नवीन लेखन...

ब्रह्मांड – एक आठवणे !

तसं पाहिलं तर ब्रम्हांड आठवणे, तोंडचे पाणी पळणे, पायात गोळे येणे, मटकन बसणे, जीव भांड्यात पडणे वगैरे शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकतो, कधीमधी त्यातल्या एखाद्याचा आपल्याला अनुभवही येतो. पण या सगळ्याच्या सगळ्या अवस्थांचा अनुभव पंधरा वीस मिनिटात येणे हे तसे दुर्मिळच. आम्हा उभयतांना मात्र हा अनुभव आला. त्याचं झालं असं –

गोष्ट तशी जुनी … साधारण १९९६ सालातली. तेंव्हा आम्ही वडाळ्याला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वसाहतीत राहत होतो. आम्ही उभयता, माझी आई आणि आमची सव्वादोन अडीच वर्षांची कन्या… रसिका.

आईला डायबिटीस असल्यामुळे चालणे तिच्यासाठी आवश्यक, पण तिला त्याचा विलक्षण कंटाळा. त्यामुळे रोज संध्याकाळी तीन जिने उतरून जबरदस्तीने पाठवावे लागे.

रसिका हायपर अक्टिव आणि हायपर टॉकेटिव्ह असल्याने ती दिवसभर सौ. सेवाला (माझी सौ.) सळो की पळो करून सोडत असे. मग मी संध्याकाळी घरी आलो की ती रसिकाला घेऊन मला बाहेर पिटाळत असे. तेवढाच काय तो तिला शांतपणा मिळे.

त्या दिवशी असंच झालं. आई आणि मी व रसिका थोड्याफार फरकाने खाली गेलो. फिरून परत येताना अगदी मिनिटाभराच्या फरकाने परत बिल्डिंग खाली आलो. योगायोगाने समोरच्या बिल्डिंगमधला ७-८ महिन्यांचा झीशान त्याच्या अब्बांच्या कडेवर बसून खाली आला होता. फारच गोड मुलगा. त्याला कडेवर घ्यायचा मोह झाला. “चलो घूमने” म्हणून सहज हात पुढे केला, तर आला पटकन हात काढून.

जिना चढणाऱ्या आईला मी पटकन हाक मारली, आणि रसिकाला घरी घेऊन जायला सांगितलं. इकडे “आजीबरोबर घरी जा” म्हणून रसिकाला सांगितलं, आणि रसिका आजीबरोबर वर येतेय म्हणून गॅलरीत उभ्या असलेल्या सेवाला खूण करून सांगितलं. मग रसिका जिना चढायला लागल्याचे पाहून मी झीशानला घेऊन बिल्डिंगला चक्कर मारायला निघालो.

एवढीशी बिल्डिंग ती. आई संथ गतीने.. थांबत थांबत तीन मजले चढून दाराची बेल वाजवेपर्यंत मी परत पण आलो होतो. झीशानला त्याच्या आजीच्या हवाली करून त्याच्या वडीलांशी बोलत थांबलो.

इकडे बेल वाजली म्हणून सौ. सेवाने दार उघडलं. आजीबरोबर रसिका नाही हे बघून तिनं खाली मला हाक मारली आणि रसिका कुठाय म्हणून विचारल. मी म्हटलं “आई बरोबर वर आली”.
“नाही, ती परत खाली गेली”
“छे, खाली नाहिये ती!”

क्षणार्धात परिस्थितीचं गांभिर्य लक्षात आलं! थोडक्यात… रसिका हरवली होती. ‘ब्रम्हांड आठवणे’ म्हणजे काय ते त्या क्षणी अनुभवलं.

पुढच्या सगळ्या घटना अतिशय वेगाने घडल्या. मी आणि झीशानच्या बाबांनी मोटरसायकली काढल्या. किक् मारता मारता कोणी कोणत्या दिशेला शोधायला जायचं ते ठरवलं आणि आम्ही शोधायला निघालो, आणि दोघंही अर्धी अर्धी कॉलनी शोधून पाचच मिनिटांत परत आलो.

इकडे रसिका हरवल्याचं लक्षात येताच सेवाही चप्पलही न घालता तीरासारखी खाली धावली, आणि टोचणाऱ्या खड्या-दगडांची पर्वा न करता तिला हाका मारत बिल्डिंगच्या भोवती शोधून आली. आम्ही दोघं हात हलवत परतल्याचं पाहून मटकन खालीच बसली.

एवढी लहान मुलगी कोणाच्या घरी जाईल ही शक्यताच नव्हती. डोक्यात नाना शंका येऊ लागल्या. कोणी पळवलं तर नसेल, रेल्वे लाईनमधे तर गेली नसेल….. कारण आमच्या कॉलनीच्या दोन्ही बाजूला रेल्वे लाईन्स होत्या. एका बाजूला मध्य रेल्वेची हार्बर लाईन तर दुसऱ्या बाजूला पोर्ट ट्रस्टचं रेल्वे यार्ड.

रेल्वेची आठवण होताच एक आठवलं. आमच्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला हार्बर लाईनवरचा फूट ओव्हर ब्रिज होता, आणि त्यावर चढायचा रसिकाला नाद होता. ही पुलावरून पलिकडे तर गेली नसेल? मी पटकन मोटरसायकल स्टँड केली, झीशानच्या बाबांना यार्डात नजर टाकायला सांगितली, आणि पुलाकडे धाव घेतली.

स्वत:चं जवळपास ८५ किलोचं वजन घेऊन धावत पूल चढणं साधं नव्हतं. पण त्या क्षणी मी तो पूल चढलो आणि धावतच पलिकडे गेलो. रेल्वे लाईनला लागूनच पलिकडच्या बाजूला लांबलचक झोपडपट्टी होती…. आजही आहे. धावता धावता मनात शंका…. कोणी तिला पळवून झोपडपट्टीत तर लपवलं नसेल? काळजाचा ठोका चुकला. मनावर अतोनात ताण घेऊन मी धावतच जिना उतरून पलिकडच्या छोट्याश्या मैदानावर आलो आणि….. हुश्श्श….!

रसिका तिथल्या वाळूच्या ढिगावर खेळत होती. पटकन पुढे होऊन तिला उचलून कडेवर घेतलं, आणि तितक्याच वेगानं मागे फिरलो. पुलाच्या दुसऱ्या टोकाला सेवा डोळ्यात प्राण आणून तिची वाट पहात असणार याची मला कल्पना होती.

पूल उतरून रसिकाला सेवाच्या हातात देताच तिला रडू फुटलं. स्वाभाविकच होतं म्हणा ते!

“बाळा, कुठे गेली होतीस? म्हणून सेवानं विचारलं तर म्हणते -” अग, आपले बाबा हलवले होते ना म्हणून मी शोधायला गेले होते”.

सगळा मिळून १५-२० मिनिटांचा एपिसोड. पण त्याची आठवण झाली की आजही अंगावर काटा येतो.

— संजीव सदाशिव गोखले 

Avatar
About संजीव सदाशिव गोखले 8 Articles
मी ज्येष्ठ नागरिक असून अधून मधून लिहित असतो, नियमित लेखक होण्याची मनीषा असली तरी अजून झालेलो नाही. यापूर्वी मी आनंदवन हेमलकसा सोमनाथ प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याबाबत फेसबुक वर लिहिले आहे. माझ्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेबद्दल मी केलेले लेखन ""ब्रह्मांड – एक आठवणे"" या शीर्षकाखाली दैनिक सकाळच्या मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झाले आहे. २००४ साली मी मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून स्वेच्छा निवृत्त झालो.तेंव्हापासून वास्तव्य पुणे. थोडीफार लेखनाची आवड आहे. कोणत्या एखाद्या खास विषयावर नाही, जे सुचेल ते लिहितो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..