नवीन लेखन...

बॉलीवूडची मैत्री

बॉलीवूड मधे मैत्रीवर आधारीत चित्रपट काही कमी नाहीत. नावाजलेले म्हणता येतील असे अनेक चित्रपट म्हणजे अर्थातच शोले, दोस्ती, दोस्ताना, याराना, जंजीर, बेमिसाल ते अलिकडचे कुछ कुछ होता है, अंदाज अपना अपना आणि अर्थात 3 इडियट्स इथे बनलेत व आज ते कल्ट सिनेमे बनलेत. पण मी ज्या तीन चित्रपटांविषयी लिहीणार आहे हे तिन्ही चित्रपट हे मैत्री या विषयाचे वेगळेच पैलु मांडणारे चित्रपट आहेत. मैत्रीला त्यांच्या टिपीकल ‘मित्रासाठी त्याग, बलीदान’ या साच्यातून, stereotype मधून बाहेर काढणारे हे तीन चित्रपट म्हणजे

१. दिल चाहता है (२००१)

२. रॉक ऑन (२००८) आणि

३. जिंदगी ना मिलेगी दुबारा (२०११)

दिल चाहता है

दिल चाहता है हा माझ्या मते बॉलीवूड मधे एक वेगळे बदलाचे वारे घेउन येणारा चित्रपट होता. तोपर्यंत मैत्री या विषयाला बॉलीवूडने एका ठरावीक साच्यात बंदिस्त केले होते. दिल चाहता है ने मैत्री या विषयाला एक अतिशय अफाट आगळा वेगळा आयाम दिला. नवीन सहस्त्रकाच्या पहिल्या वर्षी आलेला हा चित्रपट खऱ्या अर्थाने मिलेनियम जनरेशनसाठीच बनला होता.

तीन अतिशय वेगळ्या स्वभाव वैशिष्ट्य असणारे मित्र..त्यांची घट्ट मैत्री..त्यांचे स्वतःचे प्रेमाविषयीच्या, रिलेशनशिप विषयीच्या वेगवेगळ्या संकल्पना.. त्यांच्या करियरच्या वेगवेगळ्या वाटा. तरीही तिघे एकत्र येतात तेंव्हा ‘मैत्रीचा सोहळा’ सजरा करतात असे हे तीन मित्र.. सिद्धार्थ, समीर आणि आकाश. या तिघांची तो ओपन टाॕप कार मधून गोवा प्रवास हा एक फ्रेंडशिप सिंबॉल बनला..इतका की, वीस वर्षांनी आजही मित्र मिळून गोव्याला असा प्रवास करतात. चित्रपटात मध्यंतरी मित्रांमधे वाद होतात, अबोला येतो..पण तो तात्विक कारणावरुन आहे. ‘एकाच मुलीवर दोघांचे प्रेम’ असा घिसा पिटा मामला नव्हता त्यात. सुरवातीला अवखळ असणारी ही मैत्री, आयुष्याचे व रिलेशनशिपचे अनुभव घेतल्यावर तितकीच मॅच्युअर्ड होते व पुन्हा एकदा गोव्याच्या पार्श्वभूमीवर हे तीन मित्र (आता त्यांच्या नायीकांबरोबर) पुन्हा एकदा एकत्र येतात. Friendship is a celebration असा मैत्रीचा एक वेगळा पैलु ह्या सिनेमाने मांडला व तो आजही अबाधीत आहे असे मला वाटते. दिल चाहता है मधे तो मैत्रीचा एक फ्रेशनेस आहे जो फार कमी चित्रपटात पहायला मिळतो. याचे सारे श्रेय अमीर, सैफ व अक्षय खन्ना या कलाकारांबरोबरच पटकथाकार व दिग्दर्शक फरहान अख्तरला मुख्यतः दिले पाहिजे. आपल्या या पहिल्याच चित्रपटाने फरहानने वेगळीच कमाल केली आहे व म्हणूनच आज दिल चाहता है एक ‘कल्ट’ चित्रपट बनला आहे. पुन्हा तसा चित्रपट बनवणे कदाचित फरहानलाही अवघड जाइल.
शेवटी आकाश या चित्रपटात म्हणतो त्याप्रमाणे ‘वैसे भी परफेक्शन को इंप्रुव्ह करना मुश्कील होता है…’

रॉक ऑन

कॉलेज च्या दिवसात चार मित्रांनी एकत्र येउन बनवलेला रॉक बँड ‘मॅजीक’. यात लिड सिंगर व गिटारीस्ट आदित्य, लिड गिटारीस्ट ज्यो (Joe), कि-बोर्डीस्ट रॉब आणि ड्रमर केदार उर्फ किलर ड्रमर उर्फ के.डी हे चार मित्र. या चार मित्रांच्या संगीत प्रवासाची lost and found पद्धतीने सुरेखा मांडणी या चित्रपटात केली आहे. योगायोगाने हा चित्रपटही फरहान अख्तरने त्याच्या मित्र रितेश सिधवानी बरोबर निर्माण केला होता.

उमेदीच्या काळात चारही मित्र एका रॉक कॉन्टेस्टमधे भाग घेतात, त्यांचे सिलेक्शन होते पण मग आदित्य आणि ज्यो यांच्यात काही गैरसमजातून वाद होतात व ते ह्या कॉन्टेस्टमधून बाहेर पडतात. हा बॕडही त्याच गैरसमजातून विखरतो.
दहा वर्षे गेलीत. आदित्य आता एक यशस्वी इन्वेस्टमेंट बँकर बनला आहे. रॉब छोट्या मोठ्या जिंगल्स बनवत असतो..के.डी ने आपल्या वडिलांच्या ज्वेलरीचे दुकान सांभाळलेले असते तर ज्यो अजूनही किरकोळ कामे करत गुजराण करत असतो. ज्योची बायको डेबी ज्योला जहाजावर गिटारीस्ट म्हणून पाठवण्याची खटपट करत असते. आदित्यची बायको साक्षीला या बँडचे जुने फोटो सापडतात व मग तिला कळते की आपल्या नवऱ्याने आपल्या रॉक संगीताच्या आवडीचा आपल्या करियरसाठी बळी दिलाय. ती चिकाटीने या चौघांना एकत्र आणते व पुन्हा एकदा हे चार मित्र एकत्र येतात. एका कॉन्टेस्ट मधे भाग घेतात..अनेक अडथळ्यांना पार करतात, व ब्रेन ट्यूमरने आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असणाऱ्या रॉब साठी, ते ही स्पर्धा जिंकतात.

मैत्री ही फक्त गंमत मजा यासाठी न मर्यादीत रहाता, एकमेकांचा आधारवड बनू शकते, पडत्याला उभारी देउ शकते व एका ध्येयासाठी सर्वांना एकत्र आणू शकते याचे खूप सुंदर दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. हा सिनेमा व्यवसायीक पातळीवर फार यशस्वी नसला तरी याने समिक्षक व चोखंदळ प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली होती. फरहान (अभिनयात पदार्पण), अर्जून रामपाल, ल्यूक केनी आणि पूरब कोहली यांनी चारही मित्रांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवलीय की हे चारजण खरेच कॉलेजपासून मित्र होते असे वाटत राहते. मैत्रीत आवडत्या गोष्टी एकत्र येउन करायला स्टेटस, वेळ व वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारा चित्रपट होता. यातल्या एका गाण्यात म्हंटलय ते पटतं..
‘रॉक ऑन…है वक्त का इशारा.. रॉक ऑन …हर लम्हा तुम्हारा…’

जिंदगी ना मिलेगी दुबारा

पुन्हा एकदा फरहान व राकेश सिधवानी यांची निर्मीती असलेला व झोया अख्तरने दिग्दर्शीत केलेला हा चित्रपट. फरहानला मैत्री हा विषय किती प्रिय आहे व तो एकाच विषयाला किती वेगवेगळ्या प्रकारे ट्रिटमेंट देउ शकतो हे त्याचे चित्रपट पाहताना पदोपदी जाणवत.

आपापल्या करियरमधे, व्यवसायात व्यस्त असलेले तीन मित्र..कबिर,इमरान आणि अर्जून. कबिरचे नुकते लग्न ठरलय. त्यांनी खूप आधीच एक पॕट (pact) करुन ठरवलेले असते की ज्याचे लग्न आधी ठरेल त्याच्या बॕचलर ट्रिपला ते स्पेन मधे दोन आठवड्यांची एक रोड ट्रिप करतील व प्रत्येकाच्या आवडीनुसार एक असे तीन अॕडवेंचर स्पोर्ट ठरवतील ज्यात बाकी दोघांना भाग घ्यावाच लागेल.

खरं तर हा पूर्ण चित्रपट हा एक प्रवास आहे..रोड वरचा आणि या मित्रांच्या अंतर मनाचाही. अर्जून आणि इम्रान यांच्यामधे पूर्वी एका मुलीवरुन आलेला दुरावा मनात ठेउनच त्यांचा हा प्रवास सुरु होतो. जस जसा हा प्रवास पुढे सरकतो तसा त्यांना आपल्या आयुष्यात आपण बाळगलेले ध्येय किती तोकडे आहेत, किती चुकीचे आहेत हे आपोआप उलगडत जाते. खरी नाती व थोपवलेली नाती यातला फरक जाणवतो. मैत्रीचा नवा पैलू त्यांना दिसतो. कितीही जुना वाद, कटुता असले तरी मित्रच आपल्या अडचणीत उभा राहतो, धीर देतो, समजून घेतो, जवळ घेतो हे त्यांना पुन्हा एकदा उलगडते.
वरवरच्या मैत्री कडून एकमेकांच्या अंतरमनातल्या वेदना समजून घेणाऱ्या मैत्री पर्यंतचा हा प्रवास म्हणजे ‘जिंदगी ना मिलेगी दुबारा’.

तिन्ही चित्रपटांसाठी अप्रतिम गाणी लिहीणारे जावेद अख्तर या चित्रपटासाठी कविताही लिहीतात. त्यांनी लिहिलेली ही कवीता हेच या चित्रपटाचे सारही आहे

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल एक नया समा देखे यह निगाहें
जो अपनी आँखों में हयरानीयाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम

शेवटी मैत्रीही अशीच आहे..असावी…

एक अखंड प्रवासासारखी…

दिलोमें तुम अपनी दोस्तीयां लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम..

— सुनील गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..