प्राणिमात्रांत सर्वात बुद्धिमान प्राणी मनुष्य असल्याने त्याच्या हाडाची रचनाही अधिक प्रभावी झाली आहे. मनुष्याला जी अनेक सांध्याची साखळी लाभली आहे त्यामुळे तो निरनिराळ्या हालचाली सुलभरीत्या करू शकतो. बसणे, उठणे, धावणे, तसेच हातापायांनी उच्च प्रकारची कामे करू शकतो. अर्थात त्यांच्या मागे मेंदूची प्रेरणा, अक्कल आणि प्रभावी स्नायू यांची मदत आहेच.
माणसाचे हाड हा एक खास भाग आहे. हाडाच्या बाहेरच्या कठीण भागाला बाह्यांग अस्थी असे नाव आहे, तसेच हाडाच्या तील मऊ भागाला (स्पंजी अस्थी) किंवा मऊ हाड किंवा हाडातील गर असे म्हणता येईल. हाडाच्या शरीरातील जागेनुसार आणि वैयक्तिक कामानुसार ही हाडे कमी जास्त टणक तर काही ठिकाणी मऊ बनविलेली असतात. उदा. ज्या हाडावर आपण उभे राहतो त्या पायाच्या सर्वच हाडात कठीण हाडांचे प्रमाण अधिक असते. कारण त्यांना शरीराचे वजन सांभाळायचे असते. तसेच मेंदूला संरक्षण देण्यासाठी कवटीची हाडे अधिक टणक बनविण्यासाठी तेथे कठीण हाडांचे प्रमाण अधिक असते.
त्याविरुद्ध कमरेतील हाड, कण्याचे हाड, फासळ्या यात टणक हाडांचे प्रमाण कमी असते. अर्थात मऊ हाडांचीही खास कामे असतात. ते म्हणजे हाड सांभाळणारी व निर्माण करणारी यंत्रणाच त्यात सामावलेली असते. हे मऊ हाड जर कोणा रोगाने कमी झालं तर माणसाची सर्व हाडे याअभावी मोडकळीस येऊ लागतात व माणसाचा अस्थिभंग कुठेही सहज होऊ शकतो.
हाडाच्या मऊ भागाचेही अनेक रोग आहेत. हाडांचा जंतुर्भाव मऊ भागांत अधिक होतो. कारण तेथे रक्तप्रवाह अधिक असतो व रक्तामार्गे जंतू तेथे सहज पोहोचतात. कठीण हाडात जर जंतुर्भाव झाला तर हाडाच्या उतींचा मृत्यू होतो. हा उतीमृत्यू हाडाचा भाग मग शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो. याउलट मऊ हाडात जंतुर्भाव झाला तर डॉक्टरांनी दिलेली जंतुनाशक औषधे तेथे सहजच पोहोचतात व रुग्ण बरा होतो. कठीण हाडात झालेला कॅन्सर हा अधिक गंभीर स्वरूपाचा असतो. मऊ हाडातला कॅन्सर, कॅन्सरविरोधी औषधे तेथे सहज पोहोचत असल्याने लवकर बरा होऊ शकतो. म्हणूनच कमी घातक समजला जातो.
हाडाचे आकार व आकृती निरनिराळी घडविल्याने अधिक अधिक प्रकारचे सांधे तयार होतात व माणसाची हालचाल अधिक प्रभावी होते.
डॉ. सुशील सबनीस
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply