कारगिल युद्धात देशासाठी शहीद होणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी हिमाचल प्रदेशातील पालमपुर येथे झाला.
विक्रम बत्रा यांनी त्यांचे शिक्षण चंदीगढमध्ये पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिट्री अकादमीमध्ये प्रवेश घेतला. लष्करात त्यांचा प्रवास लेफ्टनंट पदापासून सुरु झाला. हा प्रवास त्यांना कारगिल युद्धातील कॅप्टन पदापर्यंत घेऊन गेला. कारगिलच्या युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मिर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांचा १९९९च्या ऑगस्टमध्ये परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.
शहीद झालेल्या कॅप्टन बत्रा यांना हाँगकाँग येथे मर्चंट नेव्हीमध्ये उत्तम पगाराची नोकरी मिळत होती. मात्र ही संधी नाकारत त्यांनी भारतीय सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला होता.
युद्धाच्या दरम्यान कॅप्टन बत्रा शत्रूचा सामना करण्यासाठी स्वत:ला सज्ज करत होते. त्यावेळी बत्रा यांचे कमांडिंग ऑफीसर असलेल्या लेफ्टनंट कर्नल वाय.के.जोशी यांनी शेरशाह असे त्यांचे सांकेतिक नाव ठेवले. हे नाव पुढे पाकिस्ताननेही वापरण्यास सुरुवात केली. कॅप्टन बत्रा यांच्यासोबत युद्धभूमीवर असणाऱ्या जवानांच्या म्हणण्यानुसार, कॅप्टन बत्रा हे एक अतिशय उत्तम योद्धा होते. पॉईंट ५१४०, पॉईंट ४७५०, पॉईंट ४८७५ ही ठिकाणी शत्रूच्या तावडीतून काबीज करण्यात बत्रा यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आपली कामगिरी सिद्ध केल्यानंतर विक्रम बत्रा आणि त्यांचे सहकारी ये दिल मांगे मोअरचा गजर करायचे. त्यामुळे युद्धभूमीवर सगळीकडून हा एकच नारा ऐकू येत होता. ७ जुलै १९९९ रोजी पॉईंट ४८७५ याठिकाणी असलेल्या शत्रूच्या सैन्याला बत्रा यांनी ठार केले. मात्र त्याचवेळी भारतीय सेनेतील हा शूर योद्धाही शहीद झाला. ‘जय माता दी’ हे कॅप्टन बत्रा यांचे शेवटचे शब्द ठरले.
जनरल व्हीपी मलिक यांनी आपले पुस्तक ‘कारगिल: फ्रॉम सरप्राइज टू विक्ट्री मध्ये ‘कॅप्टन बत्रा यांच्या विषयी लिहिताना म्हणले आहे विक्रम ने हेड-टू-हेड फायटमध्ये चार पाकिस्तानी सैनिकाना ठार मारून पॉईंट 5140 वर कब्जा केला. यानंतर रेडिओ वर यह दिल मांगे मोर… हा कोड सांगितला. कारगिल येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. नुकताच प्रदर्शित झालेला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा ‘शेरशाह’हा चित्रपट कारगिल हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात सिद्धार्थसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात युद्धभूमीवर आपल्या अद्वितीय कामगिरीने शत्रूला गारद करणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या शौर्याची गाथा दाखवण्यात आली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply