प्रशासकीय सेवेचे ग्लॅमर आज दिसत असले तरी ‘क्राऊन ऑफ थॉर्न्स’ असे त्याला संबोधले जाते. कारण जबाबदाऱ्यांचे वाढते, बदलते ओझे आणि सातत्याने चांगले काम दाखवावे लागते. प्रशासकीय सेवेचे आकर्षण तरूणांना असते. पण, नेमके आणि अचूक मार्गदर्शन त्यांना मिळतेच असे नाही. युवकांना प्रशासकीय सेवेसंदर्भात अचूक मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. प्रशासकीय सेवेमध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही संस्था चालविण्यात येते.
प्रयत्नः विवेकः निश्चयः च एव यशोमंत्रः हे ब्रीद घेऊन १९८७ साली ठाण्यात चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे रोपटे लावले गेले. आज या संस्थेतून प्रशासकीय सेवेचा पाया घट्ट केलेल्या यशस्वितांची यादी पाहिल्यास वरील ब्रीद सार्थ ठरते. गेल्या २ तपांमध्ये या संस्थेने देशाला अनेक सक्षम अधिकारी दिले आहेत. देशातील केंद्रीय आणि राज्य सरकारी सेवांमध्ये विविध पदांवर हे अधिकारी आज कार्यरत आहेत. या संस्थेचे मार्गदर्शन मिळालेल्या यशस्वितांमध्ये मिलिंद म्हैसकर, श्रावण हर्डीकर, डॉ. अश्विनी जोशी, रवींद्र शिसवे, प्रशांत लोखंडे, नितीन जावळे अशा अनेक यशस्वी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ही एक शासनचलित प्रशिक्षण संस्था आहे. त्यामुळे इथे परिक्षांबाबतचे मार्गदर्शन आणि इतर सुविधा मोफत दिल्या जातात. विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया साधारण जून महिन्यात सुरू होते. दरवर्षी एक चाळणी परीक्षा आणि मुलाखत घेऊन त्यातून ५० विद्यार्थी प्रशिक्षणासाठी निवडले जातात.
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांची विचारशैली विकसित केली जाते. संस्थेने आयोजित केलेल्या नियमित तसेच तज्ज्ञांची व्याख्याने आणि त्यांच्याशी होणाऱ्या संवादामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांची विचार क्षमता आणि विश्लेषण क्षमता विकसित व्हावी, यासाठी तयार नोटस् देणे टाळले जाते. अर्थात मार्गदर्शन मिळाले तरी विद्यार्थ्याचा स्वयंअभ्यास आणि स्वआकलन महत्त्वाचे असते. पण, त्यासाठी अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र या प्रशिक्षण संस्थेमध्ये गिरवायला मिळतात.
अभ्यासात सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविधांगी वाचन. हा विचार करूनच संस्थेने ग्रंथालयाचे महत्त्व ओळखले आहे. संस्थेचे ग्रंथालय ३००० पेक्षा अधिक पुस्तकांनी समृद्ध आहे. त्याशिवाय डझनभर वृत्तपत्रे आणि १० नियतकालिकेही विद्यार्थ्यांना वाचायला मिळतात. एकूणच स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था प्रशासकीय सेवेत करियर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी वरदान ठरली आहे.
— मराठीसृष्टी
Leave a Reply