं ? नुकसान, नुसकान कीं लुस्कान ? चिकटवणे कीं चिटकवणे ? बादली कीं बालदी ? यांतलं शुद्ध अशुद्ध आपण कोण ठरवणार ? आपल्याला तो अधिकार आहे कां ? शिवाय वाक्प्रचार हा भाग आणखी वेगळा आहे. पाव्हण्यांना ‘घालवून’ येतो बरोबर कीं ‘पोंचवून’ येतो बरोबर ? बहिणाबाईंच्या ओव्या उद्यां जर कोणी तथाकथित शुद्ध मराठीत (म्हणजे नक्की कोणत्या) बदलून लिहिल्या तर त्यांची गंमतच जाईल. यावर खूप लिहितां येईल. कुठे तो ‘म्हणाला’ असं म्हणतात तर पुण्याच्या बाजूला तो ‘म्हणला’ म्हणतात. कोणतं बरोबर ? चिपळूण रत्नागिरी पट्ट्यात जनसामान्यांच्या बोली भाषेत ‘ळ’ चा ‘ल’ होतो तर होऊंद्या, ती त्यांची बोली आहे, बोलूद्यां. म्हणून ‘चिपलूनचा बाल्या’ ‘तलातली नलाकडची खोली’ वगैरे बोलून त्यांची टिंगल टवाळी ? महाराष्ट्रातल्या प्रांताप्रांतातली बोली भाषा वेगळी असते त्यांत तुम्ही कोणत्या कुटुंबात, कोणत्या भागांत वाढलात, शिक्षण, (तुमच्या शिक्षकांची भाषाही) संस्कार त्यावर बरंच कांही अवलंबून असतं.
मुंबईची मिश्र मराठी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, खानदेशी, व-हाडी, नागपुरी, सगळ्या बोली आपल्याच आहेत. त्यांची टवाळी आणि इतकी अवहेलना कशाला ?
एकाच जातीत आणि पोटजातीत सुद्धां प्रांतभेदामुळे फरक जाणवतो. मुंबईत परप्रांतीयांपुढे नांगी टाकून, शेपूट घालून आपली भाषा सोडून ‘त्यांना कळणार नाही’ या चिंतेने आपण हिंदीची चिंधी करतो ते चालतं ? आणि मग आपल्याच माणसांची ते आनी-पानी करतात म्हणून आपणच कुचेष्टा कां करावी ? ती फुलराणी मध्ये पुलं विचारतात ना, कीं व्हता जर अशुद्ध तर नव्हता शुद्ध कसं ?
एका बाजूला म्हणायचं ‘लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी’ (नक्की कुठली मराठी ?) आणि दुस-या बाजूला विविध भागातल्या आपल्याच मराठी माणसांच्या आनी-पानीची टवाळी ?
कृपया हे थांबवावं अशी माझी सर्वांना नम्र सूचना आहे.
— सुभाष जोशी, ठाणे
Leave a Reply