नवीन लेखन...

ब्रेकींग न्यूज – ढोणी इडली खातोय!

Breaking News - Dhoni is eating idlis

नुकताच मी टीव्ही लावला होता आणि कुठे काही चांगला कार्यक्रम आहे का ते पाहात होतो. चॅनल बदलता बदलता एका अतिप्रसिध्द चॅनलवर अचानक ब्रेकींग न्यूज झळकली ‘ढोणी इडली खातोय’. म्हटलं बघूया तर हे काय प्रकरण आहे ते. तेवढ्यात स्टुडीओत सादरकर्ती माया अवतरली.

मायाः प्रेक्षकहो, आताच आमच्या बंगळूरू येथील वार्ताहराकडून आम्हाला ब्रेकींग न्यूज मिळाली आहे कि साक्षात ढोणी आत्ता इडली खात आहे. चला तर बंगळूरू येथे आमच्या वार्ताहराकडून अधिक माहिती घ्यायला. राजू ,जरा आम्हाला सविस्तर माहिती दे.

(राजू हे नाव ऐकताच मी शेअरबाजारात गुंतवणूक करत नसताना वा स्वतः सीए नसताना देखील दचकलो. पण हा राजू वेगळा दिसत होता.)

राजूः आता सकाळच ९ वाजून ५० मिनिटे झालेली आहेत. हा बंगळूरूमधील महात्मा गांधी रोड आहे. त्यावरील नित्यानंद हॉटेलच्या बाहेर आम्ही उभे आहोत. माया.

मायाः तुम्ही तिथे काय करत आहात?

राजूः आताच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ढोणी या हॉटेलात शिरला आहे. हॉटेलच्या सूत्रांकडून आम्हाला आताच माहिती मिळाली आहे की त्याने इडलीची ऑर्डर दिली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता त्याचे इडली खाणे आम्ही लाइव्ह दाखवणार आहोत. माया.

मायाः पण त्याने इडलीचीच ऑर्डर का दिली?

राजूः त्याचा नाश्ता झाल्यावर आम्ही त्याला हा प्रश्न नक्की विचारू. चला आपण आता आतमध्ये जाऊ. हा कॅश काउंटर. इथून पुढे गेल्यावर तिकडच्या कोपर्यात तो ढोणी बसलेला दिसत आहे. वेटरने आताच त्याच्यासमोर गरमागरम इडली आणून ठेवली आहे. आता वेटर सांबार आणि चटणी ठेवत आहे. ढोणीने आता डाव्या हातात काटा आणि उजव्या हातात चमचा धरलेला आहे. त्याने आता इडलीचा पहिला तुकडा मोदून तो सांबारात बुडवलेला आहे आणि आता त्याने तो तुकडा खायला सुरुवात केलेली आहे.

मायाः प्लेटमध्ये किती इडल्या आहेत?

राजूः तीन. इथे कर्नाटकात बहुतेक ठिकाणी तीन इडल्या दिल्या जातात. महाराष्ट्रात मात्र बहुतेक ठिकाणी दोनच दिल्या जातात.(यानंतर शेवटच्या तुकड्यापर्यंत ढोणी कसा इडली खात आहे हीच कॉमेंटरी सुरू राहते.)

राजूः आताच हॉटेलच्या सूत्रांकडुन अशी माहिती मिळालेली आहे कि त्याने इडलीची आणखी एक प्लेट ऑर्डर केली आहे.

मायाः त्याने दुसरी प्लेटपण इडलीचीच ऑर्डर का दिली?

राजूः याचे कारण झारखंडमध्ये इडली मिळत नाही.

मायाः मग झारखंडमध्ये काय मिळते?

राजू ः ढोणीला विचारुन सांगतो!

मायाः बर आता आम्हाला पुढं काय होतय ते सांग.

राजूः ढोणीने आता दुसर्या प्लेटमधील इडली खायला सुरुवात केली आहे. (तेच दळण कॉफी पिण्यापर्यंत सुरू.)

राजूः आता ढोणी बाहेर पडत आहे. आता त्याच्याकडून आपण अधिक माहिती घेऊ. पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचे सोडून तू इथेच कसा आलास?

ढोणीः पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्यासारखे बरेच लोक येत असतात त्यामुळे त्यांना आमचे कौतुक नसते. इथे आम्हाला राजासारखी वागणूक मिळते वर बिलही द्यावे लागत नाही!

राजूः म्हणजे राजासारखी वागणूक मिळावी अशी तुझी अपेक्षा असते?

ढोणीः मलाच काय, सर्व क्रिकेटपटूंना वाटते की ते राजेच आहेत.

राजूः तुला पद्म पुरस्कार मिळाला तरी तू घ्यायला गेला नाहिस?

ढोणीः मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही राजे आहोत. आमच्या एकेक मिनिटाची किंमत हजारो रुपये असते. त्यातून जाहिराती करणे आणि क्रिकेट खेळणे यातून आम्हाला खूप पैसा कमवायचा असतो कारण त्यातूनच आमचे राजेपण टिकणार असते. मग त्या किरकोळ रकमेच्या पद्म पुरस्काराची काय कथा? त्यातून आम्ही राजे आहोत हे सरकार ध्यानात घेत नाही. कोण कुठले शास्त्रज्ञ, कलाकार अशा फालतु लोकांबरोबर आम्ही सत्कार करून घ्यावा अशी सरकारची अपेक्षा. ते आम्हाला कसे चालणार? सरकारने असे समारंभ आमच्या सवडीने व आम्ही सांगू तसे आयोजित केले तर सरकारवर उपकार म्हणून आम्ही असे पुरस्कार स्वीकारू. हे दाखवून देण्यासाठीच यावेळी जेव्हा दोन सामन्यांसाठी माझ्यावर बंदी आली आणि शूटींगही नव्हते तेव्हा मी हा पुरस्कार स्वीकारला.

राजूः पण सरकार तर जनतेचे प्रतिनिधी असते.

ढोणीः अहो या देशात लोक सरकारपेक्षा आम्हाला जास्त मानतात. आम्ही पैशासाठी खेळतो असे असूनही लोक आम्ही देशासाठी खेळतो असे समजतात. आम्हाला पैसा मिळावा म्हणून स्वतःचा कामधंदा सोडून आणि स्वतःचे पैशाचे नुकसान करून घेऊन लोक खेळ बघतात. राजेशाहीत दुसरे काय असते? आमचा प्रायव्हेट क्लब आहे, तो संघ निवडतो, सगळे निर्णय घेतो आणि सरकार निमुटपणाने तो देशाचा संघ म्हणून स्वीकार करते. बाकी सर्व खेळांच्या बाबतीत सरकारला अधिकार आहे पण आमच्याबाबतीत नाही. आमच्या क्लबचे पदाधिकारी खूपच पॉवरफूल आहेत त्यामुळेच आम्ही वाटेल तसे वागू शकतो. आमचा दरारा फक्त भारतातच नाही तर जगभर आहे. अंमली पदार्थविषयक चाचणीला संपूर्ण जगात फक्त आम्हीच विरोध केला आणि आमच्या क्लबने आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला. दुसरे उदाहरण. एका माजी क्रिकेटपटूला परकीय चलन बाळगल्याबद्दल सरकार काही करू शकलं नाही तिथे आम्ही तर आजचे क्रिकेटपटू आहोत. मग आम्ही राजेपण मिरवले तर कुठे बिघडले?

राजूः आता आणखी एक प्रश्न.

ढोणीः आता शूटींगला जायचे आहे त्यामुळे बास.

राजूः ढोणी आता गेलेला आहे. त्याने मुलाखतीत जे सांगितले त्याचा सूज्ञ प्रेक्षकांनी विचार करावा. भारतात आपण सर्वच क्षेत्रात व्यक्तीपूजेचे स्तोम माजवले आहे. ते ज्यादिवशी कमी होइल तो सुदिन. कॅमेरामन दिपकबरोबर राजू अमुक चॅनलसाठी.

(वरील सादरीकरणात कुणाला सत्य घटना आढळल्यास तो योगायोग समजावा.)

— कालिदास वांजपे

Avatar
About कालिदास वांजपे 11 Articles
कालिदास वांजपे हे प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी असून ते वित्तपुरवठा, कायदेशीर कागदपत्रांचे ड्राफ्टिंग आणि कंपनी लॉ या विषयात सल्ला सेवा देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..