नेव्हिगेशनल ब्रिज ला ब्रिज का म्हणतात हे मला अजूनसुद्धा कळलं नाही. जहाजावर कार्गो लोड किंवा ऑफलोड झाला की जहाज जेव्हा पुढच्या सफरीवर निघतं तेव्हा जहाजाचा मार्ग दिशा आणि वेग हे सर्व नेव्हिगेशनल ब्रिजवरून नियंत्रित केले जाते.
मी इंजिनीअर असल्याने ब्रिजवर किंवा तिथल्या कामाचा फारसा संबंध नसतो त्यामुळे तिथे येणेजाणे सुद्धा फारच कमी असतं. डेक ऑफिसर हे कॅप्टनच्या नेतृत्वात नेव्हिगेशनल ब्रिज सांभाळतात तर सर्व इंजिनीयर चीफ इंजिनियरच्या नेतृत्वात इंजिन रुम सांभाळतात. इंजिन रूम मध्ये जनरेटर, मेन इंजिन आणि इतर अनेक मशीनरी असतात. जहाजावर असंख्य कामे सुरू असतात पण प्रत्येक कामासाठी इंजिन रूम मधील सगळ्या मशिनरी वर अवलंबून राहावे लागते. जहाजाचा वेग कमी जास्त करणे ,कार्गो लोंडिंग ,ऑफ लोंडिंग आणि इतर सर्व कामे प्रत्येक वेळेस डेक ऑफिसर आणि इंजिनीयर एकमेकांशी ताळमेळ साधत पूर्ण करत असतात.
सुट्टी असली किंवा ऑफ ड्युटी असलो कि क्वचितच ब्रिजवर जायची ईच्छा व्हायची. पण जहाज जेव्हा जेव्हा किनाऱ्याजवळ, एखाद्या बेटाच्या जवळून जात असेल किंवा अमेझॉन आणि इतर नद्यांमधून जात असेल तर ब्रिजवर गेल्याशिवाय चैन पडत नाही.
खोल समुद्रात जेव्हा जहाज फुल स्पीडने जात असतं दूर दूरवर कुठेही जमीन दिसत नाही, जमीनच काय तर एखादं दुसरं जहाज सुद्धा दिसत नाही. दिवसा फक्त निळाशार अथांग समुद्र आणि जिकडे नजर जाईल आणि पोहचेल तिथपर्यंत निरभ्र आकाश पाण्याला टेकलेले दिसतं. त्यावेळेस जहाजाच्या पुढच्या टोकावरून जहाजाच्या वेगामुळे संपर्कात येणाऱ्या लाटांच्या निळ्याशार पाण्यापासून निघणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फेसाचा आणि बुडबुडयांचा होत असलेल्या उगमाचे दृष्य पाहून आपलं जहाज जणू काही या अथांग निळ्या सागराला कापत कापत पुढे पुढे जात असल्याचा भास होत राहतो.
निळ्या पाण्यापासून तयार होणारे फेसळणारे बुडबुडे जहाजाच्या पुढच्या टोकापासून जहाजाला चिकटल्याप्रमाणे रांगत रांगत येऊन मागे मागे सरकत जातात आणि जहाज पण त्या सर्वांना मागे सारून पुढे पुढे जात राहतं.
ब्रिजवर गेल्यावर दरवाजे बंद असतील तर टाचणी पडल्याचा सुद्धा आवाज यावा एवढी शांतता असते. ब्रिजच्या बाहेरील भागास ब्रिज विंग म्हणतात खरं म्हणजे पक्ष्याच्या पंखाप्रमाणेच हे ब्रिज विंग दोन्ही बाजूला पसरलेले असतात त्यांच्यावर छप्पर नसते ब्रिज विंग वरून जहाजाच्या दोन्ही बाजू म्हणजे पोर्ट आणि स्टारबोर्ड साईडला जाऊन खाली पाण्यापर्यंत पाहता येत. ब्रिज विंग वर गेल्यावर फक्त पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज ऐकायला येतो. सतत घोंघावणारा वारा आणि जहाज आणि लाटांच्या घर्षणासोबतच उंच लाटेवरून जहाज आदळत असल्याचा चमत्कारिक आवाज ऐकताना जहाजाच्या वेगाला पाणी आणि वाऱ्याच्या आवाजाची कशी छान साथ लाभते याचा अनुभव येतो. जेवढा वेग जास्त तेवढा आवाज पण जास्त. कधी कधी तर वारा एवढा जोराचा असतो की दोन्ही हाताने धरून उभे राहणे सुद्धा शक्य नसते. अशा वेळी फेसाळणारे बुडबुडेसुद्धा उंच उंच उडत येतात आणि वाऱ्यासोबत पसरत असतात. रात्री ब्रिजवर सगळ्या लाईट्स बंद करून अंधार केलेला असतो तस केले नाही तर ब्रिजच्या काचांवर लाईट पडल्यामुळे बाहेरच्या काळोखात काहीच दिसत नाही. रात्री जहाजे पोर्ट ला लाल आणि स्टारबोर्ड साईडला हिरवा दिवा आणि पुढे व मागे एक एक असे 4 दिवे लावून जात असतात. हे दिवे खूप लांबून दिसण्यात यावे याकरिता तशी योजना केलेली असते.
काळ्याकुट्ट अंधारातून जहाज जात असताना रात्रीच्या वेळेस फक्त वाऱ्याचा आणि पाण्याचा एवढाच आवाज ऐकायला येत असतो. निरभ्र आकाश असेल तर असंख्य तारे व तारका अत्यंत शोभून दिसतात. चंद्राचा दुधाळ प्रकाश संपूर्ण सागरावर पसरलेला दिसतो. बाहेर ब्रिज विंगवर येऊन पाण्याकडे पाहिलं तर जहाजामुळे पाण्यात होणारी अस्पष्ट हालचाल दिसते पण आवाज मात्र स्पष्टपणे जहाजाच्या वेगाची जाणीव करून देत असतो. पौर्णिमेच्या रात्री तर समुद्रात जहाजासोबत आपण सुद्धा चंद्राच्या दुधाळ प्रकाशात न्हाऊन निघतोय अस वाटल्याशिवाय राहत नाही. लख्ख सूर्यप्रकाशाप्रमाणे लख्ख चंद्रप्रकाशसुद्धा असतो याची खात्री पौर्णिमेच्या रात्री जहाजावरून समुद्राच्या पाण्यात पडलेल्या दुधाळ प्रतिबिंबामुळे पडल्याशिवाय रहात नाही.
भूमध्य समुद्रात असंख्य लहान मोठी बेटे दुर्बिणीतून न्याहाळताना आणि त्या बेटांवरील निसर्ग सौंदर्य पाहून आनंद वाटायचा. एखाद्या लांब असणाऱ्या जहाजाला दुर्बिणीतून बघत बघत त्याच्या जवळ प्रत्यक्ष जायला कित्येक तास लागतात कारण दोन्ही जहाजाच्या वेगात फक्त थोडासाच फरक असतो. लांबून दिसणारी धूसर व अस्पष्ट आकृती जहाज जस जसे पुढे पुढे जाते तस तशी स्पष्ट आणि विशाल होत जाते. रात्री किनारा जवळ आला की आकाशात किनाऱ्यावरील लाईटचा अंधुकसा पिवळा उजेड दिसायला लागतो जेवढे मोठे शहर तेवढा जास्त उजेड आकाशात दिसतो.
जहाजावर खालाशांकडून ऐकलेल्या भुताखेतांच्या गोष्टी आणि समुद्रातील किस्से यामुळे अमावस्येच्या रात्रीचा भयाण काळोख अजूनच भयानक वाटत राहतो. ब्रिजवरील निरव शांतता सोडून जस जसे खाली येऊ लागतो तस तस इंजिनाची घर घर जाणवत जाते.
©प्रथम रामदास म्हात्रे,
मरीन इंजिनीयर,
कोन, भिवंडी,ठाणे.
Leave a Reply