नवीन लेखन...

बोनस

आठवी ‘ ब ‘ च्या वर्गातील त्या ” चौकडी ” चे डोळे भिंतीवरील घड्याळा कडे लागले होते..कधी एकदा त्या घड्याळात दोन चे ठोके पडतात आणि कधी मधली सुट्टी होते.!!!.. असं या चौघांना झालं होतं….

मधल्या सुटीची घंटा वाजली तसं चौघे म्हणजे रोहन, मनोज, अजित आणि दीपक म्हणजेच दिपू… वर्गातून पळत सुटले ते सायकल स्टँड कडे …. त्या पैकी रोहन ला दोन दिवसा पूर्वीच त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून नवीन सायकल मिळाली होती…आणि ती सायकल पाहण्यासाठी हे बाकीचे तिघे उत्सुक होते… आणि खरोखरच भानामती झाल्या प्रमाणे हे तिघे रोहनची नवीन सायकल पहात होते.. एटलास कंपनीची ….लाल चुटुक रंगाची सायकल, ” च्यायला काय भारी आहे रे सायकल? ” …. ” कितीला पडली? ” …आणि ” हे वायरचे ब्रेक आहेत का? ? ” अश्या उद्गारांसहित तिघे सायकल न्याहाळू लागले. ..सायकल ही फक्त काळया रंगाचीच असते … लोखंडी …अवजड !! अशी समजूत असल्याने .. ही नवीन सायकल म्हणजे या तीघां च्या दृष्टीने ” अद्भुत ” होती ..आणि सायकलचं कौतुक ऐकुन रोहन च्या अंगावर मात्र मुठभर मास चढत होतं… ” साडे सातशे ची आहे सायकल, नवीनच मॉडेल आलंय हे …” रोहन ने छाती बाहेर काढत उत्तर दिलं..

मग तिघांनी एक एक राऊंड मारण्याच्या निमित्ताने ” सायकल किती मस्त आणि हलकी आहे ” याचा अनुभव घेतला…

अर्थात ऐंशी च्या दशकाच्या उत्तरार्धा चा काळ असल्याने साडे सातशे रुपये देखील ” अरे बाप रे…. !” म्हणायला लावणारे होते. पण रोहनचे वडील उद्योगपती असल्याने त्यांच्या साठी हे सहज शक्य होतं… बाकी तिघांसाठी मात्र मामला बिकट होता….

संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली तरी घरी जाताना ती नवीन लाल सायकल काहीं डोळ्या समोरून जायला तयार नव्हती…

दिपू संध्याकाळी थोडंसं जड पणानेच घरी परतला, आज त्याला त्याच्या स्वतः च्या जुन्या आणि सतत चेन पडून रस्त्यात पंचाईत करणाऱ्या सायकलवर बसून जाणं जीवावर आलं होतं…घरी आल्यावर नेहमी प्रमाणे दप्तर कपाटात न ठेवता पलंगावर भिरकवण्यात आलं होतं, बूट आणि युनिफॉर्म फेकण्यात आला होता आणि शाळेतल्या गमती जमती न सांगता स्वारी फुगून गॅलरीत जाऊन उभी राहिली तसं दिपू च्या आई ने म्हणजे प्रतिभा ताईंनी आणि त्याच्या मोठ्या बहिणीने अर्थात दिप्ती ने ओळखलं की, ” आज शाळेत काही तरी बिनसलंय … पण ” जाऊ दे नंतर गाडी आपोआप रुळावर येईल ” अश्या अर्थाच्या खाणाखुणा एकमेकींना करून प्रतिभा ताईं दिपू साठी दूध गरम करायला आत गेल्या आणि दिप्ती त्याचे पसारे आवरायला लागली…

संध्याकाळी प्रकाशराव घरी आले आणि मग इकड तिकडच्या गप्पा झाल्यावर सगळी मंडळी जेवायला बसली आणि दिपू ने तडक विषयाला हात घातला ” बाबा ..आपण नवीन सायकल घेऊ या ना ! आमच्या वर्गातल्या रोहनने घेतलीये… एटलास कंपनीची …खूप भारी आहे ..” आणि चटकन दिप्ती आणि प्रतिभा ताईंनी एकमेकींकडे सूचक नजरेने पाहिले ” अच्छा ..म्हणजे संध्याकाळ च्या धुसफुशीच हे कारण होतं तर ! ” असे भाव त्यात होते..

” नवीन सायकल? ? कशाला रे? ? तुझी सायकल आहे ना? ” पाणी पिऊन ग्लास खाली ठेवत प्रकाश रावांनी त्याला उत्तर दिलं. ” हो पण बाबा.. ती आता जुनी झालीय..आणि लेडीज सायकल आहे हो ती..ताईची वापरून झालेली, सारखी चेन अडकते तिची… ” दिपू ने त्याची कैफियत मांडली…..

” अरे त्यात काय? उद्या त्या चौकातल्या सायकल वाल्या कडून दुरुस्त करून घेऊ ..” प्रकाश रावांनी त्याला उपाय सुचवला …

पण दिपू काही त्याचा हेका सोडायला तयार नव्हता … ” घेऊ या ना बाबा.. खूप मस्त आहे नवीन सायकल..त्याला वायर चे ब्रेक असतात …साडे सातशे रुपयांना च मिळते ” ते ऐकून प्रतिभाताईंना एकदम ठसका लागला…

” बर बर बघू या… या महिन्यात दिवाळीचा बोनस आला की मग घेऊ तुझी सायकल ..पण आता मात्र सहामाहीच्या अभ्यासा कडे लक्ष्य द्यायचं बरं …” असं मोघम वचन देत प्रकाश रावांनी चर्चेला पूर्णविराम दिला आणि दिपू चा चेहरा आनंदाने उजळला …

” अहो.. काही तरी कश्याला उगीच त्याच्या डोक्यात भरवताय? तो कसा भूणभुण्या आहे ठाऊक आहे ना? आणि बोनस मिळणार आहे का यंदा तरी .???.. मागची दोन वर्ष तरी तोंडाला पानच पुसली आहेत कंपनीने ….” रात्री अंथरुणावर पाठ टेकू पाहणाऱ्या प्रकाश रावांना प्रतिभा ताईंनी विचारलं..

.त्यावर काही सा विचार करून प्रकाश राव उत्तरले..” अगं आज बोलता बोलता आमचे मेहता साहेब म्हणत होते, परदेशी कंपन्यांच्या एक दोन मोठ्या ऑर्डर्स नक्की होण्याच्या मार्गावर आहेत… तसं झालं तर मग यंदा बोनस मिळायचा चांस आहे “….

प्रतिभा ताई त्यावर त्यांना म्हणाल्या ” देव करो… असच व्हावं, अहो पण बोनस आला तर आता दिप्ती च्या कॉम्प्युटर क्लास च जमतंय का पहा.. देशपांडे मॅडम म्हणत होत्या ती खूप हुशार आहे तिला कॉलेज च्या. सोबतच हा नवीन कोर्स केला तर पुढे खूप फायदा होईल… आणि हप्त्याने पण फी देता येते म्हणाल्या आणि महिना अखेर पर्यंत प्रवेश घेतला तर सवलत पण आहे म्हणे ” ….

दिवे बंद झाले आणि प्रकाश राव निद्रा देवी ची आराधना करीत विचारांच्या लाटेवर स्वार झाले…

सुमारे वीस बावीस वर्षापूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी आणि संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी सांगलीतून ते या मुंबापुरीत आले..मग अनेक ठेचा …धक्के खात खात गिरगावात असलेल्या मेसर्स जगजीवन धनसुखमल अर्थात जे एम मिल मध्ये नोकरीस लागले …आणि फडके वाडीतील  राजगुरू चाळीत दोन खोल्यांच्या भाड्याच्या ब्लॉक मध्ये संसाराचा श्रीगणेशा केला. आणि आजपावेतो इमाने इतबारे, अत्यंत प्रामाणिक पणें दोन्ही आघाड्या यशस्वी पणाने निभावल्या होत्या …नोकरीत एक सर्व साधारण कापड छपाई कामगार म्हणून रुजू होऊन आज जे एम मिल चे ‘ विक्री उप प्रबंधक ‘ अर्थात ज्युनिअर सेल्स मॅनेजर..आणि संसारात दिप्ती व दिपूचे बाबा अशी दोन प्रमोशनं आत्ता पर्यंत त्यांनी मिळवली होती. प्रकाश राव आणि प्रतिभा ताईंनी. मिळेल त्या तुटपुंज्या पगारात महागाई शी दोन हात करीत सुखाचा संसार थाटला होता.. कधी नोकरीत बोनस मिळायचा तर कधी मिल तोट्यात आहे म्हणून बोनस नाकारला जायचा…

अर्थात असं असलं तरीही प्रकाश राव आणि कुटुंबीय तसे समाधानी होते, शिवाय दोघांचा ही स्वभाव शांत, संयमी आणि मनमिळावू असल्याने त्यांनी अनेक माणसं जोडली होती ..जीवा भावाची ! त्या पैकीच एक होते गजानन बेलकर म्हणजेच गजा भाऊ .. रहायला देखील प्रकाश रावांच्या चाळीत आणि कामाला देखील जे एम मिल मध्येच होते . अर्थात गजाभाऊ तसे जरा त्यामानाने ‘ सधन ‘ वर्गात मोडणारे ..कारण आता त्यांची दोन्ही मुलं हाताशी आली होती, एक म्युन्सिपालीटीत कामाला होता आणि दुसऱ्याने दुकान टाकले होते त्यामुळे आता निवृत्ती जवळ आली होती तरी गजाभाऊना त्याची काही फिकीर नव्हती … गजाभाऊ तसे खूप बोलक्या आणि हसतमुख वृत्तीचे होते त्यामानाने प्रकाश राव शांत.. काहीसे अबोल आणि ‘ आपण बरं आणि आपलं काम बरं ‘ या स्वभावाचे होते …काटकसर करून जाणारे ..

अश्यातच मुलांच्या सहामाही परीक्षा संपल्या आणि सर्वांना आठ दिवसावर आलेल्या दिवाळीचे वेध लागले… चाळीतील इतर सगळी मुलं फटाके, नवे कपडे आदीची आतुरतेने वाट पहात होती पण दिपू ला मात्र अजून तीन दिवसांनी म्हणजे महिनाअखेरीस होणाऱ्या प्रकाशरावांच्या बोनस सहित पगाराचे आणि पर्यायाने नवीन सायकल चे वेध लागले होते….. तर प्रतिभा ताई घराची साफ सफाई आणि फराळाचे पदार्थ या मध्ये गुंतल्या होत्या ! दिप्ती चे कॉलेज चे पहिले वर्ष असल्याने या सुट्टीत अजून काय करता येईल याची चाचपणी सुरू होती… चाळीत देखील उत्साहाच वातावरण निर्माण झालं होतं .. कोकणातील आणि देशावरील चाकरमानी मंडळी दिवाळी साठी मूळ गावी जायचा तयारीत होती, गृहिणी एकमेकींच्या मदतीने आळी पाळीने एकमेकी कडच्या फराळाच्या तयारीला लागल्या होत्या …… अश्यातच महिनाखेर चा दिवस उजाडला ..प्रकाशराव नेहमीप्रमाणे आवरून डबा घेऊन कामावर गेले ! घरात कोणी बोलून दाखवत नसलं तरीही आज संध्याकाळी मिळणाऱ्या पगार आणि दिवाळी बोनस यांची आशा प्रत्येकालाच होती ..

संध्याकाळी सहा वाजले तसं खेळणं आवरून दिपू ही आज नेहमी पेक्षा लवकर घरी आला होता आणि अगदी शहाण्या मुला सारखा घराच्या साफसफाई मध्ये आई आणि ताई ला मदत करू लागला होता आणि ते पाहून दिप्ती आणि प्रतिभाताई हळूच एकमेकींकडे पाहून गालातल्या गालात सूचक हसत होत्या ….  चहाचं आधण आत्ता लगेच ठेवावं? की ” हे आल्यावर ठेवावं ” या गहन प्रश्नात प्रतिभा ताई असतानाच त्यांचं भिंतीवरील घड्याळा कडे लक्ष गेलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं …पावणे सात वाजत आले होते .तरीही प्रकाश राव अजून घरी आले नव्हते, बहुधा महिना अखेर मुळे आज उशीर होणार असेल असा विचार करून त्या पुन्हा आपल्या कामाला लागल्या, दिपू देखील आता विनाकारण गॅलरीत आत बाहेर करू लागला होता…. पण घड्याळात सव्वा सात वाजले तसं प्रतिभा ताईंच्या मनातील आश्चर्याची जागा आता काळजीने घेतली …कामात मन लागेना ..

तेव्हढ्यात जिन्यात कुणाची तरी पावलं वाजली आणि पाठोपाठ दारावर एक घाई गडबडीची थपथप झाली ते ऐकून प्रतिभा ताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला …कोणी ही न सांगता दिपू दार उघडायला धावला..पण दार उघडताच समोर गजाभाऊ दिसले …धावपळ करून आल्यामुळे घामा ने डबडबलेल्या अवस्थेत होते.. ” बाळा आई कुठाय तुझी? ” त्यांनी दीपू ला विचारलं.. ” आई गजानन काका आलेत ” त्यांना उत्तर न देता दिपू दारातूनच ओरडला.

” भाऊजी तुम्ही? या ना आत !” आतून बाहेर येत साडीच्या पदराने कपाळावरील घर्म बिंदू टिपत टिपत प्रतिभा ताई म्हणाल्या..

” नाही ..नको …. वहिनी तुम्ही पटकन आहे तश्या माझ्या सोबत चला…टॅक्सी उभी करून ठेवली आहे खाली ! दिप्ती तुम्ही दोघं आमच्या घरी जाऊन थांबा … चला चला ” गजा भाऊ प्रचंड गडबडीत दिसत होते ” अगं बाई ! काय झालं भाऊजी? आणि हे कुठायत? ” प्रतिभा ताई आता घाबऱ्या घुबऱ्या झाल्या होत्या …

” वहिनी घाबरु नका ! काही नाही ..प्रकाश ला थोडं छातीत दुखायला लागलं आणि अस्वस्थ वाटू लागल्याने दवाखान्यात नेलं आहे .. चला तुम्ही लवकर ” गजा भाऊ गडबड करीत उत्तरले..

” अहो पण … असं अचानक.. !” प्रतिभा ताईं आता रडकुंडीला आल्या होत्या, मुलं पण कावरी बावरी होऊन एकमेकाकडे पाहू लागली…” आम्ही पण येणार बाबांना भेटायला ” असा हट्ट करू लागली..पण मग ” अरे नको नको बाळांनो तुम्ही आमच्या घरी थांबा .. टी वी बघत बसा हं…आम्ही जाऊन बाबांना घेऊन येतो…वहिनी चला आपण बाकीचं वाटेत बोलू ” अश्या प्रकारे गाजाभाऊंनी एकाच वाक्यात सर्वांची समजूत घातली आणि पाचव्या मिनिटाला ते प्रतिभा ताईंना घेऊन टॅक्सीत बसले    ” संजीवन हॉस्पिटल.. आंग्रे वाडी रस्ता ” असं टॅक्सीवाल्याला ठिकाण सांगितलं आणि मग प्रतिभा ताईंना सगळा प्रकार कथन केला …

‘ आज पगार आणि त्यासोबत बोनस मिळायचा म्हणून जे एम मिल च्या कामगार वर्गापासून अगदी सगळेच उत्साहित होते … परंतु अगदीं वेळेवर म्हणजे पाच वाजता व्यवस्थापनाने ‘ परदेशी कंपनीने  आपल्या तीन मोठ्या ऑर्डर्स रद्द केल्या आणि त्यामुळे आगाऊ रकमेचा चेक देण्यास नकार दिला … मिल ची आर्थिक परिस्थिती खूप शी चांगली नसल्याने यंदा ही बोनस दिला जाणार नाही ‘ असं जाहीर केलं आणि एकच गोंधळ उडाला ! सर्व कामगारांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला ! आणि कामगार नेत्यांनी जहाल भूमिका घेत सर्व कामगारांना काम बंद करून मिल च्या गेट पाशी ठिय्या आंदोलन करण्यास भाग पाडलं ….

… बरं ह्या तिन्ही ऑर्डर्स साठी स्वतः प्रकाशराव आणि त्यांचे साहेब म्हणजे पुराणिक साहेब यांनी खूप परिश्रम घेतले होते .. अनेकदा या कंपन्यांच्या कचेऱ्यांचे उंबरठे झिजवले होते !! आणि या ऑर्डर्स मोठ्या असल्याने दराच्या बाबतीत बोलणी अंतिम टप्प्यात आली होती !! त्यामुळे या ऑर्डर्स रद्द झाल्याचे समजताच प्रकाश रावांना मोठा धक्का बसला… नक्की काय गडबड झाली हे तपासण्यासाठी ते मिल व्यवस्थापनाच्या कार्यालयात जाण्यास निघाले… परंतु कामगार आणि त्यांचे नेते या मंडळीनी त्यांना अडवले आणि सर्वांसोबत आंदोलनात बसण्यास भाग पाडले… अश्यातच काही संतप्त आणि उपद्रवी कामगारांनी चिडून जात आपला राग  मिल मालकांच्या मोटारीवर काढत मोटारीची तोडफोड केली आणि बघता बघता वातावरण चिघळलं…… व्यवस्थापनाने पोलिसांना पाचारण केलं आणि पोलिस येताच तिथे एकच गोंधळ उडाला … पोलिसांनी कामगारांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला… आणि मुळातच सौम्य आणि संयमी स्वभावाच्या प्रकाश रावांना ह्या सर्व प्रकारचा दबाव सहन झाला नाही व छातीत एक बारीकशी कळ आली व अस्वस्थ वाटू लागलं… नशिबाने त्यावेळी गजा भाऊ व त्यांचे इतर एक दोन मित्र त्यांच्या जवळ होते..त्यांनी वेळ न दवडता प्रकाश रावांना दवाखान्यात नेलं …

प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी हृदय विकाराच्या झटक्याच निदान केलं … आणि त्यांना दाखल करून घेतलं व त्वरित उपचार सुरु केले ! मग तिथे एक दोन जणांना थांबवून गजा भाऊ प्रतिभा ताईंना आणायला निघून गेले हे सगळं ऐकून प्रतिभा ताई हबकून गेल्या…

‘ नको तो बोनस बिनस काही … ह्यांची तब्येत फक्त बरी कर बाप्पा ..’ अशी गणपती बाप्पा ची करुणा मनोमन भाकत त्यांनी हात जोडले ..तोवर दवाखाना आला आणि दोघे ही धावतच आत गेले …

अद्याप प्रकाश रावांना आय सी यू मध्येच ठेवण्यात आलं होतं, श्वास घ्यायला जरा त्रास होत होता ..डॉक्टरांनी त्वरित काही तपासण्या करण्याचा निर्णय घेतला व तशी कल्पना प्रतिभा ताईंना दिली … सुदैवाने त्वरित दवाखान्यात दाखल करून वेळेत उपचार सुरू केल्याने आता धोका टळला होता पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रकाश रावांना  अजून दोन दिवस दवाखान्यातच देखरेखीखाली ठेवण्यात येणार होतं…

मग त्या रात्री दवाखान्यात प्रतिभा ताई थांबल्या आणि ” मुलांची काहीच काळजी करू नका वहिनी, आमच्या घरी सुखरूप राहतील ” अशी खात्री त्यांना देऊन गजाभाऊ रात्री घरी परतले . दुसरे दिवशी प्रकाश रावांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि मग त्यांना आय सी यू मधून खोलीत आणलं गेलं . तिसऱ्या दिवशी सकाळीच दिपू आणि दिप्तीला घेऊन गजा भाऊ दवाखान्यात आले…मग मुलांना भेटून तर प्रकाशराव जणू पूर्ण पणे बरे झाले ! दिपू तर चटकन त्यांच्या गळ्यात च पडला ..

आणि दिप्ती ने चटकन हातातील रुमालाने डोळे टिपून घेतले…गजा भाऊ डॉक्टरांना भेटायला गेले  ” गूड न्यूज ..वहिनी चला तयारी करा, चार वाजता प्रकाशला घरी सोडतो म्हणालेत डॉक्टर ! ” खोलीत येत येत गजा भाऊंनी घोषणा केली आणि सगळेच आनंदले ..पण प्रकाश रावांच्या चेहऱ्यावर मात्र अजून काळजी चे ढग दाटले होते . ” गजा … अरे दवाखान्याच बील? ? किती आलं ..घरी थोडे पैसे…! ” प्रकाश रावांनी त्या काळजीचं कारण व्यक्त केलं..

” ओ पैसे वाले… राहू द्या..तुमचं बील भरलं गेलं कधीच. तुमच्या काकांनी भरलं !”

जोरजोरात हसत गजा भाऊ म्हणाले आणि प्रकाश रावांसहित सगळेच बुचकळ्यात पडले ” कोण काका? ??! ” प्रकाश रावांनी न राहवून विचारणा केली..

” धनसुखमल काका… ! अरे वेड्या आपल्या मिल व्यवस्थापनाने सगळं बील आज भरून टाकलं … तू काळजी करू नको ..घरी चल आणि आराम कर दिवाळी संपे पर्यंत तुझी ही सुट्टी मंजूर झाली आहे…. या दिपू सारखी ….. ! ” आता मात्र सगळेच हास्य कल्लोळात बुडाले ..

” हे मात्र आश्चर्य च आहे रे ! ” प्रकाश राव अविश्र्वासाने उद्गारले….

” घरी तर चल.. अजून बरीच आश्चर्य आहेत तुझ्यासाठी !” गजा भाऊंनी हसत हसत हे वाक्य म्हटलं आणि दिपू कडे पाहून हळूच डोळा मारला..आणि दिपू ने ही खूश होत त्यांना टाळी दिली…… प्रकाश राव मात्र उगीचच आळीपाळीने सगळ्यांची तोंडं पाहू लागले…

चार वाजता टॅक्सी करून सगळे दवाखान्यातून चाळीत परतले… आणि ब्लॉक च्या दारात येताच ..प्रकाशराव आणि प्रतिभाताई एकदम थबकले आणि आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले….तर इकडे दिपू आणि दिप्ती एकमेकांकडे पाहून टाळी देत हसू लागले.

समोर गॅलरीत एटलास कंपनीची तशीच लाल चूटूक .. वायर च्या ब्रेक वाली चमकणारी… नवी सायकल उभी होती ! ” ही .. सायकल कोणी आणली ..? गजा? तू पैसे दिले? पण कशाला? ” प्रकाश रावांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली…

” हो हो ..अरे सांगतो सगळं ..आधी आत तर चल !” दार उघडत गजा भाऊ म्हणाले..

आत आल्यावर प्रकाशरावांना पलंगावर बसवून गजाभाऊ खुलासा करू लागले..

” अरे तुला दवाखान्यात नेलं आणि इकडे मिल मध्ये सगळं चित्रच पालटलं…पोलीस आणि कामगारांमध्ये हाणामारी सुरू झाली .. पुराणिक साहेब आणि मेहता साहेब मॅनेजमेंटशी चर्चा करायला गेले…

त्या युरोपच्या कंपनी च्या ऑर्डर्स ची चौकशी केली आणि त्यात असं लक्षात आल की त्या कंपनीला आपला माल खूप आवडला होता पण आपल्या अकाऊंट डिपार्टमेंट कडून त्यांना चुकीचं कोटेशन पाठवलं गेलं होतं …. आता या कंपन्या किती शिस्तबद्ध असतात तुला ठाऊक आहेच . आधी ठरल्या पेक्षा वेगळे दर पाहून त्यांनी डायरेक्ट ऑर्डर्स रद्द केल्या…मग नंतर स्वतः मेहता साहेब आणि पुराणिक साहेब त्यांना भेटून आले..त्यांची माफी मागितली व योग्य ते कोटेशन सादर केलं …आणि आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने ऑर्डर्स स्वीकारल्या आणि आपल्या मिल ला आगाऊ रकमेचा चेक देखील दिला…आहेस कुठे? …आणि अखेर मिल मालकांनी रद्द केलेला बोनस पुन्हा जाहीर केला आणि काल सगळ्यांना पेमेंट देखील केलं… हा बघ तुझा चेक ! ” असं म्हणून खिशातून चेक काढून प्रकाश रावांच्या हातात दिला ….

हे सगळं ऐकून प्रकाश राव आनंदाने गदगदून गेले. त्यांना विश्वास बसेना … आणि चेक वरील रक्कम पाहून तर ते चक्रावून गेले…

” अरे गजा… ह्या अकाऊंट डिपार्टमेंट नी परत गडबड केली बघ . बोनस आणि पगार एकत्र केला तरी एव्हढी मोठी रक्कम होत नाही … हे बघ ना !! ” अपेक्षित रकमे पेक्षा दुप्पट रकमेचा चेक पाहून प्रकाश राव चक्रावून गेले..

पण गजाभाऊ मात्र अजून ही गालातल्या गालात हसत होते.. ..

” ही अकाऊंट डिपार्टमेंट ची गडबड नाही प्रकाश.. हे तुझ्या मेहनतीचं आणि प्रामाणिक पणाच फळ आहे… अरे ही ऑर्डर आपल्या मिल साठी खूप मोठी होती कारण या ऑर्डर मुळे आपल्या मिल ला अजून बऱ्याच मोठ्या ऑर्डर्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे… आणि या साठी तू आणि पुराणिक साहेबांनी केलेल्या प्रयत्ना मुळे हे शक्य झालं आहे हे मिल मालकांनी जाणलं आणि तुम्हा दोघांना खास याचं प्रतीक म्हणून डबल बोनस दिला आहे ” हे सांगताना गजा भाऊंच्या आणि ऐकताना प्रकाशराव व प्रतिभा ताईंच्या डोळ्यात पाणी तरळलं… ” चला मी निघतो…तुम्ही सगळे आराम करा..” गजा भाऊ जाता जाता म्हणाले ..

आणि दारात थबकून परत वळत म्हणाले ..

” आणि हो… आता दिपू साठी सायकल मी आणली आहे बरं आणि दिप्ती च्या क्लास चा पहिला हप्ता पण भरलाय …माझे पैसे मला परत द्यायचे .. नाहीं तर इथं दारात ठिय्या आंदोलन करेन ” आणि खो खो हसत सुटले आता त्या हसण्यात मात्र सगळेच सामील झाले होते…

चेक प्रतिभा ताईंच्या हातात देत प्रकाश राव मिश्किल पणाने म्हणाले ” ठेव हा चेक कपाटात… काय करायचं सांगा मुलांनो ह्या ” बोनस ” च? ” आणि एव्हढ्या वेळात दिप्ती पहिल्यांदाच बोलली ” बाबा अहो मिल ने तुम्हाला डबल बोनस दिला असेल पण आम्हाला तिघांना मात्र खरा बोनस आज मिळाला आहे ” ” कोणता ग? ” आश्चर्याने प्रकाश राव म्हणाले …

दिप्ती बोलू लागली ” बाबा तुम्हाला दवाखान्यात नेलं आणि आम्ही कदाचित पहिल्यांदा एव्हढ घाबरलो..नको नको ते विचार मनात येत होते.. काहीच समजत नव्हतं …पण आज तुम्ही व्यवस्थित बरे होऊन परत आलाय ..

हा आम्हाला मिळालेला सर्वात मोठा ” बोनस” आहे बाबा…!” या पुढे मात्र डोळ्यात आलेल्या अश्रूंमुळे आणि घश्यात आलेल्या आवंढ्या मुळे ती पुढे बोलू शकली नाही….

प्रकाश रावांनी चटकन दोन्ही मुलांना जवळ घेऊन पाठीवर हात फिरवला ..प्रतिभा ताई देखील त्यांच्या शेजारी येऊन बसल्या आणि मग ह्या कुटुंबाने एकमेकांच्या सोबतीने ह्या ‘ अनोख्या बोनस क्षणाचा अनुभव घेतला ‘

Avatar
About सागर जोशी 11 Articles
सागर जोशी हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक असून ते आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपचे सभासद आहेत. त्याच्या कथा अतिशय लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..