प्रास्ताविक :
बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा.
महाराष्ट्राबद्दल थोडेसें :
आज महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे. पण या भूभागाला ‘महाराष्ट्र’ हे नांव पडलें कसें ?
याविषयी इतिहासाचार्य राजवाडे यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे. तिचा गोषवारा आपण जाणून घेऊं या.
राजा ज्या भूमीवर राज्य करतो, त्या भूमीला पुरातनकालीं राष्ट्र म्हणत. ‘ऐत्तरेय ब्राह्मणा’ मधे अकरा प्रकारचे नरपति व राज्यें वर्णली आहेत. त्यातील ‘माहाराज’ म्हणजे इतर राजांहून मोठा राजा. पाणिनीकाळीही ‘महाराज’ / ‘माहाराज’ या शब्दाचा तोच अर्थ होता. त्या माहाराजांचे जे जन, ते लोक ‘माहाराजिक’ अथवा ‘माहाराष्ट्रिक’. हे माहाराष्ट्रिक जरी पुरातनकालीं मगध सम्राटाचे अनुयायी होते, तरी ते मगधदेशात रहाणारे नव्हते. ते मूळचे हिमालयापलिकडील लोक होते, व त्यांना माहाराजिक ही उपाधि होती. उत्तरबौद्धकाळीं यांच्यापैकी अनेक समूहांनी दक्षिणारण्यात स्थलांतर करून वसाहती केल्या. माहाराष्ट्रिकांप्रमाणेंच ‘राष्ट्रिक’ नांवाचे लोकही त्याच काळीं दक्षिणेत उतरले. ह्या राष्ट्रिक लोकांचा मूळ देश कुरुपांचाल होता. त्या भागातील राजांच्या राज्याला त्या काळी राष्ट्र ही संज्ञा असे, व तेथील लोकांना राष्ट्रिक हे अभिधान असे. त्याच काळात आणखी एक जनसमूह दक्षिणेत उतरला, तो होता वैराष्ट्रिक. हे लोकही मूळचे हिमालयापलिकडील, उत्तरकुरु व उत्तरभद्र या देशांमधले होते. ते पुढे (पंजाबातील) मत्स्यदेशात विराट् नामक राजांच्या प्रदेशात येऊन स्थायिक झालेले होते. विराटांच्या राज्याला विराष्ट्र म्हणत व तेथील लोकांना वैराष्ट्रिक. ध्यानात ठेवूं या की, या सर्व जनसमूहांचें दक्षिणेकडील स्थलांतर दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी झालेलें आहे.
म़ाहाराष्ट्रिक, राष्ट्रिक व वैराष्ट्रिक या तिघांचे दक्षिणेकडील प्रदेश जवळजवळच होते. कालांतरानें, माहाराष्ट्रिक, राष्ट्रिक व वैराष्ट्रिक या तिघांच्या भागांना मिळून ‘त्रिमहाराष्ट्र’ असें नांव पडलें. त्यानंतरच्या काळात, माहाराष्ट्रिकांचें राजकीय/सामाजिक/सांस्कृतिक प्राबल्य अथवा प्राधान्य होऊन, येथील सर्वांना ‘माहाराष्ट्रिक’ ही एकच संज्ञा लागू झाली. त्यामुळे या सर्व भागाला ‘माहाराष्ट्र’ अथवा ‘महाराष्ट्र’ म्हणूं लागले. प्राकृतात, या प्रदेशास ‘महारट्ट’, व लोकांना ‘महरट्टे’ अथवा ‘मरहट्टे’, असें रूप झालें. ‘महाराष्ट्री’ भाषा हें या भागातील तत्कालीन प्राकृतचें नांव आहे.
महाराष्ट्रीयत्व :
महाराष्ट्रीय म्हणजे केवळ, ‘महाराष्ट्र नामक भूभागात रहाणारे’, असा अर्थ कोणालाच अभिप्रेत नसतो. महाराष्ट्रीय म्हणजे, ‘महाराष्ट्रधर्म मानणारे लोक’. ‘महाराष्ट्रधर्म’, आणि आधुनिक काळात प्रचलित असलेला ‘महाराष्ट्रीयत्व’, हे दोन्ही शब्द, समान-अर्थी समजायला हरकत नाहीं.
महाराष्ट्रधर्म या शब्दातील ‘धर्म’ म्हणजे ज्याला इंग्रजीत ‘रिलिजन’ म्हणतात, तो नव्हे. महाराष्ट्रधर्म हा शब्दप्रयोग ‘महिकावतीची बखर’ या ग्रंथात सर्वप्रथम सापडतो. (महिकावती म्हणजे माहिम). या ग्रंथाचा मूळ भाग केशवाचार्य यांनी शके १३७० च्या फाल्गुनात, म्हणजे इ.स. १४४८ मध्ये रचला. कांही भाग नंतर सामील केला गेला. म्हणजेच, गेली ५५० वर्षें हा शब्द वापरला गेल्याचा लिखित पुरावा आहे. अर्थातच, तो त्याआधीही मौखिक स्वरूपात वापरात आलेला असूं शकेल. केशवाचार्यानें वर्णिलेला महाराष्ट्रधर्म हा प्रवृत्तिप्रधान कर्तव्यवाचक शब्द आहे.
परंतु, ‘महाराष्ट्रधर्म’ असा उल्लेख आला की आपल्याला मुख्यत्वें समर्थ रामदास स्वामी यांनी वापरलेला शब्दप्रयोग आठवतो. शिवाजी महाराजांना रामदासांनी पाठविलेल्या पत्रात, ‘महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं । तुह्यांकरितां ।’ असे शब्द आहेत. महाराजांच्या निधनानंतर संभाजीला पाठविलेल्या इ.स १६८१ च्या पत्रातील रामदासांचें वाक्य तर प्रसिद्धच आहे – ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।’. रामदासांनी महाराष्ट्रधर्म या संकल्पनेचें निरूपण केलें आहे. त्यांनी या शब्दाला अधिक व्यापक अर्थ दिला. इसवी सनाच्या सतराव्या शतकात महाराष्ट्रधर्माला आचाराचें अधिष्ठान दिलें शिवाजी महाराजांनी, तर विचारांचें अधिष्ठान दिलें समर्थांनी. १८ व्या शतकातील बखरींत व इतर पुस्तकांमध्येही महाराष्ट्रधर्म हा शब्दप्रयोग आढळतो. नंतरच्या काळात, न्यायमूर्ती रानडे, इतिहासाचार्य राजवाडे वगैरेंनीही याचें विवेचन केलेलें आहे.
तेव्हां, ‘महाराष्ट्रीय’ म्हणजे, ‘ज्यांच्या हृदयात महाराष्ट्रधर्म (महाराष्ट्रीयत्व) स्थित आहे असे लोक’, असा अर्थ गेली ३००-३५० वर्षें अभिप्रेत आहे.
ऐंशी वर्षांपूर्वी एका वेगळ्या संदर्भात, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘त्व’कारान्ती शब्द निर्माण करून एक व्याख्या बनवली होती. (तो एका भिन्न लेखाचा विषय आहे. प्रस्तुतच्या या लेखात फक्त त्याच्या अनुषंगानें आपल्याला आपला मुद्दा स्पष्ट करायचा आहे). त्या परिभाषेचा आधार घेऊन आपल्याला महाराष्ट्रीयत्व म्हणजे काय, याची व्याख्या करता येईल. महाराष्ट्रीयत्व कोणाकडे आढळतें ? महाराष्ट्र ही ज्यांची पितृभूमि आहे, म्हणजे ज्यांचे पूर्वज महाराष्ट्रातील आहेत ; एवढेंच नव्हे, तर, महाराष्ट्र ही ज्यांची पुण्यभूमि (म्हणजेच, पूज्यभूमि) आहे, ज्यांच्या हृदयात महाराष्ट्रीय परंपरेला अतिशय महत्वाचें स्थान व तीबद्दल पूज्यभाव आहे, त्या जनांच्या अंतरंगात महाराष्ट्रीयत्व आहे, असें प्रतिपादन करण्यांस प्रत्यवाय नसावा. ही व्याख्या सांस्कृतिक आहे, हें आपण ध्यानात ठेवलें पाहिजे. थोडासा विस्तार करून असें म्हणतां येईल की, महाराष्ट्र ही पितृभूमि असलेले लोक, व ज्यांच्या हृदयात ज्ञानेश्वर-तुकाराम-रामदास, शिवाजी-संभाजी-पहिला बाजीराव-महादजी शिंदे, फुले-टिळक-आगरकर-महर्षी कर्वे-आंबेडकर, कोल्हापुरचे
शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव महाराज, अशा उज्वल, दैदीप्यमान मराठी परंपरेबद्दल पूज्यभाव आहे, ते सर्व लोक ‘महाराष्ट्रीय’ आहेत, ते महाराष्ट्रीयत्वाच्या कसोटीला उतरतात.
बृहन्महाराष्ट्र :
आपण आधीच पाहिलें आहे की बृहन्महाराष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे. बृहन्महाराष्ट्रीय-जन म्हणजे, महाराष्ट्र या भूभागाबाहेर पसरलेले, व हृदयात ‘महाराष्ट्रधर्म’ असलेले महाराष्ट्रीय लोक. महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीय लोक पसरले कसे, याची साधारण कल्पना आपल्याला असतेच. त्याचा थोडासा ऐतिहासिक आढावा घेऊं या.
ही प्रक्रिया मुख्यत्वें मध्ययुगात झालेली आहे, याची कारणें मुख्यत: राजकीय आहेत. मध्ययुगात अनेक सरदार, व पर्यायानें त्यांचे सैनिक, इतर कर्मचारी अन् नोकर, हे आदिलशाही, कुतुबशाही व मोगल, आणि कालान्तरानें निजाम, यांच्या पदरीं होते. अर्थातच, त्यांच्यापैकी कित्येकांचें रहाणें महाराष्ट्राबाहेर झालें, व ते तिकडेच स्थायिकही झाले. शहाजी महाराज बंगलोरला स्थायिक झाले होते, आणि त्यांच्या वंशजांची दुसरी पाती नंतरच्या काळात तंजावरला राज्य करूं लागली. निजामाच्या राज्यात विदर्भ व मराठवाडा तर सामील होताच, पण त्याची राजधानीही आधी औरंगाबाद येथें होती. ती नंतरच्या काळात हैदरबादला हलवली गेली. या कारणांमुळे, आपल्याला कर्नाटक, तामिळनाडु, आंध्र (खास करून हैदराबाद) या भागात महाराष्ट्रीय जन आढळतात.
पेशव्यांच्या काळात, म्हणजे इ.स. च्या १८ व्या शतकात, मराठ्यांनी महाराष्ट्रधर्म भारतभर पसरविण्यासाठी राजकारण केलें. त्यामुळे मराठे, दक्षिण व मध्य गुजरात म्हणजेच बडोद्याभोवतालचा भाग, माळवा म्हणजेच इंदूर-उज्जैन-धार यासभोवतीच्या भाग, मध्य प्रदेशाचा सागर, ग्वाल्हेर वगैरे भाग, झाशीसारखा बुंदेलखंडाचा भाग, इथें पसरले. दिल्लीमधे मुघलांच्या दरबारीं मराठ्यांचा वकील होता, आणि अर्थातच त्याच्यासमवेत त्याचा जामानिमा होताच. त्याच काळात नागपुरकर भोसल्यांच्या सैन्यानें बंगाल-ओडिसालासुद्धा धडका दिल्या. मराठ्यांचे सैन्य पश्चिम उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, या भागात सर्वत्र संचार करत होतेंच. १७६१ च्या पानिपतच्या पराजयानंतर बरेच मराठे महाराष्ट्रात परतलेच नाहींत, ते उत्तरेतच स्थायिक झाले. पुढे, पेशवाई सोडल्यानंतर पेशवे कानपुरजवळ बिठूर येथें राहूं लागले. या सर्व कारणांमुळे, उत्तरेकडील प्रदेशात आपल्याला महाराष्ट्रीय जन स्थायिक झालेले दिसतात.
शिक्षण अथवा पुजारी, संस्कृतचे गुरू वगैरे उपजीविका, या कारणांनी मध्ययुगात ( व नंतर ब्रिटिश कालखंडातही) मराठी जन काशी, मथुरा, काटमांडू वगैरे शहरांमधे स्थायिक झालेले होते. आग्याहून सुटकेच्या वेळी शिवाजी महाराज संभाजीला मथुरेस महाराष्ट्रीय कुटुंबात मागे ठेवून महाराष्ट्रात परतले होते ; तसेंच राज्याभिषेकासाठी त्यांनी काशीहून गागाभट्ट यांना पाचारण केलें होतें, या घटना प्रसिद्ध आहेत.
ब्रिटिश राजवटीत, खास करून राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आल्यानंतर, बरीच मराठी मंडळी तिकडे नोकरीनिमित्त राहूं लागली. तेंच पुढे स्वातंत्र्यानंतरही झाले. तसेंच, ब्रिटिशकालीन बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणजेच मुंबई प्रांत या भूभागात (ज्यात महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, उत्तर-कर्नाटक, सिंध वगैरे सामील होता), नोकरीच्या निमित्तानें महाराष्ट्राबाहेर गेलेली कांहीं मंडळी तिकडेच स्थयिक झाली. तसेंच, ब्रिटिश काळात मॉरिशस वगैरे भागात, व आधुनिक काळात भारताबाहेर युरोप, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांमधे नोकरी-धंदा याकारणानें बरीच मंडळी स्थायिक झालेली आहेत.
अशा प्रकारें, आपल्याला गेल्या ४०० वर्षांमधे महाराष्ट्राबाहेर पसरलेल्या ‘बृहन्महाराष्ट्राची’ कारणमीमांसा करतां येते. ही बृहन्महाराष्ट्रीय मंडळी ‘महाराष्ट्र’ या भूभागाच्या बाहेर जरी रहात असली, तरी त्यांचें महाराष्ट्रप्रेम, त्यांचे महाराष्ट्रीयत्व जागें असतें, त्यांच्या मनांत मराठी संस्कृती जागृत असते, त्यांच्या हृदयांत ‘महाराष्ट्रधर्म’ तेवत असतो.
मी स्वत: शिक्षण व नोकरीनिमित्तानें वीसएक वर्षें महाराष्ट्राबाहेर राहिलेलो आहे. आणि, वरील अनुभव मी स्वत:ही अनेकदा घेतलेला आहे.
आणखी कांहीं उदाहरणें व थोडी चर्चा :
पूर्वी मी नोकरीतील कामानिमित्त रायपुरला जात असे. तेथें माझी ओळख एका म्युनिसिपल इंजिनियरशी झाली. आडनांवावरून तर तो महाराष्ट्रीय वाटत होता, पण तो माझ्याशी बोलत मात्र असे हिंदीत व क्वचित इंग्रजीत. कांहीं महिन्यांनी ओळख वाढल्यावर मी त्याला याबद्दल विचारलें असतां, तो म्हणाला, ‘हमारे पुरखे भोसला राजा (म्हणजे, नागपुरकर भोसले) की सेनाके साथ बंगाल जाते रहते थे; आखिरकर वे इधरही (रायपुर भागात) स्थायी रूप से रहने लगे’. त्याला मराठी भाषा येत नव्हती, पण त्याचें महाराष्ट्रीयत्व जागें होतें, गणपतीउत्सव हा त्याचा आवडता सण होता.
मी कलकत्त्याजवळील खरगपुर येथें आय्. आय्. टी. मधे शिकत असतांना श्रॉफ नावाचा माझा एक ‘बंगाली’ सहाध्यायी होता. तो बंगाली भाषा बोलत असे, बंगाली वेषभूषा परिधान करत असे, रवीन्द्र संगीत गात असे, त्याचें नजिकचें-मित्रमंडळ बंगाली होतें. परंतु, त्यानें स्वत:होऊन मला (बंगाली लहजा असलेल्या इंग्रजीत) सांगितलें की त्याची एनसिस्ट्री महाराष्ट्रीय आहे, व त्याचे पूर्वज बर्याच काळापूर्वी बंगालमधे सेटल् झालेले आहेत. त्याला मराठी येत नव्हती, पण आपल्या महाराष्ट्रीय एनसिस्ट्रीबद्दल खचितच प्रेम होतें.
१७६१ मधे पानिपतची लढाई हरल्यावर बरीच मराठी मंडळी उत्तरेतच राहिली, याचा उल्लेख वर केलेलाच आहे. त्यांच्या वंशातीलच कांहीं मंडळी आज हरियाणामधे ‘रोर-मराठा’ अथवा ‘रोडे-मराठा’ कम्युनिटी या नांवानें ओळखली जातात. या मंडळींना मराठी भाषा येत नाहीं , पण अजूनही ते १४ जानेवारी, म्हणजे पानिपत युद्धाच्या दिवस, हा ‘शौर्य-दिवस’ म्हणून साजरा करतात. (लक्षात ठेवणें आवश्यक आहे की, १७६१ सालीं संक्रांत १० जानेवारीला होती. म्हणजेच, या शौर्य-दिवसाचा संक्रांतीशी कांहींही संबंध नाहीं.) या कम्युनिटीमधील मंडळींना आपल्या मराठी ऍनसिस्ट्रीचा अभिमान आहे.
भारताचे भूतपूर्व गृहमंत्री गोविद वल्लभ पंत याचें मूळ महाराष्ट्रीय आहे, असें मी बराच काळ ऐकून होतो. आणि तें खरें असल्याचें मला कांही काळापूर्वी पटलेंही. कांहीं वर्षांपूर्वी पंत नांवाच्या एका गृहस्थाशी माझा संबंध आला. त्याचें कुटुंब पंजाबमधील होते. तो मराठी भाषाही बोलत असे. त्याबद्दल त्याला विचारल्यावर त्यानें मला सांगितलें, ‘पंत आडनांवाच्या, उत्तर-भारतातील प्रत्येकाचें मूळ महाराष्ट्रीयच असतें’. या गृहस्थाला आधी मराठी भाषा येत नव्हती, पण मुंबईला नोकरीनिमित्त आल्यानंतर तो मुद्दाम, ‘आपल्या पूर्वजांची मूळ भाषा’ म्हणून मराठी शिकला.
माझ्या मतें अशी ही सर्व मंडळी ‘बृहन्महाराष्ट्रीय’च आहेत. त्यांना एकवेळ मराठी भाषा येत नसेलही, पण त्यांच्या मनांत स्वत:च्या महाराष्ट्रीय ऍनसिस्ट्रीची जाणिव आहे, प्रेमही आहे. विविध शहरांमधील बृहन्महाराष्ट्र मंडळांनी प्रयत्न करून अशा व्यक्ती, कुटुंबें व कम्युनिटींबद्दल माहिती काढून, त्यांच्याशी जाणीवपूर्वक सलोख्याचें संबंध प्रस्थापित करून, त्यांना बृहन्महाराष्ट्रीय नेटवर्कमध्ये सामील करून घेतलें पाहिजे.
— सुभाष स. नाईक
Leave a Reply