बुलडाणा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडली. या नगरपालिकांपैकी भाजपचे ५, काँग्रेसचे २, भारिप-बमसंचे १ आणि एका ठिकाणी विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. पालिका निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज आणि प्रस्थापितांना मतदारांनी झटके दिले आहेत.
बुलडाणा पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. येथे आता भारिप-बमसंच्या नजमुन्नीसा बेगम अध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.पालिकेतील एकूण सदस्य संख्या २८ असून यात भाजप- ५, शिवसेना- १०, कॉंग्रेस- ७ व एक पुरस्कृत, राष्ट्रवादी- ३, भारिप-बमसंचे २ सदस्य निवडून आले आहेत. बुलडाण्यात आमदार हर्षवर्धन सपकाळ हे असताना काँग्रेसला केवळ ७ जागा मिळाल्या. तर नगराध्यक्षपद भारिप-बमसंकडे गेले आहे.
जिल्ह्यातील अति प्रतिष्ठेच्या खामगाव येथील नगराध्यक्षपदी भाजपच्या अनिता वैभव डवरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भारिप- काँग्रेस आघाडीच्या शांताबाई सोनाेने यांचा पराभव केला. काँग्रेसच्या ताब्यातील ही पालिका भाजपने बळकावली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप सानंदा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. त्यांनी भारिप-बमसंसोबत आघाडी करून निवडणूक लढवली. मात्र नगराध्यक्षपद भाजपला मिळाले. त्यामुळे येथे भाजपचे नेते कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांची प्रतिष्ठा राखल्या गेली.
राजकीयदृष्टया सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मेहकर पालिकेत नगराध्यक्षपदी काँग्रेसचे कासम पिरु गवळी निवडून आले आहेत. जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तथा बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, तसेच आमदार संजय रायमुलकर हे दोघेही मेहकरात असताना शिवसेनेचे भास्करराव गारोळे हे पराभूत झाले आहेत. पालिकेत २४ पैकी १४ जागा शिवसेनेने जिंकल्या असल्या तरी महत्त्वाचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्याने दोन्ही दिग्गजांचे प्रयत्न फोल ठरले.
त्याचप्रमाणे भाजपचे नेते आणि आमदार चैनसुख संचेती यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मलकापूर आणि नांदुरा या दोन्ही पालिकांमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. मलकापुरात काँग्रेसचे अॅड. हरीष रावळ हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, आमदार संचेती यांनीही आघाडी स्थापन करून पालिकेतील काँग्रेसची सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र नगर विकास आघाडीचे केवळ ८ उमेदवार निवडून आले. त्याचप्रमाणे नांदुरा नगराध्यक्षपदी आकोट विकास आघाडीच्या रजनी अनिल जवरे विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या द्राैपदाबाई तांदळे यांचा पराभव केला. येथे २३ पैकी भाजपचे केवळ ५ उमेदवार विजयी झाले.
तसेच जिल्ह्यात चिखलीची निवडणूक चांगलीच गाजली. येथे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांना यश मिळवता आले नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रिया कुणाल बोंद्रे ह्या निवडून आल्या आहेत. तर एकूण २६ सदस्य संख्या असलेल्या चिखली नगर पालिकेत कॉंग्रेसला केवळ ९ जागा मिळाल्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, सिंदखेडराजा मतदारसंघात सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे वर्चस्व असून देऊळगावराजा नगर पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. तर येथील आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे शिवसेनेचे आहेत. देऊळगावाजा नगर पालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वर्चस्वासाठी सुरू असलेल्या लढाईत भाजपच्या सुनिता रामदास शिंदे यांनी बाजी मारली आहे. पालिकेत १८ पैकी भाजपने ४ जागा मिळवत प्रथमच यश मिळवले आहे.
आमदार संजय कुटे मतदारसंघात सुरक्षित
जळगाव जामोद मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रयत्नांनी जळगाव पालिकेत भाजपच्या सीमा कैलास डाेबे विजयी झाल्या आहेत. तसेच शेगावातही नगराध्यक्षपदी भाजपच्या शकुंतला पांडुरंग बुच ह्या विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या मीनाक्षीताई रामविजय बुरुंगले यांचा पराभव करत ही पालिका काँग्रेसच्या ताब्यातून भाजपकडे आली आहे.
— जनार्दन गव्हाळे, औरंगाबाद
gavhalej@gmail.com
Leave a Reply