ही मूळची जपानी पद्धत आहे. बोन म्हणजे लहान, साय म्हणजे झाड. छोट्या कुंडीत झाड वाढवून त्याची मुळे, फांद्या छाटून छोट्या कुंडीला शोभेल असा वेगवेगळा आकार देणे म्हणजे बोनसाय. परंतु ते लावणे, वाढवणे व त्यासाठी झाडाची निवड करणे यामागे मोठे शास्त्र आहे. त्या त्या पद्धतीने ते तयार केले तर कुणीही बोन्साय आपापल्या घरात व घराजवळच्या जागेत वाढवू शकतात व त्याला एक वेगळे असे सौंदर्य आहे. त्यासाठी मात्र विशिष्ट प्रकारचीच झाडे लागतात.
१) बहुवर्षावू असे झाड, कायम हिरवे राहणारे, पानगळ न होणारे झाड,
२) झाडाला भरपूर उपफांद्या फुटू शकतात अशी झाडं निवडावी,
३) स्टर्डी प्लँट, छाटणी ज्याला सहन होवू शकेल असे झाड, निरोगी, टवटवीत रोप, रोपाला बोन्साय करताना भरपूर मुळ्या फुटलेल्या असाव्या, तसेच बर्याच फांद्या व पाने आलेली असावी, त्याच्या फांद्या, खोड व पानं हेच याचे सौंदर्य असते. त्यामुळे बारीक, जाडसर, लुसलुशीत चमकदार पान असलेलं झाड निवडावं. झाडाचा बुंधा म्हणजे खोड भक्कम, दणकट व जाड असावे. बोन्साय मध्ये झाडाला रोगट अथवा मलूल करायचे नसते तर टवटवीत व रसरशीत करायचे असते. म्हणून पाम वर्गीय झाड नको.
खुजी झाडं आधी शोधून ती साध्या कुंडीत आधी काही दिवस सेट करावी आणि नंतर बोन्सायच्या कुंडीत लावावी. यासाठी झाडं निवडताना – गुलमोहोर, चिच, आवळा, वड, पिपळ, नारिगी, आंबा, फायकस, स्नोबुश, कुफीया, जेड, अरालिया, अॅडेनियम, ज्युनिफर, नारिगी, चायनीज, बोगनवेलिया, उंबर इत्यादी जाड बुंध्याची, भरपूर फांद्या असलेली, छोट्या पानांची झाडं यासाठी निवडावी. ती ‘पेरेनिल‘ असावी म्हणजे सिझनल नकोत. झाडांना बोनसाय रूप देण्याच्या दोन पद्धती आहेत.
१) बोनसायसाठी मुद्दाम खुजवलेले रोप घेऊन ते अरुंद व उथळ कुंडीत किवा जागेत लावावे. अरुंद जागेत लावल्यामुळे त्याची मुळं पसरणार नाहीत. आणि झाड उंच वाढणार नाही. एखाद्या रोपाची वाढ सावकाश होत असेल तर त्याच्या फांद्या आकर्षक पद्धतीने कापा. ही साधी व सोपी पद्धत.
२) या दुसर्या पद्धतीत बोनसाय तयार करताना जरा मेहनत घ्यावी लागते. आठ ते दहा इंच उंच आणि बारा ते पंधरा इंच रुंद कुंडी घ्यावी. उथळ परळ वजा कुंडी, मातीची सिरॅमिक्सची किवा बोन चायनाची कुंडी यासाठी वापरावी. कुंडीच्या बुडाला मध्यभागी दोन भोकं असावीत.
कुंडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
१) उथळ कुंडी, तांब्याची तार, प्लॅस्टिकची जाळी, चाळण्या चार प्रकारच्या, पकड, कटर, कात्री.
१) विटांचा चुरा चार प्रकारचा – मोठा, मध्यम, बारीक, त्यापेक्षा बारीक.
२) तशीच पोयटा माती चार चाळण्यातून चाळलेली.
३) शेणखत – तेही चार प्रकारच्या चाळण्यातून चाळलेले वेगवेगळे गंज करून ठेवावे. तांब्याचीच तार कुंडी भरताना वापरावी म्हणजे ती गंजत नाही व व्यवस्थित वाकते, पाहिजे तेवढी ताठ किवा कडक राहते. ही तार तुटत नसल्यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येते.
बोनसायची कुंडी उथळ असल्यामुळे ते झाड तारेने बांधून ठेवावे लागते. शिवाय तारेमुळे झाडाला आपण हवे त्या दिशेने वाकवून त्याला योग्य असा आकार देऊ शकतो. बोनसायची कुंडी उथळच असावी. बुंधा जाड असलेले कोठलेही झाड त्यात छान दिसते. नारळ किवा पामवर्गीय झाड या प्रकारासाठी चालत नाही. बोनसायसाठी तीन प्रकारचे मिक्श्चर लागते. जाड, मध्यम आणि बारीक पोयटा माती * कुजलेले शेणखत * विटांचे तुकडे. चार प्रकारच्या चाळण्यांनी ते चाळून घ्यावे. पावसाळ्यांच्या सुरुवातीला बोन्साय शक्यतोवर करावे. चारही चाळण्यातून गाळलेले साहित्य वेगवेगळे ठेवावे. त्याप्रत्येकाचा जाड माती * जाड विटांचा चुरा * जाड शेणखत यांचा एक ढीग मध्यम माती, विटांचा चुरा, शेणखत यांचा एक ढीग त्यापेक्षा बारीक माती * शेणखत * विटांचा चुरा असे तीन ढीग नंतर एकत्र करून ठेवावे. कुंडी स्वच्छ धुवून घ्यावी तिला आतून चिमुटभर मुंग्याची पावडर शिपडावी. त्यानंतर तिला तांब्याची तार दोन्ही छिद्रातून ओवून त्याच्या दोन्ही टोकावर छोटे प्लॅस्टीकच्या जाळीचे तुकडे ओवावे. ती तार बुडाशी पकडने घट्ट बांधून घ्यावी. तारेचे एक टोक वर पर्यंत ठेवावे. तार साधारण १० ते १२ इंच लांब घ्यावी.
प्रथम कुंडीत जाड मिश्रणाचा पातळ थर द्यावा. त्यानंतर मध्यम मिश्रण चांगले दाबून भरावे. बोनसायसाठी जे झाड घ्यायचे ते पिशवीतून वाढून त्याच्या मूळ्या चांगल्या झटकून घ्यावे. जास्तीची तंतुमुळे किवा लांब मुळ कट करून घ्यावी व उरलेली मुळं कुंडीतील मिश्रणावर किवा एखाद्या छोट्या खंगर दगडावर नीट बसवून घ्यावी, त्यावर पुन्हा मध्यम मिश्रण दाबावे. त्यावर पातळसा थर बारीक गाळलेली मिश्रणाचा टाकावा व कुंडी टबात पाणी घेऊन त्यात बुडवून ठेवावी. मिश्रण बुडेल एवढे टबात पाणी नको. केशाकर्षणाने पाणी हळूहळू खालून वरपर्यंत कुंडीत येईल. कुंडी पूर्ण ओली झाली की मग ती कमी उन्हाच्या जागेत ठेवावी. साधारण आठ दिवसात झाड लागल्याचे कळून येते. दोन-तीन वर्षांनी कुंडीतील माती बदलून त्याच्या मुळांचीही काटछाट करणं बोनसायसाठी आवश्यक असते. रोपाच्या मुख्य मुळाच्या आसपासची उपमुळंही कापावी लागतात. मुख्य मुळ बरच टोकदार असेल तर त्याचा टोकदार भागही छाटून टाकावा. रोपाच्या फांद्याही मधून मधून छाटाव्या म्हणजे भरपूर उपफांद्या फुटू शकतात. यावर मॉस ठेवले तर कुंडी थंड राहते व रोप ताजं व टवटवीत राहते.
काळजी – बोनसायला थोडेच पाणी लागते. परंतु नियमित घालावे लागते. दररोज सकाळ – संध्याकाळ थोडेशे पाणी घालावेच. दिवसातून थोडा थोडा वेळ उन्हात ठेवावे. त्यामुळे रोपाची वाढ चांगली होते. रोग किडीपासून सावध राहावे. महिन्या दोन महिन्यानी एकदा रोगोरची हलकीशी फवारणी करावी (१ लिटर पाण्यात तीन थेंब याप्रमाणात) २-३ महिन्यातून एकदा लिक्वीड खत घालावे. दिवसातून दोन – तीन तास घरात उन येत असेल अशा जागी बाल्कनीत, खिडकीत, घराजवळील जागेत याची कुंडी ठेवावी. ‘बोनसाय‘ करायला आणि जोपासायला जरी अवघड असलं तरी त्याच्या सौंदर्याला तोड नाही. या कुंडीवरील बारीक बारीक फुलं, पानं, फळं फारच आकर्षक दिसतात. शिवाय एकदा छोट्या कुंडीत झाड लावले की ते १५-२० वर्षही त्यातच राहू शकते व सुंदर दिसते. किबहूना तेच त्याचे खरे सौंदर्य आहे.
माझाकङे अगदी छोटेवडाचे रोप आहे तयापासून बोनसाय कसे करावे