हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म २७ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला.
यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही.
बी. आर. चोप्रा आणि यश चोप्रा हे सख्खे भाऊ. सहायक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांनी आपल्या करिअरला सुरवात केली. १९५९ मध्ये “धूल का फूल‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजेंद्र कुमार व माला सिन्हा या कलाकारांना घेऊन त्यांनी हा चित्रपट बनविला. त्यानंतर “आदमी और इन्सान‘, “धरतीपुत्र‘, “वक्त‘ असे काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. १९६५ मध्ये त्यांचा ‘वक्त’ चित्रपट आला. बॉलीवूडमधील हा पहिला मल्टी स्टार चित्रपट होय. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांना घेऊन बनविलेल्या “दाग‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीत पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. १९७३ मध्ये त्यांनी यशराज चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. “काला पत्थर‘, “चांदनी‘, “लम्हे‘, “दिल तो पागल है‘, “वीर झारा‘, “सिलसिला‘, “डर‘, “रब ने बना दी जोडी‘ अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. तसेच “दीवार‘, “त्रिशूल‘ अशा काही अन्य निर्मात्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्याबरोबर अनेक कलाकारांनी काम केले असले अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते कलाकार होते. “सिलसिला‘साठी त्यांनी अमिताभ बच्चन, जया भादुरी व रेखा यांना एकत्र आणले. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. विविध आणि आकर्षक लोकेशन्स व सुमधुर गाणी ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. दादासाहेब फाळके पुरस्कारासह पद्मभूषण, तसेच अन्य काही पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. यश चोप्रा यांनी पाच दशक चित्रपटसृष्टीवर राज्य केले. यादम्यान त्यांना ६ राष्ट्रीय व ११ फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अतुल्य योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
यश चोप्रा यांचे २१ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply