नवीन लेखन...

“बुनियाद-टेलिव्हिजन सिरीजचा शोले”

कासवाच्या गतीने वाढणाऱ्या भारतीय टेलिव्हिजन क्षेत्राला खरा बुस्टर मिळाला तो ऐंशीच्या दशकात. १९८२ मधे दिल्लीतील एसियाड गेम्स च्या निमीत्ताने क्रिडा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण, १९८३ मधे एकदिवसीय क्रिकेटमधे भारतीय टीमचा विश्व विजय, आणि १९८४ मधे पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लाइव्ह टेलेकास्ट झालेला त्यांचा अंत्यसंस्काराचा सोहळा, या सर्व घटनांमुळे भारतात घरोघरी टेलिव्हिजनचा प्रसार झपाट्याने होउ लागला होता. टिव्ही हा फक्त स्टेटस सिंबल न राहता लोकांना आता ती गरजेची वस्तु वाटू लागली होती.

त्याचवर्षी, म्हणजे १९८४ मधे, दिल्ली दूरदर्शन वरुन प्रसारित पहिली टेली सिरीज, ‘हमलोग’ ने बरीच लोकप्रियता मिळवली. हमलोग १९८५ मधे संपली तेंव्हा भारतभरातून लोकांनी खूप भावनीक प्रतिक्रिया दिल्या. ते पाहून दूरदर्शनला टेली सिरीज मधे एक मोठे भविष्य दिसू लागले. त्यांनी जी.पी. सिप्पी, रामानंद सागर, बी.आर.चोप्रा सरख्या दिग्गज फिल्म निर्मात्यांना दूरदर्शन साठी कार्यक्रम बनवायला पाचारण केले.

त्याच काळात, जी पी सिप्पींनी आपल्या मुलाला, दिग्ग्ज दिग्दर्शक रमेश सिप्पीला, दूरदर्शनची ही ऑफर सांगितली व एक टिव्ही सिरीज करण्याची इच्छा बोलून दाखवली. शान, शक्ती व सागर याखारख्या सलगच्या काही अपयशी (किंवा कमी यशस्वी म्हणूत) चित्रपटांनंतर रमेश सिप्पींनाही काहितरी वेगळं करायचे होते. त्यांना वडिलांची ही आयडिया आवडली व त्यांनी काही सामाजिक परदेशी डेली सोप्सचा अभ्यास केला. याच दरम्यान हम लोगचे लेखक मनोहर श्याम जोशींची त्यांनी भेट घेतली. त्यांच्याही डोक्यात काही मोठं, भव्य लिहायचं होतंच. सिप्पी कुटूंब मुळचे पंजाबी. देशाच्या विभाजनाच्या वेळी भारतात स्थायीक होताना फाळणीचे चटके बसलेले हे कुटूंब होते. रमेश सिप्पी तेंव्हा लहान असले तरी त्यांनीही फाळणीची झळ सोसली होतीच. त्यातूनच त्यांना आपल्या या सिरीयलचे बीज मिळाले ‘स्वातंत्र्य पूर्व काळात पाकिस्तानात लाहोर मधे स्थायीक असलेला पण फाळणीमुळे विस्थापीत होउन भारतात आलेल्या कुटुंबाचा तब्बल तीन पिढ्यांचा इतिहास’ हा या सिरीजचा मुख्य विषय होता. अशा तऱ्हेने ‘बुनियाद’ या टिव्ही सिरियल च्या संकल्पनेचे बिजरोपण झाले.
मनोहर श्याम जोशींनी लेखनाची व रमेश सिप्पींनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली. आता प्रश्न कलाकारांचा होता. रमेश सिप्पी जरी फिल्म इंड्स्ट्रीत मोठे नाव असले तरी प्रतिथयश अभिनेते अभिनेत्रींना या सिरीज साठी घेण्यात काही अडचणी होत्या. पहिली म्हणजे तारखा. सलग एक वर्ष आठवड्यातून दोन दिवस याचे भाग प्रक्षेपण होणार असल्याने प्रत्येक आठवड्याला शूटींग करणे क्रमप्राप्त होते. सिनेमात काम करणारे व जम बसलेले कलाकार अशा तारखा देउ शकत नसल्याने साहजिकच यात अभिनय करु शकणार नव्हते. दुसरे म्हणजे फिल्म अभिनेत्यांना एक मुळचे वलय असते, एक इमेज असते. रमेश सिप्पींना या इमेज मधे आधीच अडकलेले कलाकार त्यांच्या सिरीयलमधे नको होते.

बराच विचार करुन रमेश सिप्पी, मनोहर श्याम जोशी व कार्यकारी निर्माते अमीत खन्ना यांनी एक जुगार खेळायचा ठरवला. त्यांनी ठरवले की सर्व कलाकार हे नवीन, non-established कलाकार घ्यायचे, जेणेकरुन त्यांच्या आधीच्या रोल्स मधील इमेज या सिरीयलला मारक ठरणार नाही. पण कलाकार कसलेले हवे होते कारण जवळ जवळ पन्नास वर्षांचा स्पॅन दाखवताना काही कलाकार तरुण ते अगदी म्हातारे असा प्रवास करणार होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा व FTII मधून बाहेर पडलेले व अजून स्वतःला सिद्ध करायला धडपड करणारे कलाकार एकत्र आणून या वरील त्रयीने बुनियादचा ‘पाया’ घातला.

तेंव्हाच्या दूरदर्शनच्या नियमाप्रमाणे पायलट एपिसोड दाखवून रिवाजाप्रमाणे एकूण १०५ एपिसोड्स साठी दूरदर्शन कडून परवानगी मिळाली. शुटींग सुरु झाले. १९८६ च्या मे महिन्यात पहिला एपीसोड ‘ऑन एअर’ गेला.

लाहोरमधे एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला लाला गेंदामल (सुधीर पांडे) त्यांच्या मुलांसह व्यवसायात उतरुन खूप प्रगती करतात. त्यांचा मोठा मुलगा लाला रलियाराम (गिरीजा शंकर) वडिलांच्या पावलांवर पाउल ठेउन व्यवसायात जम बसवतो. त्यांचा धाकटा मुलगा लाला हवेलीराम (आलोकनाथ) याला मात्र वडिलांच्या व्यवसायात काडीमात्र इंटरेस्ट नसतो. तो तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय अशा गदर पार्टी व आर्य समाजाच्या कामात लक्ष घालत असतो, जे त्याच्या वडिलांना व भावाला अजिबात आवडत नसते. अशात गदर पार्टीचे काम करणाऱ्या भाई आत्माराम (गोगा कपूर) यांच्या बरोबर काम करताना त्याची भेट आत्माराम यांची भाची लाजवंती उर्फ लाजोजी (अनिता कंवर) हिच्याशी होते. तिचा अभ्यास कच्चा असतो म्हणून तो तिला शिकवत असतो आणि शिकवता शिकवता दोघे प्रेमात पडतात.

त्यांचे हे प्रेम प्रकरण फक्त हवेलीराम ची धाकटी बहिण व लाजोची मैत्रीण विरावाली (किरण जुनेजा) हिलाच ठाउक असते.

आपल्या रुतब्याच्या खालच्या घरातील मुलगी घरात आणने अर्थातच हवेलीरामच्या घरच्यांना पसंत नसते. सतत नवऱ्याचे व सासु सासऱ्यांचे कान भरणारी रलियाराम ची बायको शन्नो (आशा सचदेव) आपल्या दीराच्या विरुद्ध आधीच कागाळ्या करत असतेच. त्यात अगदी आर्यसमाजी साध्या पद्दधतीने लाजोजी बरोबर लग्न करुन हवेलीराम तिला घरी घेउन येतो आणि एकच गहजब होतो. घरच्यांच्या मनाविरुद्ध गेल्याने संतप्त बाप व भावाचा रोष पत्करावा लागतो व शेवटी हवेलीराम बायकोसहीत घराबाहेर पडतो. मधल्या काळात विरावाली एका फसलेल्या प्रेम प्रकरणात गरोदर राहते व एका मुलाला जन्म देते. हवेलीराम व लाजोजी त्या मुलाला आपले नाव देतात व वाढवतात.

हवेलीराम आपल्या मास्टरजीच्या नोकरी वर लाजोजी बरोबर संसार सुरु करतो. त्यांना दोन मुले कुलभूषण (दिलीप ताहिल) व रोशनलाल (मजहर खान) होतात. याशिवाय विरावालीचा मुलगा सतबीर (कंवलजीत) देखील त्यांचा तिसरा मुलगा म्हणून त्यांच्याकडे वाढतो. थोरला कुलभूषण चांगला शिकतो, सरकारी ऑफीसर बनतो. त्याची सतत तक्रार करणारी बायको लोचन उर्फ सुलोचना (सोनी राजदान), कुलभूषनला आधीच त्याच्या घरच्यांपासून दूर करते. कुलभूषनची दोन मुले आजी आजोबांची लाडकी असतात पण लोचनचा ओढा स्वतःच्या माहेरकडे जास्त असतो. रोशनलाल आधीपासूनच थोडा कामचुकार व लबाड आसतो तर सतबीर मात्र अगदी सरळमार्गी निपजतो. रोशन व सतबीर अजून कॉलेज शिकत असतात.

याच वेळी देश स्वतंत्र होतो आणि देशाची फाळणी होते. लाहोर पाकिस्तानचा भाग होतो आणि मग जातीय दंगे सुरु होतात. जीव वाचवण्यासाठी मास्टर हवेलीरामच्या कुटुंबाला नेसत्या वस्त्रानिशी लाहोर सोडून निघावे लागते. त्याआधी हवेलीराम संकटात सापडलेल्या आपल्या मोठ्या भावाला रलियारामची खबर घ्यायला घरच्यांना न जुमानता जातो. प्रचंड दंगे होत असताना हवेलीराम हे धाडस करतो पण त्या दंग्यांमधे तो कुठेतरी नाहीसा होतो. आपल्या नवऱ्यासाठी, मास्टरजींसाठी मागे थांबायचा आग्रह करणारी लाजोजी, शेवटी स्वतःच्या मुलांच्या आग्रहाखातर नवऱ्या शिवाय लाहोर सोडून मुले, सून व नातंवडांसह भारतात येते. सुरवातीचा बराच काळ त्यांना दिल्लीत रेफ्युजी कँपमधे काढावा लागतो.

रेफ्युजी कँपमधे राहतानाही लाजोजी व मुले हवेलीरामचा शोध घेत राहतात. शेवटी शेवटी मुले या मतावर येतात की आपले वडील लाहोरच्या दंग्यांमधे मारले गेले. पण लाजोजीला मात्र एक आशा असते. तिचे मास्टरजी तिला शोधत परत येतील. खूप शोध घेतल्यावर आपली स्मरणशक्ती हरवलेला मास्टर हवेलीराम त्यांना सापडतो. पण तो आता लाजोजींना ओळखत नसतो.
हवेलीरामची स्मरणशक्ती परत येते का?
हवेलीरामचे कुटूंब आपले गतवैभव परत मिळवते का?
कुलभूषन बायकोच्या इच्छेविरुद्ध आपल्या कुटुंबात परततो का?
रोशनला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव कधी होते?
सतबीरला आपल्या जन्माचे रहस्य व आपले आई वडील कोण हे कळते का व कधी?
या सर्व प्रश्नांची उत्तरे हळूवारपणे उलगडणारा नात्यांचा प्रवास म्हणजे बुनियाद.

हवेलीराम व लाजवंतीच्या एकमेकांवरील उत्कट प्रेमाचा अविस्मरणीय प्रवास म्हणजे बुनियाद.
भारतात टेलिव्हिजन सिरीजचा ‘पाया’ घट्टपणे रोवणारी मालिका म्हणजे बुनियाद.

रमेश सिप्पी, मनोहर श्याम जोशी व अमित खन्ना यांनी खेळलेला आणि प्रचंड यशस्वी ठरलेला जुगार म्हणजे बुनियाद.
ज्याकाळी बुनियाद प्रसारित झाले त्याकाळी मंगळवारी व शनीवारी रात्री अर्धा तास रस्ते ओस पडत होते. फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान मधेही ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. त्याकाळी उत्तर भारतात टिव्ही आसलेल्या घरांमधे या सिरीयलची व्हिवरशीप तब्बल ९३% होती असे आकडे सांगतात. १९८६ च्या पहिल्या प्रसारणानंतर आजवर बुनियादचे तब्बल सहा वेळा पुनःप्रक्षेपण झालं आहे..आणि प्रत्येकवेळा तिला अतिशय छान प्रतिसाद मिळत गेला आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे या सिरीयलचा, याच्या विषयाचा भारतीय मनाशी झालेला कनेक्ट. फाळणी हा विषय तसा भारतीय सिनेमांमधे नेहमीच दुर्लक्षितच राहिला आहे. कदाचित याची कथावास्तु इतकी स्फोटक आहे व व्यापक आहे की या विषयात हात घालायला फार कोणी धजले नाही. एम.एस. सथ्यूंचा ‘गर्म हवा’ आणि अलिकडे दिपा मेहताचा ‘Earth’ सोडले तर फार भाष्य या विषयावर झालेले नाही. पण टेलिव्हिजन साठी विशेषतः दूरदर्शन वर मात्र या विषयावरील दोन मालिकांनी फाळणीचा तो दुर्दैवी काळ, ती ठसठस, त्या यातना भारतीय जनतेसमोर आणल्या. एक, गोविंद निहलानींचा ‘तमस’ आणि दुसरी ‘बुनियाद’. एक वर्षाच्या पूर्ण प्रसारणात बुनियादने आपली प्रेक्षकांवरील पकड अजिबात ढिली होउ दिली नाही याचे हे प्रमुख कारण असावे.

बहुतांश नवीन कलाकार असूनही त्यांच्याकडून अगदी तगडे काम करुन घेण्यात दिग्दर्शक रमेश सिप्पी व सहदिग्दर्शक ज्योती स्वरुप यशस्वी ठरले.या सर्वच कलाकारांनी त्या काळच्या वेशभुषा, बोलण्यातला तो पंजाबी ढंग, संयत अभिनय, चपखल संवाद व आदाकारी यामुळे या सिरीयलला एका चांगल्या उंचीवर नेउन ठेवले होती.

या सिरीयलची त्याकाळी इतकी क्रेझ झाली होती की यातले सर्व प्रमुख कलाकार, विशेषतः आलोकनाथ, अनिता कंवर या प्रमुख कलाकारांना एखाद्या बॉलीवूड सेलेब्रिटीचे स्टेटस प्राप्त झाले होते. मालिकेतले इतर कलाकारांनाही बॉलीवूडची दारे आपोआप खुली झाली. आलोकनाथ, दिलीप ताहील, गोगा कपूर, सोनी राजदान हे नंतर खूप साऱ्या चित्रपटांमधून झळकले. बाकीचे कलाकार देखील अनेक वर्षे विविध मालिंकामधून झळकत राहिले. काहीजण आजही झळकत आहेत. सोनी राजदान ने महेश भट्टशी लग्न केले तर किरण जुनेजोने दिग्दर्शक रमेश सिप्पीशीच संसार थाटला.

या सिरीयलमधे नंतर प्रवेश करणारी पात्रे, जशी लाला ब्रिजभान (विजयेंद्र घाटगे), जय भूषन (अभिनव चतुर्वेदी- याची त्यावेळी मुलींमधे खूप क्रेझ होती), जयची बायको मंगला (कृत्तीका देसाई), रोशनची बायको रज्जो (नीना गुप्ता), शामलाल (विनोद नागपाल) या सर्वांनी देखील या सिरीयलमधे आपापल्या भूमिकांनी जान आणली.

आज तीस वर्षांनंतरही वरील सारी पात्रे त्या पिढीतल्या सर्वांच्या स्मरणात आहेत, हीच या मालिकेच्या लोकप्रियतेची पावती आहे.

ह्या सिरीयलचे सारे एपिसोड यू ट्युबवर आहेत आणि हे सारे १०५ भाग पुन्हा पुन्हा पाहणारे प्रेक्षक आजही आहेत. बुनियाद पाहून मोठी झालेली पिढी आज चाळीशीत किंवा पन्नाशीच्या पुढे असेल. पण ज्या सिरीयलने आपल्याला एकत्रित टिव्ही समोर बसून आठवड्यातून दोनदा एका परिवाराची कहाणी पहायची सवय लावली ती पहिली सिरीयल बुनियादच होती हे सर्वचजण नक्की मान्य करतील.

म्हणूनच बुनियदचे भारतीय टेलिव्हीजनच्या इतिहासात तितकेच महत्व आहे जितके शोले चे भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आहे. या दोन्हीचे निर्माते- दिग्दर्शक ही बाप मुलाची जोडी एकच असावी हाही मोठा योगायोगच आहे..नाही का?

— सुनिल गोबुरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..