श्री गणेश अथर्वशीर्षामध्ये गणेश विद्येचा उल्लेख येतो. सैषा गणेश विद्या. अर्थात ही आहे गणेश विद्या. विद्या शब्दाचा अर्थ आहे जाणणे. भगवान श्रीगणेशांना जाणून घेण्याचा मार्ग म्हणजे गणेशविद्या. श्री गणेश यांचे वास्तव स्वरूप ज्या मार्गानी समजून घेता येते ती पद्धती म्हणजे गणेश विद्या.
श्री गणेश अथर्वशीर्षात तो मार्ग, ती पद्धती आपल्याला सांगितली आहे. ग,अ, अनुस्वार, अर्धचंद्र अशा स्वरूपात गणेश एकाक्षरी महामंत्र आपल्या समोर मांडला आहे. यात मांडलेल्या साडेतीन मात्रांचे विवेचनच ओंकाराचे निरूपण करताना उपयोगात आणले जाते. वेगळ्या शब्दात निर्गुण निराकार ओंकार म्हणजेच भगवान गणेश.
गणेश एकाक्षरी मंत्राच्या माध्यमातून मोरयाचे ओंकार ब्रह्मत्व आपल्या मनात पक्के ठसवते त्या चैतन्यशक्तीला, त्या देवी बुद्धीला ब्रह्मविद्या असे म्हणतात. तिच्या माध्यमातून ब्रह्माची जाणीव होते त्यामुळे ती ब्रह्मविद्या. ती भगवती महाबुद्धी ज्या परब्रह्म चैतन्याच्या आधारे कार्य करते त्या भगवान गणेशांना श्री ब्रह्मविद्येश असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply