![p-95856-Brain-Mapping](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2022/06/p-95856-Brain-Mapping-594x381.jpg)
एखाद्या आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना असते, तिचा शोध मेंदूच्या आरेखनातून घेण्याचा प्रयत्न ब्रेन मॅपिंग चाचणीत केला जातो. या चाचणीला पी-३०० असेही म्हणतात.
ही चाचणी करताना आरोपीच्या डोक्याला सेन्सर म्हणजे संवेदक लावले जातात व त्याला संगणकाच्या मॉनिटरसमोर बसवले जाते. त्याला काही प्रतिमा दाखवल्या जातात तसेच विशिष्ट आवाज ऐकवले जातात. ते गुन्ह्याच्या पार्श्वभूमीशी संबंधित असतात, त्यांचा उद्देश अंतप्रेरणा निर्माण करण्याचा असतो. ही चित्रे पाहून, आवाज ऐकून त्या आरोपीच्या मनात त्याच्याशी साधर्म्य असलेले काही असेल तर मेंदूत पी-३०० लहरी निर्माण होतात व आरोपीच्या डोक्याला लावलेले सेन्सर मेंदूतील अशा विद्युतीय हालचाली टिपत असतात. तपासात मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पूरक म्हणून ही चाचणी वापरली जाते.
यात आरोपीला कुठलेही प्रश्न मात्र विचारले जात नाहीत. अमेरिकी मेंदूविकारतज्ज्ञ डॉ.लॉरेन्स ए. फारवेल यांनी ब्रेन मॅपिंग चाचणी शोधून काढली. त्यालाच ब्रेन वेव्ह फिंगरप्रिंटिंग असेही म्हणतात.
डॉ. फारवेल यांना असे दिसून आले, की गुन्ह्याशी संदर्भ असलेल्या काही प्रतिमा किंवा ध्वनी ऐकवले. मेमरी अँड एनकोडिंग रिलेटेड मल्टिफॅसेटेड इलेक्टो एनसेफलोग्राफिर रिस्पॉन्स म्हणजे एमइएमइआर हा आरोपीच्या मेंदूकडून दिला जातो. यात अशी व्यवस्था केलेली असते, की गुन्ह्याशी संबंधित नसलेल्या ताणामुळे आलेला विद्युतीय प्रतिसाद काढून टाकला जातो त्यामुळे त्याची अचकूता जास्त असल्याचा दावा केला जातो.
या चाचणीत न्यूरोइमेजिंग केले जाते त्याला माहिती विश्लेषणाची जोड दिली जाते. मानवी मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स असतात. ते एकमेकांना संदेश देत असतात. कुठल्याही दृश्याचा किंवा ध्वनीचा अर्थ मागच्या संदर्भाने लावण्याची मेंदूची क्षमता असते. ब्रेन मॅपिंग चाचणी ही बंगलोर येथील फोरेन्सिक लॅबोरेटरीत केली जाते.
ब्रेन मॅपिंग चाचणीची अचूकता ९९.९९ टक्के असते व अमेरिकेत त्याच्या मदतीने काही गुन्हेगारांना शिक्षाही झाली आहे. आपल्याकडे तेलगी प्रकरणात त्याचा वापर करण्यात आला होता. या चाचणीसाठी न्यूरोस्कॅन नावाचे उपकरण वापरले जाते व त्याच्या मदतीने इलेक्ट्रोएनसेफलोग्राम व इव्हेन्ट रिलेटेड पोटेन्शियल अशी दोन आरेखने घेतली जातात व त्यांच्या विश्लेषणाच्या आधारे अहवाल तयार केला जातो. प्राथमिक एनकोडिंग प्रक्रियेच्या वेळी जर मेंदू उद्दीपित झाला, तर त्याचा अर्थ आरोपीचा गुन्ह्यांत सक्रिय सहभाग होता असे समजले जाते.
ब्रेन मॅपिंग चाचणीने राज्य घटनेच्या कलम २०(३) चे उल्लंघन होते असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’ या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर.
Leave a Reply