वाणिज्य शाखेतील वैविध्यपूर्ण पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा आणि त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअर संधींचा वेध घेणं महत्वाचं असतं. जगात सर्वत्र आर्थिक घडामोडी मोठय़ा प्रमाणावर घडत असतात किंबहुना बहुतेक घडामोडींचं केंद्र हे अर्थकारणच असतं. त्यामुळे वाणिज्य क्षेत्राची निवड ही ह्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना व्यापार, व्यवसाय, बाजारातील चढउतार, अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, सरकारची वित्तीय धोरणे, औद्योगिक धोरण, शेअर मार्केट आदी बाबींचं ज्ञान प्राप्त होत जातं. बारावीनंतर विद्यार्थी बी.कॉम, त्यानंतर एम.कॉम करू शकतो. ह्या दरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचा वित्त, व्यवसाय, प्रशासन, लेखा, ई-कॉमर्स, विक्री, विपणन, वितरण आदी विषयांचा अभ्यास होत असतो. बारावीनंतर वित्त, विमा, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी, परदेशी व्यापार, स्टॉक ब्रोकिंग अॅण्ड इव्हेन्स्टमेंट अॅनॅलिस्ट यांसारखे अभ्यासक्रम निवडता येऊ शकतात.
अलीकडच्या काही वर्षांत बॅचलर इन अकाउंटन्सी अॅण्ड फायनान्स, बॅचलर इन बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स, बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स असे वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम काही संस्थांनी सुरू केले आहेत. बिझनेस इकॉनॉमिक्स, फायनान्स अॅण्ड कंट्रोल ह्या विषयातही पदव्युत्तर पदवी प्राप्त करता येऊ शकते. वाणिज्य शाखेत पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना अध्यापन, नागरी सेवा, उच्च शिक्षण, बँकिंग क्षेत्र, ब्रोकिंग, संशोधन, विमा क्षेत्र, वित्तीय संस्था, कॉस्ट अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटन्ट अशाही अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. बी.कॉम. आणि एमबीए अशा पदव्या प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेट्स ह्या ठिकाणी उत्तम संधी मिळू शकते.
जो विद्यार्थी संख्याशास्त्रावर प्रभुत्व मिळवू शकतो त्याला वित्तीय अभियांत्रिकी (फायनान्शिअल इंजिनीअिरग) ह्या उच्च श्रेणीच्या आणि आव्हानात्मक कार्य क्षेत्रात काम करण्याची देखील संधी मिळू शकते. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या घटकांमध्ये बँक डिपॉझिट्स, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट्स, व्हेंचर कॅपिटल, विमा, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ह्यामध्ये सातत्यानं नव्या बाबी घडत आहेत. त्याचाही लाभ वाणिज्य शाखेतील प्रशिक्षित उमेदवार घेऊ शकतात. जागतिकीकरणानंतर जगभरातील बँका आणि विमा कंपन्यांनी आपलं जाळे सर्वत्र पसरवण्यास सुरुवात केल्यामुळे ह्या कंपन्यांना तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासत असते. त्यामुळे वाणिज्य शाखेची पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांना करिअर घडवण्याचे नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत. एमबीए (फायनान्स) हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना अधिक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिक आणि व्यापारी उलाढालीचं उत्तम ज्ञान वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलं असल्यास त्यांना ई-कॉमर्स क्षेत्रातही चांगली कामगिरी करता येऊ शकते.
- जरा हटके करिअर पर्याय
वाणिज्य शाखेत बारावी पर्यंतचं अथवा पदवीचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना थोडा हटके विचार करून, काही प्रमाणात स्वतःच्या कल्पकतेला वाव मिळेल असं करिअर निवडता येऊ शकतं. त्यासाठी अनेकविध पर्याय सद्य:स्थितीत उपलब्ध आहेत जसे – फॅशन डिझायनिंग, टेक्सटाईल डिझायनिंग, इंटेरिअर डिझायनिंग, अनिमेशन आणि मल्टिमीडिया, ग्राफिक डिझाइन, वेब डिझाइन, अनिमेशन डिझाइन, लॉ आणि ह्यूमॅनिटीज, लॉ, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजि, सोशिऑलॉजी, हॉस्पिटॅलिटी आणि एव्हीएशन, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल आणि टुरिझम, मीडिया, जर्नालिझम, मास कम्युनिकेशन, मीडिया मॅनेजमेंट, फोटोग्राफी, अभिनय प्रशिक्षण, मॉडेलिंग, एअर होस्टेस, फाईन आर्ट, लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, फॉरेन लँग्वेज, शिक्षक प्रशिक्षण, लॉ कोर्स, रिटेल आणि फॅशन मर्चनडाईझ इत्यादी. विशेषतः ह्या अभ्यासक्रमाच्या यशस्वी पूर्ततेनंतर त्वरित व्यावसायिक संधी देखील उपलब्ध होत आहेत.
आज खरी गरज आहे योग्य करिअरच्या निवडीची. आवड आणि निवड यांचा करिअरच्या दृष्टीकोनातून खूपच जवळचा संबंध असतो. तरीही केवळ आवड आहे म्हणून करिअरची निवड करणं उपयोगी ठरतंच असं नाही. अनेकदा आवडतं करिअर निवडलं तरीही केवळ ते आपल्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतंय का ? हेही बघणं जरुरीचं असतं. करिअरची निवड करताना आपल्याला मिळणारा आंनद, समाधान आणि स्थैर्य महत्वाचं असतं.
— विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply