श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १८४५ साली (माघ शु.१२ शके १७६६) गोंदवल्यास झाला. त्यांचे मुळ घराणे माणदेशातील दहिवडी जवळ वावरहिरे या गावचे. त्यांचा मुळ पुरूष रूद्रोपंत व त्यांचे आडनाव घुगरदरे. घुगरदरे वासिष्ठ गोत्री शुक्ल यजुर्वेदी ब्राम्हण असून रूद्रोपंत पंढरीच्या विठ्ठलाचे एकनिष्ठ उपासक होते. महाराजांचे पणजोबा
कुलकर्णीपण करण्यासाठी गोंदवल्यास येऊन स्थायिक झाले तरी पंढरीचीवारी घराण्यात कायम होती. महाराजांचे आजोबा लिंगोपंत भगवद्भक्त प्रामाणीक वृत्ती परोपकारी व ईश्वरावर निष्ठा. त्यांचा जिवनक्रम पहाटे नित्य प्रभुस्मराणाने होई. स्नानसंध्या पूजाअर्चा पठण पुराण व श्रवण इ.धार्मिक कामात जाई. विठ्ठलाच्या नामस्मरणाने त्यांच्या डोळयातून प्रेमाश्रु पाझरत. वयोमानामुळे शरीर थकले व त्यांच्याने पंढरीचीवारी होत नाही असे वाटल्याने त्यांचा जीव कळवळला. झोपेत त्यांना पाांडुरंगाने दर्शन दिले. त्यांचा हात धरून त्यांना मळयात नेले व म्हंटले “इथे खणून पहा मी या जागी आहे तुला पंढरीला येता येत नाही मीच तुझ्या जवळ येतो”. तेथे विठ्ठलरखुमाईच्या सुंदर मूर्ती आढळल्या. पंडूरंगाचे कौतुक पाहून लिंगोपंतांच्या डोळयातून प्रेमाश्रू वाहू लागले. मुर्ती घरी आणून सुयोग्य मुहुर्त पाहून पंतानी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा घरानजीक केली. भजन किर्तन नामस्मरण व अन्नदान यांनी सारे गोंदवलेगाव मोहरून निघाले. “विठ्ठोबाचा मळा” आज गोंदवले गावात विद्यमान आहे.
श्री लिंगोपंताची पत्नी राधाबाई अंतःकरणाने उदार व वृत्तीने समाधानी होती. या दाम्पत्यांचे पुत्र रावजी म्हणजे महाराजांचे तीर्थरूप. त्यांची पत्नी गीताबाई सातारा जिल्हयातील कलेढोणचे नारायणराव वाघमारे यांची मुलगी. श्नानसंध्या पूजाअर्चा एकांतामधील चिंतन नामस्मरण व पांडुरंगचरणी दृढ निष्ठा.
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकरांच्या आजोळी म्हणजे गीताबाईंच्या घरी रामाची उपासना होती. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या संप्रदायाचा प्रभाव माहेरच्या घराण्यावर होता. रामरायाचा सतत ध्यास तिच्या मनात असे “श्रीराम जय राम जय जय राम” मंत्रात ती रमुन जाई. रामसयावाचून तिच्या अंतःकरणाला शीण होई. “रघुविरभजनाची मानसी प्रीति लागो। रघुविरस्मरणाची अंतरी वृत्ति जागो”। अशी तिच्या मनाची ओढ असल्यामुळे तिचा लौकिक संसार रामरायाच्या कृपाप्रेमात रंगुन गेला होता. दासबोधाचे नित्य वाचन व रामनामाचे स्मरण यांनी तिचे जीवन उजळले होते. अशात तिला डोहाळे लागले. तीची सारी वृत्तीच राममय बनून गेली होती. मुखावर एक प्रकारचे गांर्भीययुक्त तेज चमकू लागले. “ हनुमंत आमुची कुळवेली ऽ राममंडपी वेला गेली ऽ श्रीरामभजने फळलीं”। अशी अवस्था आपल्या आयुष्यात येईल काय अशी अपेक्षा वाढत गेली. “साहाय्य आम्हांसी हनुमंत। आराध्यदैवत श्रीरघुनाथ”। विठ्ठलप्रेमास रामभक्तीची गंगा मिळली होती. वैराग्यसंपन्न सत्वशील व गुणवान पुत्र व्हावा असे गीताबाई व तिची सासू राधाबाई यांना वाटे. मारूतीपुढे अकरा वाती लावून राधाबाईने गीताबाईस पराक्रमी पुत्र व्हावा अशी विनंती केली व ती लौकरच फळा आली आणि अश्या रीतीने श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जम्म झाला.
लहान वयात त्यांच्यावर आजोबांनी चांगले संस्कार केले. आजोबांनी नातवास धुळाक्षरे शिकविली. महाराज एकपाठी होते. गीतेचे श्लोक आजोबांबरोबर म्हणता म्हणता पाठ झाले. स्तोत्रे आरत्या अष्टके व सूर्यनमस्काराचे मंत्र यांच्या सततच्या श्रवणामुळे व तादात्म्यामुळे महाराजंची वृत्ती तदाकार झाली.
मध्यम बांधा पिवळसर झाक असलेला गोरा रंग, रूंद चेहेरेपट्टी भव्यकपाळ सरळ नाक पांढरेशुभ्र दात व चमकदार डोळे अशी एकंदर त्यांची ठेवण होती. श्री महाराज चोवीस तास लंगोटी घालीत कपनी टोपी किंवा फरगुल घालीत. कमरेला छाटी धोतर पीतांबर किंवा उपरणे तर कधी डोक्याला रूमाल बांधीत. कपाळाला केशरी गंध लावून मध्ये काळी रेघं काढीत व मुदा लावीत. पायात नेहमी खडावा असत व हातात रूमाल असे.
महाराज श्रीकृष्णाप्रमाणे आपले मित्रसखे यांना घेऊन गावाशेजारच्या रानात जायचे. दगडाचा राम व सीता तयार होई. पूजा आराधना व प्रार्थना होई मग प्रसाद वाटला जाई. मध्यान्हींच्या सुमारास सर्वांच्या शिदोर्या एकत्र येऊन सहभोजन होई. जगाच्या विविधतेत महाराज प्रभुसत्तेचे एकत्व अनुभवीत होते.
महाराजांना सद्गुरूंचा शोध घेताना खुप अडचणी आल्या त्यांनी पायी खुप प्रवास केला. ज्या परंपरेत महाराज वाढत होते त्यात समर्थांनीही श्रीगुरूंचा महिमा अपार गायिला आहे ‘सद्गरूवीण ज्ञान कांही। सर्वथा होणार नाही”। “सद्गूरूवीण जन्म निर्फळ। सद्गुरूवीण दुःख सकळ”। “सद्गुरूवीण तळमळ जाणार नाही”। महाराजांना सद्गुरूंचा ध्यास लगला होता म्हणून घरातील मंडळींनी त्यांना लग्नाच्या बंधनात अडकवण्याचे ठरविले व वयाच्या १०व्या वषी गोंदवल्या जवळच्या खातवळ गावचे संभाजी मल्हार गोडसे यांच्या मुलीबरोबर लग्न झाले. पण संसारात लक्ष लागेना. ध्यानधारणा व हरिभजनात जास्तच रस घ्यावयाला लागले. सद्गुरूभेटीची त्यांची तळमळ अधिकच वाढली. वयाच्या १२व्या वषी आईला सांगून सद्गुरूंच्या शोधात पुनः घर सोडले. अंगावर लंगोटी मुखावर जिज्ञासा माधुकरीवर जेवण अखंड श्रीरामाचा व सद्गुरूंचा ध्यास अश्या अवस्थेत अनेक साधुपरूषांच्या भेटी घेतल्या. देव मामलेदार यांचीही भेट सटाण्यास घेतली. श्री अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेतले. आपला बाळ आपल्याला भेटायला येतो आहेसे पाहून स्वामींना आनंद झाला. महाराजांना जवळ घेऊन म्हंटले “तुझे काम माझ्याकडे नाही” हुमणाबादेत श्री माणिक प्रभूंचे दर्शन घेतले. “योग्य वेळी तुझे काम होईल” असे आश्वासन प्रभूंनी दिले व भाऊ भेटल्याचे समाधान झाले. भटकंती करता करता एके दिवशी त्यांच्यासमोर समर्थ संप्रदायामधील कोणी श्रीरामकृष्ण प्रकट झाले व त्यांनी “बाळ तू येहळे गावच्या तुकाराम चैतन्याकडे जा तुला पूर्ण समाधान मिळेल”.
पुसद उमखेड रत्यावर असलेल्य येहळे या गावी काशीनाथपंत नावाच्या यजुर्वेदी ब्राम्हणाचा मुलगा तुकाराम. दत्तअवधुतांच्या कृपेने झाला असल्याने अवलिया वृत्तीचा होता. महाराजांनी येहळे गावी येऊन तुकामाईंचा शोध घेतला. कमरेला लंगोटी डोक्यावर टोपडे एका हातात चिलिम व दुसर्या हातात उसाचे कांडे असा वेशातल्या तुकामाईपुढे
महाराजांनी लोटांगण घातले. “थांब तुझा खून करतो.” “मी पण आपला जीव आपल्या पायी देतो.” तुकामाईंनी त्यांना प्रेमाने पोटाशी धरले. महाराजांनी नऊ महिने सद्गुरूंची सेवा केल्यावर रामनवमीच्या दिवशी श्री तुकामाईंनी एका शेतात भर उन्हांत महाराज्यांच्या डोक्यावर हात ठेवल्यावर त्यांची भावसमाधी लगली. समाधी उतरल्यावर त्यांचे नवेनाव “ब्रम्हचैतन्य” असे झाले. तुकामाईंकडून महाराजांना “श्रीराम जय राम जय जय राम” असा तेराक्षरी मंत्र मिळाला. रामाच्या उपासनेचा प्रसार करण्याची आज्ञा झाली. प्रापंचीक जिज्ञासुंना अनुग्रह देण्याचा तसेच रामनामाच्या व समर्थांच्या उपदेशाचा प्रसार करण्याची प्रेरणा मिळाली.
अनेकांना त्यांनी रामनामाची दिक्षा दिली. यज्ञयागादी कर्मकांडात गुरफटलेल्या व हठयोगादी कष्टदायक साधनात वाट चुकलेल्या अनेकांना त्यांनी नामस्मरणचा सुलभ मार्ग दाखविला. महाराज १८९० च्या सुमरास गोंदवले येथे स्थिरावले. महाराजांना हिंन्दी कानडी तेलगु व संस्कृत भाषा उत्तम समजत.
श्री महाराजांनी रामरायाला गोंदवल्यास आणून उभा केला. स्वतः त्यावर इतके प्रेम केले की ते नैमिषारण्यात जाण्यास निघाले त्यावेळी रामच्या डोळयात खरोखर अश्रू उभे राहिले. प्रत्येकाल ते सांगत “अरे! माझ्या रामला एकदा डोळे भरून पहा व नंतर घरी जा”. “श्रीराम केवळ मुर्ती नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे.” अशा भावनेने ते वागत व लोकांना उपदेश करत. “प्रत्यक्ष रामला नमस्कार करून यावे व नंतर इतररांना करावा.” आपल्या जिवनातील कि्रया ही रामाच्या करीता व्हावी आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. ज्या प्रपंचात राम नाही त्यात आराम होणार नाही. आपल्या संगतीला येणार्या प्रत्येकाला भगवंताच्या निष्ठेचे व नामाचे महत्व कळले पाहिजे हा त्यांचा अट्टाहास होता. खर्या परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तर्हेच्या गैरसमजुती प्रमाद विपरीत आचार दृढमुल असतात ते दूर करण्याचा प्रचंड खटाटोप त्यांनी जन्मभर केला. निंदकांशीही महाराज प्रेमाने वागत तसेच व्यसनी माणसांनाही त्यांनी भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडले.
“ नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्याचे ध्येय नाही. जनावरे ही प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्र्राप्ती करून घेतली पाहिजे तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थीतीत उपासना करण्यास नामासारखा सोपा उपाय नाही म्हणून प्रत्येकाने नामाचीच कास धरावी.” हेच त्यांच्या शिकवणीचे सुत्र होते. हे तत्व स्वतः पूर्णपणे आचरणात आणून मगच त्यांनी लोकांना सांगितले.
इ.स.१९१३ साली गोंदवल्यास झालेला रामनवमीचा उत्सव म्हणजे श्री महाराजांच्या आयुष्यातील शेवटचा मोठा उत्सव. नऊ दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण किर्तन, पुराण प्रवचन व अध्यात्मसंवाद सुरू होता. प्रत्येकाच्या पाठीवरून हात फीरवून श्री महाराजांनी सांगितले “बाळांनो भगवंताने प्रपंचामध्ये ज्या परिस्थीतीत ठेवले आहे तिच्यामध्ये समाधान मानावे व त्याच्या नामाला कधीही विसरू नये”. “जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे नाम घेणार्याचे राम कल्याण करतो एवढे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका”.
भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्व सांगण्यासाठी जन्माला आले. त्याचेच गायन केले शेवटही नामाचे महत्व सांगण्यात घालवला. श्रीमहाराजांनी जन्मभर काया वाचा व मनाने जगात एका नामाशिवाय दुसरे काही सत्य मानलेच नाही.
शके १८३५ मार्गशीर्ष वद्य दशमीला ह्य २२ डिसेंबर १९१३ हृ सोमवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवल्यासच वयाच्या एकुणसत्तराव्या वषी श्री ब्रम्हचैतन्यांनी जगाचा निरोप घेतला.
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply