विश्वात रासायनिकदृष्ट्या वैविध्य बाळगणारे विविध प्रकारचे तारे असतात. त्यापैकी ‘कार्बन तारे’ हा एक प्रकार आहे. हे तारे आपल्या आयुष्यातील अखेरच्या टप्प्यांत शिरल्यामुळे राक्षसी आकार प्राप्त झालेले तारे असून, त्यांचे तापमान दोन हजार ते पाच अंश सेल्सियसच्या दरम्यान असते. या ताऱ्यांच्या वातावरणात कार्बनच्या ‘काजळी’ चे प्रमाण जास्त असते. त्यांच्या वातावरणात कार्बन मोनॉक्साईडही आढळतो. या ताऱ्यांचा शोध पिएत्रो अँजेलो सेखी या इटालिअन वैज्ञानिकाने इ. स. १८६० साली वर्णपटशास्त्राच्या साहाय्याने लावला. विसाव्या शतकातील संशोधनातून अनेक कार्बन ताऱ्यांतील कार्बनचे मूळ हे त्या ताऱ्यांच्या गाभ्यात घडणाऱ्या अणुगर्भीय क्रियांत असल्याचे स्पष्ट झाले.
या क्रियांद्वारे हेलियमचे रुपांतर कार्बनमध्ये होत असताना, यातील काही कार्बन हा ताऱ्यांच्या पृष्ठभागाकडे सरकतो आणि ताऱ्यांच्या वातावरणात मिसळतो. काही कार्बन ताऱ्यांतील कार्बनची निर्मिती ही मात्र या ताऱ्यांच्या स्वतःच्या अंतर्भागात न होता ती दुसऱ्या ताऱ्यांच्या अंतर्भागात झालेली असते. अशा वेळी हे दोन्ही तारे एकाच जोडताऱ्याचे घटक तारे असतात. यातला कार्बनचा तारा हा लाल राक्षसी तारा असतो, तर दुसरा तारा हा श्वेतखुजा तारा असतो. या लाल राक्षसी ताऱ्याने आपल्या पूर्वायुष्यात (म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाचा तारा असताना आपल्या घटक ताऱ्याकडून खेचून घेतलेल्या पदार्थात कार्बनचे प्रमाण लक्षणीय असल्यास या लाल राक्षसी ताऱ्याला कार्बनच्या ताऱ्याचे गुणधर्म प्राप्त झालेले असतात.
अनेकदा जोडीदार ताऱ्याकडे, विविध केंद्रकीय क्रियांद्वारे निर्माण झालेली बेरियम, स्ट्रोन्शियम, झिरकोनियम यासारखी जास्त अणुभार असलेली मूलद्रव्ये विपुल प्रमाणात असतात. परिणामी असे पदार्थ खेचून घेणाऱ्या ताऱ्यांच्या वातावरणांतही या मूलद्रव्यांचे प्रमाण वाढलेले असते. आपल्या वातावरणात जड मूलद्रव्ये बाळगणाऱ्या या ताऱ्यांना ‘बेरियम तारे’ म्हणून संबोधलं जातं.
छोट्या दुर्बिणीतून दिसू शकतील असे तेजोमेघ, दीर्घिका आणि तारकागुच्छ कोणते?
छोटी दुर्बीण म्हणजे किती आकाराची याची वैज्ञानिक व्याख्या आजही खगोलशास्त्रज्ञांनी केलेली नाही. पण सोयीसाठी आठ इंच किंवा त्यापेक्षा कमी व्यासाची दुर्बीण आणि ५० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा कमी व्यासाची द्विनेत्री आपण ‘छोटी’ समजू. अशा दुर्बिणींतून आपण धूमकेतू, ग्रह आणि विविध प्रकारच्या ताऱ्यांचे निरीक्षण तर करू शकतोच; पण इतर नेक अवकाशस्थ वस्तू आपण न्याहाळू शकतो. यासाठी नवोदितांनी ‘मेसिए सूची’ अभ्यासावी. त्यातील बहुतेक सर्व घटक आपल्याला छोट्या दुर्बिणीतून पाहता येतात.
आकाशप्रेमींना मनस्वी प्रिय असलेला तेजोमेघ म्हणजे मेस्सिएच्या यादीतील ४२ क्रमांकाचा मृग तेजोमेघ (एम. ४२). दुर्बिणीतून तो निळसर– ढऱ्या रंगाचा दिसतो. याशिवाय अंगठीसारखा दिसणारा स्वरमंडल तारका समूहातला एम ५७ हा तेजोमेघ, धनू तारका समूहातला तीन भागांत विभागलेला एम २० हा तेजोमेघ, जंबूक तारका समूहातला डंबेलसारखा दिसणारा एम २७ हा तेजोमेघ, तसेच कर्क तारका समूहांतील एम १ हा खेकड्याच्या आकाराचा तेजोमेघ… हे सर्व तेजोमेघ छोट्या दुर्बिणीतून दिसू शकतात. या तेजोमेघांचे छायाचित्रण केल्यास त्यांचे नानाविध रंग दृष्टीस पडतात. अंतराळ फक्त काळे नसून कसे रंगीबेरंगी आहे हे तेव्हा समजते. तेजोमेघांव्यतिरिक्त अनेक दीर्घिका आपण छोट्या दुर्बिणीतून ‘अनुभवू’ शकतो.
देवयानी तारका समूहांतील एम ३१, त्रिकोण – तारका समूहांतील एम ३३, सप्तर्षीमधील एम ८१, एम ८२, एम १०१ यासारख्या अनेक दीर्घिका आपल्याला दिसू शकतात. याशिवाय आपल्या आकाशगंगेत आढळणाऱ्या तारका गुच्छांचेही छोट्या दुर्बिणीतून सहजपणे निरीक्षण करता येते. यात वृषभातील कृत्तिका, कर्केतील बीहाइव्ह, शौरीतील एम १३, व्याधाखालील एम ४१ यासारख्या अनेक खुल्या ‘तारका गुच्छांबरोबरच नरतुरंगातील ओमेगा सेण्टॉरीसारख्या बंदिस्त तारका गुच्छांचा समावेश होतो.
-पराग महाजनी
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply