बॉनसाय हा कुणासाठी केवळ एक छंद होऊ शकतो तर कुणासाठी स्वतंत्र व्यवसायही होऊ शकतो याचा प्रसार चीनमधून जपान व नंतर जगभरात झाला.
बॉन म्हणजे भांडे अथवा ट्रे आणि साय म्हणजे झाड. बॉनसायचा ट्रे साधारणत: आयताकृती किंवा अंडाकृती असतो. त्यातील झाड म्हणजे निसर्गात आढळणार्या मोठ्या झाडांचे किंवा वृक्षांचे छोटे स्वरुप असते. बॉनसाय तयार करताना वृक्षाची भव्यता फांद्यांची रचना, पानांचा आकार या सर्व बाबींचा विचार करावा लागतो.
बॉनसायचे खोड पूर्ण बॉनसायच्या दोन- तृतीयांश असावे. आपल्याला कोणत्या रचनेचे बॉनसाय हवे आहे, त्याप्रमाणे खोडाला विविध प्रकारे वळण दिले जाते. बॉनसायचे खोड मोठ्या वृक्षाचा आभास निर्माण करणारे सरळसोट उभे असू शकते किंवा धबधब्याप्रमाणे कुंडीतून खाली झुकलेले असू शकते अथवा जाड बुंध्याचे वरती निमुळते होत गेलेले असू शकते. खोड कोणत्याही प्रकारचे असले तरी बॉनसायच्या खोडाच्या खालच्या म्हणजे मातीलगतच्या भागात फांद्या अजिबात नसतात.
फांद्या या खोडाच्या वरच्या एकतृतीयांश भागात एकावरती दुसरी याप्रकारे असतात. साधारणपणे पहिली आणि चौथी ,दुसरी आणि पाचवी फांदी तसचे तिसरी आणि सहावी फांदी एकावर एक सरळ रेषेत असतात. अशा रचनेमुळे बॉनसायला त्रिकोणाकृती आकार येतो आणि झाडाचा घेरही दिसतो.
चांगल्या बॉनसायची पाने सुदृढ, आकाराने मोठ्या झाडापेक्षा लहान असतात. मातीबाहेरील मुळे बॉनसायच्या बाजूने तसेच मागील बाजूला असतात. बॉनसायचा ट्रे खोल नसतो. त्यामुळे झाडास आधार मिळल अशा प्रकारे बुंध्याच्या जवळ जाड, मातीमध्ये तिरकस जातील अशा प्रकारे मुळे वाढवावी लागतात. ट्रेमधील माती स्वच्छ, कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा तण नसलेली असते. त्यात सेंद्रीय खत जास्त प्रमाणात असते. ट्रेचा आकार, रंग, त्यातील बॉनसायच्याा आकाराशी रचनेशी सुसंगत असतो. तसेच बॉनसायच्या शोभा वाढवण्यासाठी वापरलेले साहि्त्य म्हणजेच शोभेचे दगड -गोटे, मॉस, रंगीत वाळू बॉनसायशी सुसंगत असते.
— मानसी भिर्डीकर
(मराठी विज्ञान परिषद, मुंबई)
Leave a Reply