वयाच्या साठीनंतर उपभोगलं जाणारं प्रत्येकाचं जीवन, हे ‘बोनस’ लाईफच असतं. बालपण वय वर्षे चौदापर्यंत, भुर्र उडून जातं. गद्धेपंचविशीपर्यंत, शिक्षण पूर्ण झालेलं असतं. नोकरी आणि छोकरी तिशीपर्यंत, जीवनात समाविष्ट होते. पुढील तीस वर्षे पाठीचा कणा तुटेपर्यंत, संसाराचा गाडा हाकावा लागतो. साठीपर्यंत घरातील जबाबदाऱ्या पार पाडून, तृप्त भावनेने, कर्ता करविताचे अस्तित्व अनेक युद्ध गाजवून छातीवर दहावीस मेडल्स मिरविणाऱ्या, निवृत्त कमांडरसारखं झालेलं असतं.
माझंही तसंच झालं. मी एक वर्षाचा असताना पुण्यात आलो. बालपण-तरुणपण, संस्कारी सदाशिव पेठेत गेलं. प्राथमिक शिक्षण भावे स्कूल व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड व रमणबाग येथे झालं. महाविद्यालयीन शिक्षण बीएमसीसीत झालं. तिथं अनेक मित्र भेटले, ज्यांनी मला जाहिरातींच्या व्यवसायात कामं दिली.
नाटक-चित्रपटांच्या जाहिराती करताना, स्टेजवर व पडद्यावर पाहिलेल्या कलाकारांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित झाले. राजा गोसावी, शरद तळवलकर, वसंत शिंदे, इत्यादींशी आपुलकीचे नाते जडले. मराठी चित्रपट निर्माते. बाळासाहेब सरपोतदार, अरविंद सामंत यांनी अनेक चित्रपटांची कामे करवून घेतली. महेश मांजरेकर यांनी ‘आई’ या पहिल्या सुवर्णमहोत्सवी चित्रपटाचे काम करवून घेतले. याच वेळी दादा कोंडके यांनी ‘वाजवू का’ चित्रपटाचे काम दिले. त्यामुळे दादांचा सहवास लाभला. स्मिता तळवलकरने ‘सवत माझी लाडकी’ या चित्रपटापासून ‘तू तिथं मी’ व ‘सातच्या आत घरात’ चे काम दिले. ‘सुयोग’ मुंबई या नाट्य संस्थेच्या सुधीर भट यांनी अनेक गाजलेल्या नाटकांची डिझाईन्स हक्काने करुन घेतली. चांगल्या व पडत्या काळातही मोठ्या बंधूंच्या भूमिकेतून, सुधीर भट यांनी भक्कम आधार दिला.
या नंतर साडेसातीच्या कालावधीत, कामं ठप्पं झाली होती. कित्येक महिने ऑफिसवर येऊन, बसून रहायचो. संध्याकाळी रिकाम्या हाताने घरी परतायचो. परिस्थितीनं अनुभवात भर पडत गेली.
हळूहळू चित्रपटांची व नाटकांची कामे कमी होत गेली. नवीन चित्रकारांना संधी मिळू लागली. पुस्तकांची मुखपृष्ठं करु लागलो. त्यासाठी वाचन होऊ लागलं. असंख्य मुखपृष्ठं केली. वेगवेगळ्या स्वभावांचे लेखक, प्रकाशक, वितरक, प्रिंटर्स, बाईंडर्स भेटले. कधी लेखकाच्या कलाने तर कधी प्रकाशकांच्या सांगण्यावरुन मुखपृष्ठ केली गेली. समजूतदार स्वभावाचा गैरफायदा घेत काहींनी, तोंडावर अपमानही केला. मुखपृष्ठं करताना ‘चित्रकार’ ऐवजी ‘ऑपरेटर’ म्हणूनच वागवलं गेलं. इंटरनेटवरील ‘गुगल’वरुन इमेज घेऊन मुखपृष्ठ करणाऱ्यांची एक नवीन फळी निर्माण झाली व कलात्मक कामं करणाऱ्या चित्रकारांवर बेकारीची वेळ आली. कमर्शियल कामं ‘स्वस्तात’ करुन देण्यासाठी ‘अप्पा बळवंत चौका’त ठिकठिकाणी, फौज उभी राहिली.
२०१९ च्या अखेरीस कोरोनाची पहिली लाट आली. लाॅकडाऊन लागलं. तीन आठवड्यांचं म्हणता म्हणता, नऊ महिने घरात बसून काढले. खायचं आणि बसायचं. अशावेळी मनात विचार आला, मोबाईलवर जीवनातील अनुभव, आठवणी, व्यक्तिचित्र लिहून काढू. रोज लिहित होतो. मित्रांना पाठवत होतो. वाचून अभिप्राय मिळत होते. लिहायला प्रेरणा मिळत होती. अठ्ठावीस दिवस झाले की माझे मित्र, मनोहर कोलते मोबाईल ‘रिचार्ज’ करुन द्यायचे.
पहिली लाट ओसरल्यावर, पुन्हा ऑफिसवर येऊ लागलो. चार महिन्यांनी पुन्हा दुसरी लाट आली. पुन्हा चार महिने घरी बसून लिहित राहिलो. पुन्हा ऑफिस सुरु झालं. काम नसली तरी माणसं येऊन भेटत होती. पुन्हा ‘रहाटगाडगं’ सुरु झालं.
माझी कथा वाचून, नम्रता नावाच्या मुलीनं फोन केला, ‘सर, तुमची कथा मला एका ठिकाणी वाचायची आहे, परवानगी द्याल का?’ मी परवानगी दिली. काही महिन्यांनंतर तिने ‘स्टोरीटेल’ वर कथा देण्याविषयी विचारलं. मी होकार दिला. गेल्याच महिन्यात तिनं एका सहकाऱ्यासोबत, ‘स्टोरीटेल’साठी आठ कथांच्या ‘ऑडिओ बुक’चं रेकाॅर्डिंग पूर्ण केलं.
मी लिहिलेल्या आठ कथा ‘स्टोरीटेल’ ॲपवरुन आपण आज, माझ्या वाढदिवसापासून कधीही ऐकू शकता. या आठही हृदयस्पर्शी कथा, आयुष्याच्या उत्तरार्धातील मध्यमवर्गीय स्त्री-पुरुषांच्या आहेत. त्यामधील व्यक्तीरेखांमध्ये आपल्याला आसपासचीच माणसं दिसतील. कथा ऐकताना, त्यांच्या सुख-दुःखाशी आपण कळत नकळत सहभागी व्हाल. हीच तर जादू आहे, ‘बोनस लाईफ’ची!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-३-२२.
Leave a Reply