१९५३ साली हाॅलिवूडचा अप्रतिम कथा असलेला एक क्लासिक चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. त्याचं नाव होतं ‘रोमन हाॅलिडे’! बरोबर ६६ वर्षांनंतर त्या ‘रोमन हाॅलिडे’च्या उलट, एक सत्यकथा मुंबईतील मायानगरीत घडली…
‘रोमन हाॅलिडे’ चित्रपटात राज घराण्यातील राजकन्या आपल्या झगमगाटी, विलासी जीवनाला कंटाळून एक दिवसासाठी सर्वसामान्य जीवनाचा एका पत्रकारासोबत अनुभव घेते. त्याच्या उलट २१ जुलै २०१९ रोजी पश्र्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे प्लॅटफॉर्मवर ‘शोर’ चित्रपटातील लता मंगेशकरचं ‘एक प्यार का नगमा है…’ गाणं गाऊन भिक मागणारी रानू मंडल रातोरात सोशल मीडियाच्या जादूने मुंबईच्या मायानगरीची काही काळासाठी पार्श्वगायिका झाली!
रानूचा जन्म ५ नोव्हेंबर १९६० रोजी पश्र्चिम बंगालमध्ये झाला. तिच्या जन्मानंतर सहा महिन्यांतच ती अनाथ झाली. तिला जवळच्या नातेवाईकांनी सांभाळलं. रानूला लहानपणापासून रेडिओचं आकर्षण होतं. ती लता, आशा, किशोर, मुकेश, महंमद रफी यांची गाणी मन लावून ऐकायची. हीच गाणी ऐकून ऐकून तिला तोंडपाठ झाली. रानू वयात आल्यावर नातेवाईकांनी तिचं एकोणिसाव्या वर्षीच लग्न लावून दिलं. तिला दोन मुलं झाली. काही काळानंतर तिच्या पहिल्या पतीचं निधन झालं.
नंतर तिने बबलू बरोबर लग्न केलं. तो मुंबईत फिरोज खानकडे स्वयंपाकी म्हणून कामाला होता. बबलूपासून तिला एक मुलगी झाली. एकदा रानूच्या आग्रहाखातर फिरोजने तिचे गाणे ऐकले, मात्र त्याला तिच्या गायनकलेचे विशेष कौतुक वाटले नाही. दरम्यान ती मुंबईतील एका क्लबमध्ये गाणी गात असे. तिथे तिला ऐकणारे ‘रानू बाॅबी’ नावाने ओळखत असत. बबलूचे निधन झाल्यानंतर ती मुलीसह पुन्हा बंगालला परतली.
दुर्दैवी परिस्थितीने तिला त्याच राणाघाट रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाणी गाऊन उदरनिर्वाह करण्यास भाग पाडले. तिचे हे वागणे न आवडल्याने लग्न झालेली मुलगी तिला सोडून निघून गेली. आता रानू एकटीच राहू लागली.
२०१९ मध्ये अतिंद्र चक्रवर्ती हा युवक आपल्या मित्रांबरोबर राणाघाटच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर असताना त्याला रेडिओवरचं गाणं ऐकल्याचा भास झाला, त्याने शोध घेतला तेव्हा त्याला रानू गुणगुणत असताना दिसली. त्याने तिचा आवाज ऐकला व ‘एक प्यार का नगमा है….’ या तिच्या गाण्याची आपल्या मोबाईलमध्ये क्लीप तयार केली. फेसबुकवर ती क्लीप लोड केल्यावर चोवीस तासांत पाच मिलियन लाईक्स आले आणि रानू मंडलचे नाव जगभरात झाले.
या प्रसिद्धीमुळे रानूची जनतेकडून प्रशंसा होऊ लागली. तिचा पोटापाण्याचा प्रश्र्न सुटला. जिल्हा प्रशासनाने तिला हर तऱ्हेची मदत करण्याचे आश्वासन दिले. रानूचा आदर्श लता मंगेशकर असल्याने तिला ‘राणाघाटची लता’ असे संबोधले जाऊ लागले.
रानूची लोकप्रियता रिअॅलिटी शो करणाऱ्या हिमेश रेशमियापर्यंत जाऊन पोहोचली. त्याने तिला मुंबईला बोलावून घेतले. त्या शोमध्ये तिचे गाणे ऐकून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. रानू मंडल रातोरात स्टार झाली. अनेक निर्मात्यांनी, संगीतकारांनी रानूकडून आपल्या चित्रपटांसाठी गाणी गाऊन घेणार असल्याचे जाहीर केले.
हिमेशने आपल्या चित्रपटांसाठी तिच्या आवाजात गाणी रेकॉर्ड करुन घेतली. सलमानने तिला फ्लॅट व कार देणार असल्याचे जाहीर केले. प्रसिद्धीमुळे रानूला आसमान ठेंगणे वाटू लागले. तिची ही बातमी ऐकून मुलगी आईला येऊन भेटली. लांब गेलेले नातेवाईक आस्थेने रानूची चौकशी करु लागले.
रानूच्या पेपरमध्ये, चॅनेलवर मुलाखती दिसू लागल्या. तिला शोसाठी, सेलेब्रिटी म्हणून बोलावले जाऊ लागले. परिणामी तिच्या डोक्यात हवा शिरली. ती अहंकारी झाली. एका कार्यक्रमात तिच्याबरोबर सेल्फी काढणाऱ्या महिलेला तिनं झिडकारलं. एका टीव्ही शोमध्ये तिला ‘एक प्यार का…’ गायला सांगितलं तर तिने ते गाणं आठवत नाही असं त्यांना ऐकवलं. एका समारंभात ती गडद मेकअप करुन रॅम्पवर चालली. मुलाखत घेणाऱ्याला मोठ्या आवाजात बोला, मला ऐकू येत नाही असं बोलू लागली. रानूकडे नम्रता नावालाही राहिली नाही.
माणसाला आपल्या कलेचा अभिमान जरुर असावा, मात्र गर्व असू नये. रानूला तेच कळलं नाही.
कोरोनाचं संकट सुरू झालं. संपूर्ण फिल्म इंडस्ट्री शांत झाली. रानूला कोणीही विचारेनासं झालं. दोन तीन महिने चाललेला रानूचा झगमगाट अंधारुन गेला. तिला नाईलाजास्तव राणाघाट स्टेशनकडे परतीचा प्रवासाला निघावं लागलं.
आज रानू पुन्हा प्लॅटफॉर्म नंबर सहावर दिसू लागली आहे. कोरोना हद्दपार झाल्यानंतर कदाचित तिला मुंबईला बोलावून घेतलं जाईलही पण त्यासाठी तिच्या स्वभावात बदल होणे गरजेचे आहे. जर तो झाला नाही तर मायानगरी तिला विसरुन जाईल. ज्यांना तिचा वापर करुन प्रसिध्दी मिळवायची होती, त्यांनी ती मिळवली आहे. इथे अशा अनेक रानू येतात आणि जातात… वक्त, वक्त की बात है…..
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१८-१०-२०.
Leave a Reply