बुद्धीचे कार्य तीन प्रकारे चालत असते. त्या कार्याच्या आधारे बुद्धीला प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा अशा तीन नावांनी संबोधिले जाते.
कोणत्याही गोष्टीची यथार्थ जाणीव करून देणे हे बुद्धीचे एक महत्त्वाचे कार्य आहे. त्या यथार्थ जाणीवे साठी बौद्धिक स्तरावर ज्या कृती घडत असतात त्याआधारे हे निरूपण केले जाते.
यातील पहिला स्तर म्हणजे प्रज्ञा. यालाच ग्रहणशक्ती असे म्हणतात. पंचज्ञानेंद्रिय यांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या विषयाचे यथोचित ग्रहण करण्याची शक्ती म्हणजे प्रज्ञा.
अर्थात एखादे दृश्य पहात असताना त्याच्या सर्व बारकाव्यांसह त्याचे ज्ञान करून घेणे म्हणजे प्रज्ञा.
ग्रहण केलेल्या या अनुभवांना स्मृतीमध्ये कायम साठवून ठेवणे या क्षमतेला मेधा असे म्हणतात.
तर सुयोग्य समयी त्या ज्ञानाच्या योग्य अभिव्यक्ती साठी आवश्यक क्षमता म्हणजे प्रतिभा.
अर्थात या पुढील दोन्ही क्षमतांचा आधार असतो प्रज्ञा.
व्यावहारिक जगतातील अशा प्रत्येक अनुभवांनी जीवाला समृद्ध करणाऱ्या , सुख प्रदान करणाऱ्या प्रज्ञा रुपी बुद्धीचे कार्य ज्यांच्या शक्तीने चालते त्या भगवान श्रीगणेशांना प्रज्ञापती असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply