ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ व ज्यांच्या नावाने धूमकेतू ओळखला जातो अशा एडमंड हॅले यांचा जन्म ८ नोव्हेंबर १६५६ रोजी झाला.
धूमकेतू म्हटलं की, आपल्याला लगेच आठवतो तो ‘हॅले’ चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला. यापूर्वी १४५६, १५३१, १६०८ या साली दिसलेला आणि १६८२ साली आपण पाहिलेला धूमकेतू एकच आहे, हे गणिताच्या साहाय्याने हॅले यांनी १७०५ साली सिद्ध केलं. हाच धूमकेतू पुन्हा १७५८ साली सूर्याजवळ येईल असंही भाकीत हॅले यांनी केलं. अर्थात, आपलं भाकीत खरं झालं की नाही ते पाहायला स्वत: हॅले जिवंत नव्हते, परंतु त्यांच्या भाकितानुसार १७५८ साली धूमकेतू मात्र दिसला. एडमंड हॅलेंच्या गौरवार्थ त्या धूमकेतूला हॅले यांचं नाव देण्यात आलं.
एडमंड हॅले हे केवळ खगोलशास्त्रज्ञच नव्हते; तर ते नामांकित गणितज्ज्ञ, भूगोलतज्ज्ञ तसेच हवामानशास्त्रज्ञही होते. १६८६ साली हॅले यांनी व्यापारी वारे आणि मान्सून वारे यांचा अभ्यास करून काही तर्कशुद्ध अडाखे बांधले. सूर्यापासून उत्सर्जति होणारी उष्णता पृथ्वीवर सर्वत्र सारख्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने वातावरण असमान तापतं. त्यामुळे वातावरणामध्ये हालचाल निर्माण होऊन वारे वाहतात, असा आडाखा हॅले यांनी मांडला. त्याचप्रमाणे त्यांनी हवेचा दाब आणि समुद्रसपाटीपासूनची उंची यांतला संबंध दर्शविणारी सारणी तयार केली. आणि हा संबंध अक्षांशांनुसार बदलत असल्याचे त्यांनी दाखवून दिलं.
विषुववृत्तावर सर्वात जास्त प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरण तापतं आणि हवा वर जाते. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेश हे उत्तर आणि दक्षिण दिशेकडून हवा खेचून घेतात. ही उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून विषुववृत्ताच्या दिशेने खेचली जाणारी हवा म्हणजेच व्यापारी वारे. हॅले यांचा व्यापारी वाऱ्यांच्या निर्मितीविषयीचा हा सिद्धांत बऱ्याच प्रमाणात अचूक ठरला.
पण, व्यापारी वाऱ्यांच्या दिशांची निरीक्षणं मात्र या सिद्धांतानुसार नाहीत, असं आढळून आलं. व्यापारी वारे उत्तर किंवा दक्षिणेकडून नव्हे तर उत्तर गोलार्धात इशान्येकडून आणि दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून विषुववृत्ताच्या दिशेने वाहतात. अर्थात, व्यापारी वाऱ्यांच्या निर्मितीविषयीचा हॅले यांनी मांडलेला हा सिद्धांत म्हणजे वातावरणीय अभिसरणाबाबतीत आणि हवामानशास्त्राच्या प्रगतीतला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
एडमंड हॅले यांचे निधन १४ जानेवारी १७४२ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply