नवीन लेखन...

ब्रह्मभूषण

गौरव स्त्रीकर्तृत्वाचा – सौ. मेधा वीरकर सौ. अमिता पटवर्धन

आजकाल सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत आणि आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठीत आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा उमटवत आहेत. फक्त पुरुषांचे प्राबल्य असलेल्या उद्योग क्षेत्रातही उद्योजकता आणि कुशलता यांचा संगम साधून नांव कमवीत आहेत.

अशाच फक्त आणि फक्त पुरुषप्रधान व्यवसायात- मुद्रण व्यवसायात गेली २८ वर्षे घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या सौ. मेधा वीरकर..

या लेखाच्या निमित्ताने त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, सौ. मेधाताईंमध्ये जबरदस्त आत्मविश्वास आहे पण आत्मप्रौढीचा लवलेशही नाही.

आपण व्यवसाय करावा असे कसे वाटले? या प्रश्नाला उत्तर देताना त्यानी हसून म्हटले की, इंग्रजीवर असलेले प्रभुत्त्व व टंकलेखन आणि लघुलेखनाचा पूर्ण केलेला कोर्स यामुळे त्यांना विविध मल्टीनॅशनल कंपन्यांतील CEOs करिता कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते काम करता करता त्यांना आपल्यात असलेल्या क्षमतेची जाणीव झाली, आपणही व्यवसाय करु शकतो असे त्याना मनोमन वाटले.

त्यानंतर सौ. मेधाताई व त्यांचे पती श्री. श्रीनिवास यांनी लोअर परेल, मुंबई येथे १९८७ साली स्वतःचा छापखाना (Printing Press) सुरु करुन मुद्रण व्यवसायात पदार्पण केले. इतर व्यवसायात येतात त्याप्रमाणे त्यांनाही अनेकविध अडचणींना तोंड द्यावे लागले. मुद्रण व्यवसाय सुरू केल्यावर, बँकेकडून कर्ज घेताना कसे तयार करायचे, व्यवसायकर, विक्रीकर, आदि. भरणा करतांना लागणाऱ्या बारकाव्यांचे ज्ञान झाले. बदलत्या काळानुसार अत्याधुनिक यंत्रसामुग्रीही बसवून त्यांनी व्यावसायिक मुद्रण (Commercial Printing, Coffee Table Books), कॅलेंडर्स यांच्या मुद्रणाचे काम सुरू केले. बघता बघता त्यांची Kaleido Graphics ही कंपनी नावारुपास आली.

सन १९९९ ते २००६ या काळात सौ. मेधाताईंनी बॉम्बे मास्टर प्रिंटर्स असोसिएशन च्या पदाधिकारी म्हणून काम पाहिले. मुंबई मुद्रक संघाच्या त्या अध्यक्षा आहेत. सौ. मेधाताई नियमितपणे मुद्रण धंद्याच्या फायद्यासाठी सहकाऱ्यांसमवेत सेमिनार्स व कार्यक्रमांचे आयोजन करतात. मुंबई मुद्रक संघाच्या कामाच्या निमित्ताने दर तिमाहीला मिटिंग्जसाठी देशांतर्गत दौरे न थकता करत असताना आपल्या समव्यावसायिक बंधूंच्या अडचणींचे परिमार्जन करण्यासाठी आपण काय करु शकतो, हा विचार सतत त्यांच्या मनात असतो. विशेष म्हणजे या सर्व मिटिंग्जमध्ये त्या एकट्याच स्त्री असतात, त्याचे दडपण येत नाही कां? असे विचारल्यावर त्या खळखळून हसून म्हणतात की “मला जाणवतही नाही. ” इतक्या त्या या व्यवसायात एकरुप होऊन गेल्या आहेत.

पूर्वीच अस्तित्वात असलेल्या CDs अथवा टेबल कॅलेंडर्स स्वरुपात व नवीन धाटणीत सादर करुन अगदी डिझाईन ते फायनल प्रॉडक्ट पर्यंत राबवण्याचे कसब -ज्याला त्यांच्या भाषेत Concept to Print म्हणता येईल, हे सौ. मेधाताईंचे विशेष कौशल्य. ते समजून घेताना आपले औत्सुक्य आणखीनच वाढते. ग्राहकांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच आपल्या कामाची पावती असे त्या मानतात.

मुंबई मुद्रक संघाच्या त्यांच्या अविरत कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली.

सौ. मेधाताईंना उद्योगक्षेत्रातील अनुभव, नेतृत्वगुण आणि उद्योगधंद्यातील व्यापक सहभागासाठी ‘Output Link Communication Group’ च्या वतीने Women of Distinction 2014 हा मुद्रण व्यवसायातील प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराचा मान प्रथमच एका भारतीय स्त्रीला मिळाला. त्याचा पारितोषिक वितरण सोहळा अमेरिकेतील शिकागो येथे पार पडला.

सौ. मेधाताईंच्या जीवनाचा आणखी एक पैलू -आपल्या व्यवसायाव्यतिरिक्तही प्रत्येकाचे एक कलासक्त मन असते आणि त्याची जपणूक करण्याची संधी त्यांना मिळाली. सुप्रसिद्ध गायक कै. पं. भीमसेन जोशी यांचा ‘ सिद्धि’ हा १२ सीडीज चा अल्बम त्यांनी तयार केला. तो एक कृतार्थ अनुभव होता. असे सांगताना तो भाव त्यांच्या चेहऱ्यावरही उमटलेला दिसला. आणि मग गानकोकिळा लता मंगेशकर यांचे पितामह स्व. दीनानाथ मंगेशकरांवर केलेली ‘दिनदर्शिका’ असो वा प्रसिद्ध गायक श्री. हरीहरन यांच्यावर केलेला ‘काश’ हा अल्बम असो, विविध ताल वादक श्री. तौफिक कुरेशी यांचा ‘Tadha’ हा अल्बम असो, अशी जाता जाता एक यादीच तयार केली. माझ्या चेहऱ्यावरील कौतुकमिश्रित भाव पाहिल्यावर त्यांनी सुप्रसिद्ध छायाचित्रकार कै. गौतम राजाध्यक्षांचे ‘चेहरे’, तसेच पत्रकार श्री. निखिल वागळेंची ‘ग्रेट भेट’ ह्या पुस्तकांचे मुद्रणही केल्याचे अभिमानाने सांगितले.

कोणत्याही व्यवसायात स्त्रीला पुढे यायचे असेल तर घरच्यांची व पतीचीही साथ अत्यंत आवश्यक आहे आणि ती त्यांना सदैव लाभतच आहे. त्यांचे पती श्री. श्रीनिवास हे व्यवसायातील संपूर्ण उत्पादनाची व त्याच्या दर्जाची बाजू सांभाळतात आणि सौ. मेधाताई वित्त, प्रशासन व मार्केटिंगची बाजू सांभाळतात. सर्वांच्या सहकार्यानेच या कार्यक्षेत्रात त्या अत्युच्च शिखर गाठू शकल्या.

आपल्या कंपनीतही काही अभिनव कल्पना राबवून त्यांनी कंपनीतील वातावरण अगदी कुटुंबासारखे ठेवले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवाळी फराळाची भेट, तसेच वर्षातून दोन दिवसांची एक सहल काढणे, आदि गोष्टींचा त्यात समावेश आहे, इतकेच करुन त्या थांबल्या नाहीत तर कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीच्या काळात आर्थिक मदत उपलब्ध व्हावी म्हणून कर्मचारी निधी उभारला आहे व त्यांतून त्यांना आर्थिक मदत देण्यात येते. तसेच, त्याची परतफेड करण्याची मानसिकताही त्यांनी कर्मचाऱ्यांत रुजवली असल्यामुळे ते दर महिन्याला स्वखुशीने मासिक वेतनातून परतफेड करीत असतात.

व्यवसायात इतक्या सहजतेने वावरणाऱ्या सौ. मेधाताईंची स्त्रीबद्दलची घरातील भूमिका मात्र गृहिणीला साजेशीच आहे. स्वयंपाकाची बाई न आल्यास कपाळावर आठ्या न घालता ताज्या पोळ्यांसकट घरच्यांना गरम जेवण करुन घालण्याची त्यांना आवड आहे.

अशा या मुद्रण व्यवसायातील चतुरस्त्र, एकमेवाद्वितीय सौ. मेधाताई ! आमचा त्यांना मानाचा मुजरा !! आणि त्यांना उत्तरोत्तर अधिकाधिक मानसन्मान प्राप्त होवोत, अशा मनापासून शुभेच्छा..

– अमिता पटवर्धन
amitaptwrdhn1@gmail.com

स्वयम – मे 2015 मध्ये प्रकाशित लेख…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..