कर्करोग हा साथीच्या रोगांसारखा किंवा सर्दी-पडशासारखा सर्वांना होणारा रोग नसल्याने तो क्वचितच एखाद्यास होतो; पण कधी कधी एखाद्या कुटुंबातील एकाच पिढीतील किंवा वेगवेगळ्या पिढीतील नातेवाईकांना कर्करोग झाला असल्याचे दिसून येते.
आई-वडिलांकडून मिळालेल्या जनुकांच्या वारशामुळे सिस्टीक फायब्रोसीस, सिकल सेल अॅनिमिया यासारखे रोग होतात. कर्करोग मात्र आनुवंशिक नसून, मुख्यत्वे माणसाच्या जीवनशैलीमुळे होतो, असे दिसून येते.
त्यामुळे प्रश्न पडतो, की एकाच कुटुंबातील व्यक्तींमध्ये आढळणारा कर्करोग त्यांच्या समान जीवनशैलीमुळे होतो, की त्याचा संबंध आनुवंशिकतेशी आहे. आतापर्यंतच्या वैज्ञानिक माहितीनुसार काही विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांचा संबंध आनुवंशिकतेशी म्हणजे पूर्वजांकडून मिळालेल्या दूषित जनुकांशी असतो हे सिद्ध झाले आहे.
याचे एक उदाहरण म्हणजे स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग हा रोग एखाद्या स्त्रीची आई, मावशी, आजी किंवा बहीण यांना झाला असल्यास या रोगाचा संबंध आनुवंशिकतेशी आहे हे स्पष्ट होते. अशा वेळी त्या महिलेने स्वतःची वैद्यकीय व जनुकीय चाचणी करणे अतिशय गरजेचे आहे. जगातील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण पाहिले तर त्यातील सुमारे ५ टक्के कर्करोग आनुवंशिकतेशी संबंधित असतात.
या तऱ्हेच्या स्तनाचा कर्करोग आईकडून लेकीला मिळालेल्या बीआरसीए १ व २ या जनुकातील उतपरिवर्तनामुळे होतो. आनुवंशिकतेने मिळालेल्या या बदललेल्या दूषित जनुकांमुळे अंडकोश या दोन्ही अवयवात एकाच महिलेस स्तन व कर्करोग होण्याचा धोका मोठा असतो. या उतपरिवर्तित जनुके असलेल्या स्त्रियांचे प्रमाण अतिशय कमी असले तरी त्यातील ८५ टक्के स्त्रियांना कर्करोग होतो ही गोष्टलक्षात ठेवण्याजोगी आहे. त्यानूसार काळजी घेणे आवश्यक आहे.
-डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply