१४ जानेवारी १८९६ रोजी महाड जवळच्या नाते या गावी ते जन्मले . अतिशय कुशाग्र बुद्धीच्या या महाराष्ट्र-पुत्राने १९१२ साली तत्कालीन Matriculation Examination मध्ये प्रथम येण्याचा विक्रम केला तेव्हा राम गणेश गडकरी यांनी त्यांचे कौतुक काव्य रचून केले होते . इंग्लंडला जाऊन त्यांनी आय .सी. एस . परीक्षा दिली आणि त्या परीक्षेतही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचे अभिनंदन करताना स्वतः लोकमान्य टिळकांनीच त्याना सरकारी सेवेत राहून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता . सी .डी. देशमुख यांना त्यांच्या उत्तम प्रशासकीय सेवेसासाठी इंग्लंडच्या राजाने ” सर ” हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला . रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली तो दिवस होता , ११ ऑगस्ट १९४३ . असा सन्मान मिळालेले ते पहिले भारतीय . सुमारे सात वर्षानंतर पंडित नेहरूंच्या आग्रहास्तव ते लोकसभेची पहिली निवडणूक लढले , जिंकले आणि त्यांनी केंद्र-शासनात अर्थ-खात्याचा भार स्वीकारला . संसदेत या देशाचे पहिले अंदाजपत्रक सादर करून त्यावर अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करणारे ते पहिले अर्थमंत्री ठरले . भारतीय नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते . जीवन-विमा कंपन्यांचे त्यांनीच राष्ट्रीकरण केले आणि त्यामुळेच एल.आय .सी .स्थापित झाली . १९५६ साली भाषावार प्रांतरचना होत असताना केवळ मुबई राज्याच्या बाबतीत केंद्र-सरकारने अपवाद करून , गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तिवात न आणता , एकाच मुंबई -राज्याला “द्वि – भाषिक (Bi-lingual State ) ” केलेले त्यांच्या तर्कसंगत आणि मराठी-अभिमानी वृतीला पटले नाही आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंडित नेहरूंना देऊन टाकला . नंतरच्या काळात ते UGC—University Grant Commission चे अध्यक्ष झाले. दिल्ली विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले. कलकत्त्यामधल्या , Indian Statistical Institute चे ते अध्यक्ष झाले . हैदराबाद येथील , Indian Institute of Public Adminisration चे प्रमुख-पद त्यांनी सांभाळले . National Book Trust चे सन्माननीय चेअरमन होते….त्यांची प्रथम पत्नी , रोझिना नावाची एक ब्रिटीश महिला होती .त्या दोघांना एक मुलगी झाली होती परंतु भारत स्वतंत्र झाल्यावर , अन्य ब्रिटीश लोकांप्रमाणे रोझिना मुलीला घेऊन इंग्लंडला कायमची निघून गेली . कालांतराने , नियोजन -मंडळावर पहिल्या महिला -सभासद म्हणून नियुक्त झालेल्या विदुषी आणि सामाजिक कार्यकर्त्या , आंध्र-प्रदेशातील काकीनाडा येथे जन्मलेल्या , तेलुगु -भाषक रेवती राव , यांच्याशी ते विवाहबद्ध झाले . त्याच दुर्गाबाई देशमुख झाल्या आणि पुढे ते दोघे हैदराबाद येथेच राहू लागले . १९७५ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या दोघा पती-पत्नींना एकाच वेळी , ” पद्म-विभूषण ” किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला . Orient Longmann सारख्या विख्यात प्रकाशकांनी त्यांचे आत्मचरित्र ” The Course of My Life ” १९७४ साली प्रसिद्ध केले . …………….अशा या असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तीला राष्ट्रपती-पद प्राप्त झाले असते तर तो त्यांच्या यशोमय जीवनाचा परमोच्च बिंदू ठरला असता ! १९६९ साली राष्ट्रपती-पदासाठी झालेल्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर हैदराबाद येथे आपले उर्वरित आयुष्य एकांतात व्यतीत करत असताना २ ऑक्टोबर १९८२ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले . त्यांच्या अंत्यविधीसमयी कुणीही महत्वाची –अतिमहत्वाची व्यक्ती उपस्थित नव्हती . असे असले तरी जन -हृदयात त्यांचे स्थान , एक आदर्श पुरुष म्हणून कायमचे राहणार आहे !
– समीर गुप्ते
Leave a Reply