आज १३ ऑक्टोबर.. आज बॉलिवूडच्या रूपेरी पडद्यावर सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट ठरलेली आई निरूपा रॉय यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९३१ रोजी झाला.
बॉलिवूडमधील आईची भूमिका म्हणजे निरुपा रॉय आणि निरुपा रॉय म्हणजे रुपेरी पडद्यावरील आई, हे चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे समिकरणच झाले होते.
निरूपा रॉय यांचे शिक्षण जेमतेम ४ थी पर्यंत झाले होते आणि वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांचे कमल रॉय यांच्यासोबत लग्न झाले. प्रसिध्द अभिनेत्री शामासोबत त्यांची चांगली मैत्री होती, ज्यांच्यामुळे निरूपा यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याची संधी मिळाली. निरूपा रॉय यांनी फिल्मी करिअरची सुरवात १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुणसुंदरी’ या गुजराती सिनेमामधून केली. ‘हमारी मंजिल’ या सिनेमामधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. १९५१ मध्ये त्यांचा ‘हर हर महादेव’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पार्वतीची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या यशानंतर त्या प्रेक्षकामध्ये देवीच्या रुपात प्रसिध्द झाल्या. याचदरम्यान त्यांनी ‘वीर भीमसेन’ सिनेमामध्ये द्रोपदीची भूमिका साकारली होती. १९५३ मध्ये रिलीज झालेला ‘दो बीघा जमीन’ हा निरुपा रॉय यांचा आवडता सिनेमा आहे. विमल रॉयच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या सिनेमात त्यांनी एका शेतकर-याच्या पत्नीची भूमिका केली होती. या सिनेमासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयचा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
निरुपा रॉय यांनी १९४० आणि १९५० च्या दशकात अनेक धार्मिक सिनेमे केले. देवीची भूमिका केल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांना अधिक पसंत केलं. निरूपा यांनी हिंदी सिनेमांमध्ये जास्तीत जास्त आईच्या भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकेतून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. भारतीय सिनेमामध्ये त्यांनी केलेल्या आईच्या भूमिका आजसुध्दा सर्वांच्या आठवणीत आहेत. ‘दीवार’ सिनेमामधील ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग आजसुध्दा लोकांच्या ओठांवर आहे.
निरुपा रॉय यांना त्यांच्या आयुष्यभराच्या कामगिरीसाठी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
निरूपा रॉय यांचे निधन १३ आक्टोबर २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply