|| हरि ॐ ||
आनंद, जल्लोष व उत्साहाने सण व उत्सवांना सुरुवात होईल. आपले सण व उत्सव मोठया आनंदाने आणि प्रेमाने साजरे केलेच पाहिजेत याबद्दल दुमत नाही. तरुणांत उत्साह आहे, पण त्याला शिस्तीची जोड कुठेतरी कमी पडते किंवा अतिउत्साहात तिचा विसर पडल्याचे
सतत जाणवते. सण व उत्सवाचे पावित्र्य, महात्म्य, त्यामागील कार्यकारणभाव प्रकर्षाने व्यक्त होताना दिसतो परंतू त्याला स्पर्धात्मक, व्यापारी आणि राजकारणाची झालर असलयाचे जाणवते.
जुलै महिन्याचा २६ तारखेला गोपाल काला आहे. परंतू हल्ली दहीहंडीला स्पर्धेचे बाजारी स्वरूप आल्याचे दिसते. पैशाच्या आमिषापोटी उंचच उंच दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत, कधी कायमचे तर काही काळासाठी अपंगत्व येते याचाही विचार सर्वच दहीहंडी फोडणाऱ्या मंडळांनी करावा असे कळकळीचे व प्रेमाचे आवाहन आहे. अशाने आपण काय साधणार आहोत? उंचच उंच दहीहंडीवर सरकारने अपप्रवृत्ती व अपघातांचा विचार करून त्या संबंधात कडक कायदे करण्यापेक्षा आयोजकांनीच अपघातास कारण होतील एवढ्या उंचीवर हंडीच बंधू नये म्हणजे सर्व प्रश्न आपोआप सुटतील. आयोजकांनी दहीहंडीसाठी स्पॅान्सर किलेली काही रक्कम खाली दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामासाठी उपयोगात आणलयास पैश्याचा खऱ्या अर्थाने समाजाला न्याय मिळेल असे वाटते. उदा. :-
गावागावातील लोकांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी या बद्दल माहिती सांगणे, संगणकाचे शिक्षण देणे, डॉक्टरांनी मेडिकल कॅम्प घेणे, तसेच गावात रस्ता, छोटे बंधारे, तलाव, विहिरी बांधण्यास आर्थिक किंवा श्रमदानाने मदत करणे. गर्द व मद्याचे आरोग्यावर आणि संसारावर कसे अनिष्ट/अरिष्ठ परिणाम होतात ते पडवून देणे. रस्ते, रुग्णालये, समुद्र किनारे यांची साफसफाई करणे. स्वयंसेवी संस्थांच्या झाडे लावा, झाडे जगवा उपक्रमात तन-मन-धनाने भाग घेणे. अशा कित्येक कार्यक्रमात भाग घेऊन हे देशाचे तसेच उद्याचे आधारस्तंभ समाजात सतकृत्याने जनजागृती करून समाजाचे व मातृभूमीचे पांग फेडतील यात शंकाच नाही.
श्रीगणेश व नवरात्री उत्सवात मूर्तीच्या स्पर्धात्मक उंची तसेच सजावटीवर केला गेलेला खर्च, विविध उत्पादकांच्या जाहिराती, राजकीय व्यक्तीच्या हस्ते उत्सवाचे उदघाटन व त्याला मिळालेली प्रसिद्धी याला कुठेतरी सत्तास्पर्धेचे रूपं येत आहे. खर तर सजावटीमध्ये पी.ओ.पी. व थर्माकॉलचा वापर न करता इकोफ्रेंडली सजावट व मूर्ती पूजेत बसवून नवा आदर्श तरुणाई पुढे ठेवला पाहिजे.
गोल्बल वॉर्मिंगच्या नावाने फक्त बोंबाबोंब करायची व आपण त्याच्या उलट वाजायचे. जसे दिवाळीच्या दिवसात कानठळ्या बसणारे फटाके ज्याला कायद्याने बंदी आहे अशा निषिद्ध जागेत फोडायचे व आपणच आपले कौतुक करून घ्यायचे. ज्याने ध्वनी व वायू प्रदूषण होऊन रस्त्यावर कचरा होतो तसेच रंगांची उधळण न होता पैशांची राख होते हे कळण्या इतपत आपण सुजाण नक्की आहोत.
आपल्या सण व उत्सवातील संस्कृती, परंपरा, शिस्त व पद्धतींचे सर्व तरुणाईने अनुकरण करावे असा आदर्श असला पाहिजे. तरी वरील सर्व मुद्यांचा आयोजकांनी व तरुणांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या हुशार तरुणाईचा स्त्रोत आपल्या देशाच्या विधायक कार्यासाठी वळविता येईल का? याचा विचार व्हावा. <जगदीश पटवर्धन
<वझिरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply