|| हरि ॐ ||
आपल्या प्रत्येकाला काहीना काही सवयी व लकबी असतात. बोलण्याच्या ओघात, काहींना आपले मुद्दे मांडतांना व पटवून देताना हातवारे करून सांगण्याची सवय असते तर काहींना दातांने हाताच्या बोटांची नखे कुडतरत बोलण्याची व ऐकण्याची सवय असते. तर काही व्यक्तींना डोळे मिचकावत बोलण्याची सवय असते. असो.
अजूनही बऱ्याच मंडळींची अंधश्रद्धेवरील श्रद्धा कमी झाल्याचे दिसत नाही. उदा. कुठेही वाहन मग ते दोन किंवा चार चाकी असो चालू केल्यावर ते प्रथम काही सेंटीमीटर किंवा इंच पुढेच न्यायचं. याचा अर्थ आपण जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याच्या प्रयत्नात असतो किंवा शुभसूचक मानतो हे वरील उदाहरणात पाहतो. परंतू खालील उदाहरणात सकारात्मक दृष्टीकोन कुठे दिसत नाही.
रेडिओ आणि टीव्ही वाहिन्यांवरील विविध भाषांतील कार्यक्रमाअंतर्गत व बातम्यांच्या अनुषंगाने घेतल्या जाणाऱ्या मुलाखती नीट ऐकल्या व बघितल्या तर त्यात मुलाखत देणारी व्यक्ती आपल्या प्रश्नाचे उत्तर देताना प्रथम सर्रास “नाही” “नाही म्हणजे” किंवा ‘नो’ “नहीं याने” नी सुरवात करताना आढळतात. रोजच्या बोलण्यात काही व्यक्ती वाक्याची सुरवातच नकारात्मक अश्या ‘नाही’ किंवा “नाही म्हणजे” दोन शब्दाने करताना आपण पाहतो व ऐकतो. मग आपला सकारात्मक दृष्टीकोन गेला कुठे?
“नाही म्हणजे” किंवा “नाही” याचा अर्थ काय? तर थोडक्यात, बोलणाऱ्याला असे सांगायचे असते “मला असे वाटते” किंवा “मला असे म्हणावयाचे आहे” पण त्यासाठी “नाही” किंवा “नाही म्हणजे” शब्दांनी वाक्याची सुरवात का करावी लागते. एक तर तो शब्द तोंडात बसला असावा किंवा कोण्या बड्या व्यक्तीने वापरलेल्या शब्दप्रयोगाचा आपल्या मनावरील चुकीचा प्रभाव असावा किंवा डेमॉनस्ट्रेशन इफेक्ट असेल. आपण असेही म्हणू शकतो “हो, बरोबर आहे” किंवा “हो, खरं
आहे” जर का प्रश्नाचे उत्तरच “नाही” किंवा नकारात्मक
असेल तर काही चूक नाही. पण असेही होऊ नये की सर्वच प्रश्नांची उत्तरे “हो, बरोबर आहे” किंवा “हो, खरं आहे”नी करू नये. कारण त्याचा मातीत अर्थ बदलण्याचीही शक्यता असते. जसे प्रश्न तसे उत्तर अपेक्षित असते. असो.
आपण सर्व यापुढे तरी बोलतांना किंवा मुलाखत देतांना “नाही” किंवा “नाही म्हणजे”चा शब्द प्रयोग योग्य जागीच करू किंवा वापरण्याचे भान ठेऊ, ज्याने तरुण पिढीला विशेषत: इंग्रजी माध्यमातील मुलांना व बहुभाषिक मंडळी जे मराठी शिकत असतील त्यांना “नाही” व “नाही म्हणजे” कुठे, केंव्हा व कधी वापरावे हे कळेल. आपण प्रत्येकांनी आपली मातृभाषा समृद्ध होईल याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.
<जगदीश पटवर्धन
<वझिरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply