बुडत्यास आधार काठीचा
चढत्यास मिळते सावली
चढत्या मीपणात जो बुडतो
त्याला कशी वाचवेल माऊली!
अर्थ–
हे सगळं विश्व माझ्यामुळे आहे. या सगळ्याचा कर्ता-सवरता मीच आहे. या भावनेला एकदा का मनुष्याने मनात जागा दिली की समोरचं क्षितिजही माझ्यामुळेच उजळून गेल्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. पण विश्वास हा असा धागा आहे जो मनुष्याला या मी पणाच्या चक्री वादळातून बाहेर पडायला मदत करू शकतो.
कोणास पोहता येत नसेल किंवा उत्तम पोहणारा कोणी असेल तरी कधी कधी बुडायला होतंच अशा वेळी एक लाकडाचा ओंडका सुद्धा प्राण वाचवू शकतो. पण त्यावर विश्वास असायला हवा.
मी ट्रेकिंग ला गेलो की कित्येक गड- किल्ल्यांवर झाडं कमी असतात किंवा काही ठिकाणी झाडांची उंची कमी असते. अशा वेळी 3 फुटी झुडपाच्या 2 फुटां पर्यंत पडलेल्या सावलीतही गारवा मिळतो आणि फुललेला श्वास नियमित होण्यास मदत मिळते. पण तेथे जर अहंकार जागृत झाला आणि हे एव्हढेसे झुडूप काय सावली देणार ही भावना मनात आली तर मात्र तळपलेला सूर्य मीपणा करपवून टाकण्यास मागे पुढे पहात नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर जाऊन विराजमान व्हायचे होते तेव्हा त्या स्थानावर बसण्याआधी त्यांच्या मनात घालमेल सुरू होती. त्यांना या सिंहासनावर बसण्यास ज्यांनी अपार कष्ट केले, ज्यांनी प्राण दिले अशा तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, बाजी पासलकर अशा कित्येक योध्यांची कमतरता भासू लागली आणि त्यांनी मनोमन ते स्वराज्य ते सिंहासन या सर्व वीरांना अर्पण केले मगच ते सिंहासनावर जाऊन बसले.
श्री समर्थ रामदासांनी कधी प्रकाश झोतात येण्यासाठी धडपड केली नाही. हे सगळे स्वराज्य जे आकार घेत आहे यात आपल्या समाज कारणाचा, राज्य कारणाचा वाटा आहे हे उर बडवत सांगितले नाही. जो सुख, यश, प्रसिद्धी पचवू शकतो तो खरा वैरागी बनू शकतो. नाहीतर वैराग्य हे आजकाल दिखाव्याकरिता बाळगायची गोष्ट बनून राहिली आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply