नवीन लेखन...

बुके; की बुक?

हल्ली कार्यक्रम कोणताही असो, फुलांचा गुच्छ उर्फ ‘बुके’ देण्याची प्रथा चांगलीच रुजलीय. ही प्रथा एवढी रूजलीय, की एकदा भोईवाडा स्मशानात एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या प्रेतावर एकाला बुके ठेवताना पाहीलं. “अरे हे काय?” म्हणालो, तर म्हणे “हार संपले होते म्हणून बुके आणला. हारातही फुलं आणि बुकेतही फुलंच, काय फरक पडतो?” हे ही वर सांगत होता. लाॅजिक तर बरोबर होतं त्याचं..! गमतीचा भाग सोडा, पण बुकेने आपल्या समाजात, विशेषत: उच्चशिक्षित व उच्च मध्यमवर्गीयांत, चांगलंच मुळ घरलंय.

बुके द्यायचा प्रसंग बहुतकरून कुणाच्यातरी लग्न कार्यात येतो. क्वचित कुणाचं प्रमोशन किंवा मग अन्य काही अॅनिव्हरसरी वैगेरे असेल तेंव्हा येतो. लग्नात तर हल्ली आहेर घ्द्यायची आणि द्यायची प्रथा कमी होत चाललीय. समाजात बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य आल्याची ही निशाणी आहे. बरं, अशा प्रसंगी रिकामे हात हलवत जाऊ नये, असही आपली संस्कृती सांगते. मग अशावेळी नजरेसमोर चटकन उभा राहातो तो बुके. आहेराऐवजी बुके घेऊन गेल्याने रिकाम्या हाताने गेल्यासारखंही वाटत नाही आणि स्टेजवरच्यांना काहीतरी भेट दिल्यासारखही होतं. शिवाय त्या कलाबतूने मढवलेल्या विविध आकाराच्या, रंगांच्या आणि गंधांच्या फुलांच्या सहवासात काही वेळ गेल्यानं प्रसन्न वाटतं हे ही खरंच..!

बुकेचे किती ते प्रकार असतात आणि त्यांच्या किंमतीही तशाच शंभर-दिडशे रुपयांपर्यंत पुढे अनेक हजारो रुपयांपर्यंत असतात. आपल्याला परवडेल तसे बुके बाजारात सहज उपलब्ध असतात. एक तर ‘टेम्पो बुके’ नांवाचा एका लहान खोलीएवढा बुके तर ३०-३५ हजारापर्यंत असतो. त्याच तोडीचा कोणी असेल तर त्याला हा बुके नझर केला जातो.

पण मला काय वाटतं सांगू, देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला काहीतरी दिल्यासारखं आणि घेतल्यासारखं वाटावं म्हणून आहेराऐवजी बुकेसाठी आपण जे पैसे खर्च करतो, ते अक्षरक्ष: कचऱ्यात जातात. बुके ही मुळात युरोपियन प्रथा व त्यांच्या ज्या गोष्टींची आपण भ्रष्ट नक्कल केली, त्यात बुकेही आहे. अर्थात पूक्वी सभांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमापुरत्या मर्यादित असलेल्या ‘पुष्पगुच्छा’ने ‘बुके’ बनून आपल्या घरगुती कार्यक्रमात तसा उशिराच प्रवेश केला, पण अल्पावधीतच त्यानं पुढचा क्रमांक मिळवला.

बुकेची युरपीयन प्रथाही तिकडच्या इतर गोष्टींसारखी बरीचशी तिकडच्या हवामानाशी निगडीत असावी. बुकेतली फुलं युरपखंडातील देशांच्या थंड हवामानात दीर्घकाळ ताजी टिकतात. त्यातून पाश्चिमात्य लोकांना फुलांची आवड असते. त्यांची सर्वसाधारण घरही चांगली प्रशस्त असतात. तिथे फुलं देणं आणि घेणं समजू शकतो. फुलांची आवड आपल्यालाही असते, परंतू म्हणून काही आपण आपल्या टिचभर घरात सदा सर्वकाळ फुलांची रचना करत नाही. फुलांची आरास करायची ती गणपतीतून किंवा मग काही घरगुती लग्न-बारसादी किंवा काही धार्मिक समारंभ असेल तेंव्हा ही आपली पद्धत..!!

आपल्या देशात फुलांची सांगड थेट देवाशी घातल्यामुळे सर्वसाधारण घरात नेहेमी शोभेसाठी म्हणून फुलांची रचना केली जात नाही. अगदी देव-धर्म मसेल तर मग लावणीची बैठक, गजरा-वेणी, मधुचंद्रासाठी हाॅटेलमधे बुक केलेली रुम आदी शृंगारीक बाबी किंवा मग थेट तिरडी इथपर्यंत आपल्या इथं फुलांची धाव असते. पूर्वी सर्व वयाच्या बायका आवर्जून फुलं केसांतून माळायच्या, परंतू आता लांबसडक केस फक्त जाहिरातीतच दिसत असल्यामुळे आणि फुलं माळणं म्हणजे अगदीच ‘हे’ वाटतं असं शिक्षणातून (गैर)समजल्यामुळे, स्त्रीयांचा सुमनशृंगारही भुतकाळात हरवून गेला.

बुकेतून आपल्याला दिली गेलेली किंवा आपण दिलेली फुलं, आपल्या भारतासारख्या विषुववृत्तीय, उष्ण कटीबंधातील देशात, उष्णतेमुळं दोन तासात बावतात व माना टाकायला लागतात. आपल्याकडे कुठं अजून सर्रास फुल्ली एअर कंडीशन्ड घरांची चलती आहे? माणसासारखा माणूस बारापैकी आठ-नऊ महिन्याच्या या दाहक उकाड्याने आणि घामट्याने हैराण होतो, तिथे बुकेतल्या नाजूक फुलांची ती काय कथा? बुके घरात पाण्यात वैगेरे ठेवला, तर आणखी काही तास टिकतो आणि त्यानंतर मात्र त्याच्या सुरेख कलाबतू आणि शुभेच्छा लेबलसहीत सरळ कचराकुंडीत जाऊन विसावते. मोठ्या आस्थेने आणि प्रेमाने दिलेला देखणा, खर्चिक बुके अक्षरक्ष: मातीमोल होतो. त्या बुकेसोबतच्या शुभेच्छा राहात असतील कदाचित पण पैसे चक्क पाण्यात जातात हे बघून तर माझा जीव जळतो अक्षरक्ष:.!!

मग काय करावं? या वर उपाय काय? तर उपाय आहे. ‘बुके’तल्या ‘के’वरची मात्रा काढून टाकायची आणि ‘बुके’चं ‘बुक’ करायचं..! सोप्पय एकदम. ‘बुके’च्या ऐवजी शुभेच्छांसहीत ‘बुक’ द्याव युरेखसं एखादं..!

बुकेच्याच किंमतीची कितीतरी छान छान पुस्तकं दुकानात सहज उपलब्ध असतात, त्यातलंच एखादं आपल्या आवडीनं निवडावं आणि द्यावं सरळ भेट म्हणून..! पुस्तकाच्या पहिल्या पानावर आपण आपल्या हस्ताक्षरात लिहीलेल्या शुभेच्छा, ज्याला भेट दिलं त्याच्या चिरंतन नजरेसमोर राहातात आणि भेट स्विकारणाऱ्याने पुढे कधी पुस्तकाचं ते पान उघडलं, की भुतकाळातला तो क्षण, तो प्रसंग जिवंत होतो आणि पुस्तक भेट दिलेली ती व्यक्ती क्षणात नजरेसमोर उभी ठाकते. भुतकाळाची सैर घडवणारा हा टाईम मशिनचा अनुभव बुके नाही देऊ शकत, ती ताकद फक्त पुस्तकाची..!

आता तुम्ही म्हणाल, की ज्याला भेट द्यायचीय त्याला पुस्तकाची आवडच नसेल तर..? शंका रास्त आहे. पण त्याला फुलांची आवड असते याची तरी काय गॅरंटी..? आणि नसेल पुस्तकांची आवड, तर भेट मिळालेल्या एखाद्या पुस्तकाची पान सहज म्हणून चाळताना त्याची नजर त्या पुस्तकातल्या एखाद्या वेधक वाक्यावर पडून, त्याला वाचनाची प्रथम उत्सुकता व नंतर आवड निर्माण होऊ शकते. पुस्तकातलं एखादं वाक्य पुढे एखाद्याचं आयुष्याचं ध्येय झाल्याची उदाहरणं जगात काही कमी नाहीत. तसा चमत्कार इथं घडणार नाही कशावरून? पुस्तक भेट म्हणून दिलेल्या आपल्या मित्राला पुस्तकाची आवड नसेल, तर त्याच्या घरातल्या एखाद्याला असू शकते, त्याच्या उपयोगी येईल ते पुस्तक असा विचार करावा. आणि समजा पुस्तक भेट म्हणून दिलेल्या घरातले सर्वच अक्षरशत्रू आहेत असं गृहीत धरलं, तर मग भेट म्हणून मिळालेली सर्व पुस्तकं एखाद्या वाचनालयाला देणगी म्हणून देण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच की..! त्बुके कुठं असे दुसऱ्याला देणगी म्हणून देता येतात? दान देण्याचं पुण्य पुस्तक मिळवून देऊ शकतं. त्या वाचनालयात तरी ते वाचलं जाईल की नाही.? काय सांगता येतंय, ते वाचून कदाचित एखादा लेखक, कवि, शस्त्रज्ञही बनेल. अगदी पुस्तकं रद्दीत विकली, तरी विकणाऱ्याला पैसे व रद्दीतून ती खरेदी करणाऱ्याला ज्ञान मिळतच..! बुकेचे पैसे बुके दिल्यापासून काही तासातच पाण्यात जातात, तसं पुस्तकांचं होत नाही, तर पुस्तकाचं रुपांतर ज्ञानात होतं हे आता आपल्या लक्षात येईल..

‘बुके’ देऊन त्यावरील शुभेच्छांच्या क्षणिक लेबलसहीत पैसे पाण्यात घालवण्यापेक्षा, तेच पैसे ‘बुक’ देऊन ‘ज्ञानात’ शाश्वत गुंतवणं हा पर्याय मला तरी चिरंतन फायदेशीर वाटतो. बघा पटतंय का ते..!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..