लंडनच्या `इलस्ट्रेटेड न्यूज’ या मासिकात १८६० मध्ये भारतातील प्रवास कसा केला जातो याचं मोठे शीळा छापाचं चित्र प्रसिद्ध झालं होतं. त्या चित्रात चालत जाणारं गाढव, घोडा, हत्ती, उंट व त्यावर बसून जाणारा माणूस, मग बैलगाडीतून प्रवास करणारा माणूस, अशी एका खालोखाल एक चित्र होती आणि आणि त्यानंतर चित्र होतं वाफेच्या इंजिनाची गाडी, गाडीच्या रुळांच्या दोन्ही बाजूंना कुतूहलाने बघत उभे असणारे खेड्यातील पुरुष, बायका व मुलं; चित्राला नाव दिलं होतं `उच्च प्रतीचे प्रवासी साधन’. रेल्वे सुरू होऊन एकशे साठ वर्ष होऊन गेली, तरीही रेल्वेचं भारतातले हे मानाचं वरचं स्थान टिकून आहे. जमिनीवरील वाहतुकीच्या बाबतीत रेल्वेने महान क्रांती घडवून आणली आणि आजतागायत टिकविली हे नि:संशय खरं आहे.
ब्रिटिशांनी भारतीयांना रेल्वेने यात्रा घडवायला सुरुवात केली. तीर्थक्षेत्री घेऊन जाणाऱ्या रेल्वेने भारतीयांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.
अर्थात, भारतात रेल्वेच्या आगमनापूर्वीही देवस्थानांना भेटी देण्याची परंपरा हजारो वर्षे अखंडपणे चालूच होती, पण तो प्रवास महान कष्टाचा व काही वेळा जीवघेणा ठरत असते. यात्रेदरम्यान श्वापदं, दरोडेखोर, उपासमार, अशा अनेक संकटांशी सामना करावा लागेल. इसवी सन १९१० पर्यंत भारतात रेल्वेचं जाळं पसरलं आणि मग मात्र प्रथम रेल्वे व पुढे बससेवेने वाराणसी, अयोध्या, हरिद्वार, चारधाम, रामेश्वर, तिरुपती अशा अनेक धार्मिक स्थळांना हजारो पर्यटक सुखाचा प्रवास करत वारंवार भेटी देऊ लागले. गर्दीचे लोट अफाट असत, पण प्रत्येक रेल्वे गाडी जणू गर्दीला गिळून टाकत असे. गर्दी प्रचंड वाढली तर रेल्वेचे – मालगाडीचे उघडे डबे गाडीला जोडले जात असत, जनावरे व मनुष्यप्राणी ह्यांच्या प्रवासातील सुखसोयी भेदभाव केला जात नसे.
जलद गतीने व कमी दगदगीने देवदर्शन यात्रा होत असल्यामुळे जनता मायबाप ब्रिटिश सरकारला दुवा देत होती. रेल्वे व्यवस्थापनाने अनेक कुंभमेळे व धार्मिक यात्रांचा खेडोपाड्यात धुमधडाक्यात प्रचार केला. भारतीय यात्रेकरूंची नाडी ब्रिटिशांनी पकडली होती. विविध धार्मिक संस्थांना यात्रेकरूंची ने-आण करण्यासाठी सवलती दिल्या. जगातील हा एकमेव प्रयोग भारतात पुढे कायमसाठी रुजला. भारतात आजही हजारो लोक यात्रा व्यवसायात आहेत. ब्रिटिश राजवटीला रेल्वेमुळे नफा आणि राजकीय पकड या दोन्ही दृष्टींनी खरोखरच शंभर टक्के यश आलं. एकदा रेल्वे सुरू झाली आणि पुढे आधुनिक भारताच्या तांत्रिक, औद्योगिक, आर्थिक, शेतकी व अन्य विभागांच्या प्रगतीची घोडदौड केवळ रेल्वेमुळे होत गेली. भारतात रेल्वेत गुंतवलेल्या भांडवलातून ब्रिटिश सरकारने अमाप नफा तर कमावला, पण भारतावरील राजकीय पकडही घट्ट बसविली.
भारतीय रेल्वेमुळे जनतेचे अनंत फायदे झाले. रेल्वे ही शिक्षण देणारी चालती-बोलती शाळा होती. जनतेचा इंग्रजी भाषेची संबंध येऊ लागला. लोक आपापसात इंग्रजीत बोलू लागले. खेड्यातील जनता पोटापाण्याच्या सोयीसाठी मोठ्या शहरात जाऊन राहू लागली. उद्योगासाठी, विक्रीसाठी विक्रेते देशभर फिरू लागले. मालमत्तेला मिळणारी सुरक्षा, शेतकी सुधारणा व विविध धंद्यांना मिळणारी चालना, उत्पन्नातील वाढ, या प्रकारच्या आर्थिक विकासामुळे शहरांचा व गावांचा चेहराच बदलला. रेल्वे मार्गावरील बोगदे, नद्यांवरील छाती दडपून टाकणारे फुल, यामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर घातली गेली. या सगळ्या बरोबरच भिन्नभिन्न भाषकांची, भाषांची, चालीरीतींशी संपर्क आल्यामुळे भारतीयांची मतं आणि मनंही बदलली.
भारताच्या अखंडत्वाचा मान भारतीय रेल्वेला द्यायला हवा. रेल्वेने प्रांत, धर्म, जाती, भाषा, या सर्वांवर मात केली. प्रवासात २४ ते ५० तास एकत्र राहिल्याने एकमेकांची सुखदुःख जाणून घेणे सुलभ झालं. दुष्काळात धान्य नेणं, औषधं नेणं सोयीचं झालं. महात्मा गांधींनी रेल्वेला विरोध केला होता. रेल्वेमुळे प्लेग, देवीसारखे रोग पसरतात व दुष्काळाची व्याप्ती वाढते असं त्यांचं मत होतं. असं मत असूनही महात्मा गांधींनी देशभर रेल्वेनेच प्रवास केला. खरा भारत त्यांना रेल्वेभ्रमंतीमुळे कळला व जनसंपर्क साधता आला. राष्ट्रीय काँग्रेसची राष्ट्रीय अधिवेशनं गाजली. या सर्व अधिवेशनांना देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसं जमा होत असत. लाहोर, कलकत्ता. सुरत लखनौ, अशा ठिकाणी झालेली अधिवेशनं लक्षावधी लोकांच्या उपस्थितीत केवळ रेल्वेमुळेच शक्य झाली. आजही सर्वात उत्तम, सोयीस्कर व सर्वमान्य दळणवळणाचे साधन म्हणून रेल्वेच प्रथम क्रमांकावर आहे.
– डॉक्टर अविनाश वैद्य
Leave a Reply