‘भायखळा’ ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव होते ‘भाया’. ‘भाया’चे खळे ते ‘भायखळे’ आणि त्याचा झाला ‘भायखळा’ ही कथा अनेकदा व्हाट्सअॅपवर वाचण्यात आली. आपणही वाचली असेल..
जुन्या मुंबईचे उपलब्ध असलेले फोटो पाहिले की त्यात वरवर तरी तथ्य असल्याचंही लक्षात येतं.. परंतु का कोण जाणे, माझं मन अद्यापही ही व्युत्पत्ती स्विकारायला त्याच्या मनापासून तयार होत नाही.. ‘भायखळा’ या नांवाच्या जन्मामागे काही तरी दुसरी कथा असली पाहीजे असं मला नेहेमीच वाटत आलं आहे..
असं वाटण्यामागे एक कारण असं आहे की जुन्या मुंबईची माहिती देणाऱी ‘मुंबईचे वर्णन’ – ले. गोविंद माडगांवकर व ‘मुंबईचा वृत्तांत’ – ले. मोरो विनायक शिंगणे ही दोन अगदी विश्वासार्ह म्हणावीत अशी मराठी पुस्तकं आहेत.. त्यापैकी पहिलं आहे १८६२ सालातलं तर दुसरं आहे १८९३ सालातलं.. या पुस्तकांच्या लेखकांनी त्याकाळची मुंबई प्रत्यक्ष पाहिली होती.. त्यांनी पुस्तकं लिहीली यावरून त्यांची जे पाहिलं ते ग्रहण करण्याची व त्याचा अर्थ लावण्याची त्यांची क्षमता असली पाहीजे.. सांगायचा मुद्दा हा की या दोनही पुस्तकांत ‘भायखळा’ म्हणजे ‘भाया’चे ‘खळे’ हा उल्लेख नाही.. उलट या दोघांच्याही पुस्तकांत भायखळ्याचा उल्लेख ‘भायखळे’ असा असून ही एक निरूपयोगी, खाजण, दलदलीने भरलेली जागा असून गुराख्यांना राहावयाची व ढोरे चरण्याची जागा आहे असं वर्णन आहे..
थोडा विचार केला तर या वर्णनांत तथ्य असावं असं लक्षात येतं. कारण अठराव्या शतकाच्या आठव्या दशकात मुंबईची बेटं भरणी घालून एकत्र करण्याची योजना प्रारंभ झाली व त्यापूर्वी या बेटांमधील जमीन उथळ, दलदलयुक्त, रोगराईने भरलेली असणं स्वाभाविक आहे.. थोडीफार शेती होतही असावी कारण काही ठिकाणी या भायखळ्याचा उल्लेख ‘शेतवळी’ असाही आढळतो..पण बहूतेक जमीन निरूपयोगीच होती व म्हणून ते एका शेतकर्याचं खळं असावं हा विचार मनास पटत नाही..
मोरो शिंगणेनी तर लिहीलंय की, ‘भायखळ्यातून कोटात जायचे तर लोकांच्या शौचकुपांचेच दर्शन व्हायचे.!’ ते पुढे असेही म्हणतात की कामाठीपूरा, डोंगरी, चिंचबंदर, भेंडीबाजार सर्वत्र भरतीचे एवढे पाणी भरायचे की लोक यातून लहान लहान बोटीने फिरायचे अथवा मासेमारी करायचे.. अशा परिस्थितीत तिथे थोडाफार भाजीपाला, शेती होत ही असली तरी तिथली जमीन ‘शेत’ म्हणण्याएवढी मोठी नसावी असा कयास आपल्याला लावता येतो..
जुन्या पुस्तकांत बर्याच ठिकाणी या भागाचा उल्लेख ‘भायखळा फ्लॅट’ असाही केलेला आढळतो.. हा उल्लेख खाड्यांमध्ये १७७६ ते १७८० च्या दरम्यान भरणी केल्यानंतर उपलब्ध झालेल्या जमिनींबाबत असावा असाही तर्क मांडता येतो. भरणी नंतर माझगावातील वस्ती या दिशेने सरकू लागली व पुढे १८३५ च्या दरम्यान झालेल्या ग्रांट रोडच्या निर्मिती नंतर या भागातील वस्तीच्या वाढीला वेग आला. येथेही ‘भाया’ सापडत नाही..!
या लेखाच्या तिसर्या परिच्छेदात उल्लेख केल्यानुसार भायखळा ही राहाण्यास निरूपयोगी जागा असली तरी मात्र याला अगदी लागून असलेल्या माजगांवात मात्र पूर्ण बहरलेली वस्ती होती.. स्थानिक कोळी, ख्रिस्ती (मुख्यत: बाटवलेले), मुसलमान, पोर्तुगीज, इतर युरोपियन यांची मोठी वस्ती माजगांवात होती. त्यातही बहुसंख्य जमीन व कारभार पोर्तुगीजांच्या हाती होता..त्या काळी या भागावर असणार्या पोर्तुगीजांच्या प्रभावाच्या खुणा आजही माजगांवात आपल्याला दिसतात.. १५३०-३२ पासून पोर्तुगीजांचा वावर या भागात होता असं इतिहास सांगतो.. आज जे भायखळा पुलाच्या बाजूला ‘ग्लोरिया’ चर्च आपल्याला दिसते ते पूर्वी माजगावात होते व त्याचा बांधणीचा काळ १५४८ च्या दरम्यान होता.. हा एक मोठा व ठळक पुरावा माझगावातल्या पोर्तुगीज वस्तीसंबंधी म्हणता येईल.. माझगावच्या वेशीवर असलेल्या भायखळ्यात काही वसती होती याचा उल्लेख पुस्तकांत सापडत नाही..असे का, याचा शोध घेतला असता ही जागा राहण्यास निरुपयोगी होती याचा वरीलप्रमाणे उल्लेख सापडतो..
भायखळा नावाबाबत माझा तर्क –
कोणत्याही ठिकाणाचे एक विशिष्ट नाव का आणि कसे पडले याचा विचार करताना स्थानिक लोकांची भाषा व तेथील राज्यकर्त्यांची भाषा याचा विचार प्रामुख्याने करावा लागतो..त्या वेळेस येथे असलेल्या स्थानिक कोळी लोकांत असलेल्या नावांवरून ‘भाया’ हे नाव असणे अशक्य नाही परंतु मुळात शेती म्हणावी अशी जमीनच येथे उपलब्ध नसल्याने तो शेतकरी असणे कितपत शक्य आहे याचाही विचार करावा लागतो. दुसरा असंही विचार करता येतो कि ‘खळा’ हा शब्द ‘खालची’ वा ‘खोलगट’ किंवा ग्रामीण भाषेत ‘खलाटी’ची जागा असंही होतो.. भायखळ्याची जमीन आजही समुद्रसपाटीपासून खालीच असल्याचे आजही आपल्या लक्षात येईल..’खलाटीची पाणथळ जागा’ हे कारण भायखळा या नावामागे असू शकते..हा अर्थही मला स्वीकारार्ह वाटतो..
नंतर विचार करताना त्याकाळच्या राज्यकर्त्यांच्या भाषेतील शब्दांचा विचार करावा लागतो.. ’भायखळ्या’चा विचार करताना या शब्दाच्या Byculla या शब्दाकडे माझे लक्ष गेले..या शब्दातला ‘Cull’ हा शब्द मला विशेष लक्ष देण्यासारखा वाटला कारण या शब्दाचा पोर्तुगीज अर्थ Refugo असा होतो व हा शब्द इंग्रजी rufuse याचा समानार्थी आहे..म्हणजे निरुपयोगी, फुकट गेलेली जागा असा होतो..मला ही व्युत्पत्ती जास्त पटते..!!
भायखळ्याचे जुन्या पुस्तकातील वर्णन नेमके असेच आहे.. भायखळा या नावाची व्युत्पत्ती ‘भायाचा खळा’ ही सर्वप्रथम रावबहादूर पी. बी. जोशी यांनी दिली असे डॉ. अरुण टिकेकर यांनी त्यांच्या ‘स्थल-काल’ या सन २००४ साली लिहिलेल्या मुंबईवरील ग्रंथात नोंदलेलं आहे. ‘Bombay Place– Names’ या १९१७ सालात ‘द टाईम्स प्रेस’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात रावबहादूर जोशींची ही व्युत्पत्ती दिलेली आहे..
मी या लेखात भायखळा नावाबाबत जो तर्क लावला आहे त्यास आधार नाही परंतु जो विचार आपल्यासमोर मांडला आहे त्याचा आपणही विचार करण्यास हरकत नाही..मुंबईचे नाव ‘मुंबादेवी’वरून आले असे म्हटले जात असले तरी तसे ते पडण्यामागे ते पोर्तुगीज भाषेतील ‘Bom a Baia’ हा ‘चांगली खाडी’ वा ‘Bombordo’ हा ‘बंदर’ या अर्थाचा शब्दही कारणीभूत असावा असे मला वाटते..हाच तर्क भायखळा नावामागे मी लावण्याचा प्रयत्न केला आहे..
— गणेश साळुंखे
९३२१८११०९१
मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा लेखमाला – लेखांक १६
संदर्भ – १. ‘मुंबईचे वर्णन’, ले. गोविन्द माडगावकर -१८६२
२. ‘मुंबईचा वृत्तांत’, ले. मोरो शिंगणे – १८९३
३. ‘स्थल-काल’, ले. अरुण टिकेकर -२००४
४. ‘Bombay Place– Names’, द टाईम्स प्रेस- १९१७
छान लेख आहे.. या लेखमालेतून मुंबईची चांगली माहिती मिळते आहे