नवीन लेखन...

कॅरम बोर्ड

शकीरा च्या स्पॅनिश गाण्यांची एक डीवीडी आमच्या जहाजाच्या मेस रूम कम स्मोक रूम मध्ये होती. मेस रूम कम स्मोक रूम कारण बहुतेक जहाजांवर या दोन्ही रूम्स वेगवेगळ्या असतात. पण या जहाजावर मध्ये एक सोफा सेट करून पार्टिशन केले गेले होते. शकीराचे स्पॅनिश गाण्यांचे कलेक्शन असणारी डीवीडी तिच्या छोट्या मोठ्या कॉन्सर्ट चे रेकॉर्डींग पैकी होती. ती डीवीडी पहिल्यांदा लावल्यानंतर संध्याकाळी सहा साडे सहा वाजता जो कोणी डिनर साठी पोचायचा तो नियम असल्याप्रमाणे रोज रोज लावायला लागला. सात वाजेपर्यंत सगळे अधिकारी एका मागोमाग येऊन जेवणं आटोपत असायचे. जेवताना आणि जेवल्यावर तासभर सगळे जण गाणी बघत बसायचे. स्पॅनिश भाषा कोणाला समजत नव्हती पण संगीत ऐकायचे आणि ऐकता ऐकता चेस किंवा कॅरम खेळत बसायचे. त्या जहाजावर इंटरनेट किंवा मोबाइल फोन ची सुविधा अजिबात नव्हती. जवळपास आठ वर्षांपूर्वी व्हॉटसअप पण अस्तित्वात आले नव्हते. इंटरनेट आणि स्मार्ट फोन नसल्याने फेसबुक सुध्दा नव्हतं. त्यामुळे जहाजावरील अधिकारी एकमेकांशी सुद्धा सोशियली कनेक्टेड होते. घरी फोन करायचा तर सॅटेलाईट फोन हा एकच पर्याय होता. सात वाजल्यापासून आठ साडे आठ पर्यंत कॅप्टन, चीफ इंजिनियर, सेकंड मेट, थर्ड मेट, कॅडेट, ज्युनियर इंजिनियर, थर्ड आणि सेकंड इंजिनियर अशी सगळी गँग एकत्र बसून काही ना काही करत असायची. चौघे जण कॅरम तर दोघे तिघे चेस खेळत बसायचे. शकिराचे स्पॅनिश गाणी पंधरा सोळा दिवस नियमित पणे चालू होते. एका संध्याकाळी शकिराच्या गाण्यांच्या डीवीडी ऐवजी कर्णकर्कश अशा भोजपुरी गाण्यांची डीवीडी लावली गेली होती. जो जेवायला यायचा तो हा प्रकार बघून हसत सुटायचा. भोजपुरी गाणी त्यातील कर्कश पणा आणि व्हिडिओ चित्रण बघून सगळे जण पहिल्याच दिवशी वैतागले. कॅप्टन ने आल्या आल्या विचारले हे कोणी लावले आहे आज. थर्ड इंजिनियर ने सांगितले क्या हैं ना कप्तान साब स्पॅनिश के बजाय आज अपनी लेंगवेज सुनते हैं. थर्ड इंजिनियर हा मूळचा बिहारी आणि पन्नाशी ओलांडलेला होता. भारतीय नौदलातून रिटायर्ड झाल्यानंतर तो मर्चंट नेव्ही मध्ये जॉईन झाला होता. जेवण आटोपून होईपर्यंत कॅप्टन ने भोजपुरी गाण्यांचा अत्याचार सगळ्यांसह कसाबसा सहन केला. सगळ्यांची जेवणे आटोपल्यावर कॅरम बोर्ड मांडण्यात आला. कॅप्टन खेळायला बसता बसता कॅडेटला बोलला बेटा अब भोजपुरी डीवीडी निकाल दो बस हो गया आज के लिये. कॅडेट ने निमूटपणे डीवीडी काढली आणि शकिरा ची डीवीडी लावली. हा प्रकार बघून थर्ड इंजिनियर कोणाशी काही न बोलता केबिन मध्ये निघून गेला.
तासभर सगळे मस्तपैकी कॅरम खेळले आणि अर्धा तास गप्पा मारून आपापल्या केबिन मध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर चीफ ऑफिसरचे कपडे वॉशिंग मशीन मधून आदल्या रात्री नाहीसे झाल्याची चर्चा कानावर आली. जहाजावर कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी खास वेगळी अशी एक लॉन्ड्री आणि ड्रायर रूम असते. ज्यामध्ये वॉशिंग मशीन आणि स्टीम वर चालणारे हिटर असतात. त्या जहाजावर लॉन्ड्री रूम मेन डेकवर म्हणजे अकॉमोडेशन च्या सगळ्यात खालच्या मजल्यावर होती त्यामुळे कोणी एखाद्याने कपडे धुवायला टाकले की दुसरा येवून ते बाहेर काढून ठेवत असे मग ज्याचे कपडे असतील त्याचा तो येवून ड्रायर रूम मध्ये वाळत घालायला आठवण होईल किंवा वेळ मिळेल तसा येत असे. चीफ ऑफिसर कपडे मशिनला लावून गेला पण जेव्हा तो तासाभराने काढायला गेला तर त्याचे कपडे गायब. सुरवातीला त्याला वाटले कोणी मस्करी केली असेल म्हणून इकडे तिकडे शोधले पण कुठेच काही मिळाले नाही. दिवसभर मग संपूर्ण जहाजावर चीफ ऑफिसर आणि कोणा कोणाची बाचाबाची झाली किंवा भांडण झाले काय अशी चर्चा रंगू लागली. कोणी बोलायला लागले त्याचे कपडे पाण्यात फेकले असतील रात्रीच्या अंधारात. सगळे जण केबिन मध्ये असताना कोण कुठे काय करतय ते थोडी न कोणी बघायला असतो. चीफ ऑफिसर कपडे गेले तरी कोणावर चिडला नव्हता की त्याने कोणावर आळ घेतला नाही. सगळ्यांशी नेहमीप्रमाणे हसत आणि गमतीने बोलत होता. नेहमी प्रमाणे सगळे जण सात वाजता जेवले होते शकीराची डीवीडी पण चालू होती. कॅडेट सोफा सेट खाली ठेवलेला कॅरम बोर्ड काढायला वाकला पण त्याला तिथे कॅरम बोर्ड दिसला नाही. त्याने ज्युनियर इंजिनियर ला विचारले की काल रात्री कुठे ठेवला खेळून झाल्यावर तर ज्युनियर बोलला खालीच ठेवला आहे नेहमीच्या जागेवर. झाले सगळे जण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. आता कॅरम बोर्ड पण दर्या मध्ये आरीया म्हणजे फेकून दिला की काय कोणी. कॅप्टन चा चेहरा रागाने लाल झाला, सकाळी चीफ ऑफिसर चे कपडे आणि आता कॅरम बोर्ड गायब जहाजावर हा काय प्रकार चाललाय. कोणाला काही त्रास असेल तर सरळ सांगायचे तर हे काय नाही तेच प्रकार सुरू आहेत. कॅप्टन च्या मनात रागापेक्षा अपमान झाल्याची भावना जास्त निर्माण झाली की माझ्या जहाजावर अशा वस्तू फेकून दिल्या जात आहेत, हे कोण करतय, कधी करतय आणि का करतय हे सुध्दा कळावे नाही. अर्धा पाऊण तास सगळे खलाशी आणि अधिकारी कॅरम शोधून शेवटी कोणीतरी पाण्यातच फेकून दिला असेल या निर्णयाप्रत येवून पोचले. रात्री झोपायला जाताना प्रत्येकाच्या मनात जहाजावरील वातावरण बिघडत चालल्याचे विचार फिरायला लागले होते. अशा काही घटना घडायला लागल्या की सगळ्यांना एकमेकांबद्दल संशय यायला लागतो. माहोल खराब हैं चुपचाप काम करो असे बोलत प्रत्येक जण आप आपले काम करत असतो.

कपडे आणि कॅरम बोर्ड गायब झाल्यामुळे मग एक एक स्टोऱ्या ऐकायला मिळू लागल्या की एका जहाजावर दोघांचे एकाशी भांडण झाले होते मग त्या दोघांनी त्याला रात्री अंधारात डेकवर नेले तिथे त्याला एका पोत्यात भरले आणि पोत्याला दोरीने घट्ट बांधून समुद्रात ढकलून दिले. दुसऱ्या दिवशी ज्याला पोत्यात बांधून ढकलून दिले तो ड्युटीवर आला नाही म्हणून शोधाशोध करेपर्यंत त्याला जिथून ढकलले गेले असेल तिथून जहाज शेकडो मैल पुढे आलेले असते. जहाज समुद्रात जात असताना रात्री अॅकॉमोडेशन बाहेर संपूर्ण अंधार असतो प्रत्येक जण आप आपल्या केबिन मध्ये असतो बाहेर कोण काय करतो याचा कोणाला काही पत्ता नसतो. अकॉमोडेशन बाहेरील आवाज वॉटर टाइट डोअर मुळे ऐकू येत नाही. इंजिनची घरघर जसं जसं खालच्या मजल्यावर जाऊ तस तशी वाढत असते एवढाच आवाज.

जहाजावर भांडणं होतच असतात मारामारी हातापायी पण होत असते पण प्रमाण अत्यंत कमी असतं कारण कोणी कोणावर हात उचलला की पुढल्या पोर्ट मध्ये त्याचे तिकिट आलेले असते.

रात्रीच्या अंधारात खोल समुद्रात कोणी घरची व जवळच्यांची आठवण काढून रडत सुद्धा असतात, डोळ्यात पाणी जमा झाले की अश्रुचा एक एक थेंब समुद्राच्या खाऱ्या पाण्यात मिसळण्या अगोदरच जहाजाचा वेग आणि वाऱ्यामुळे सूक्ष्म तुषारांचे रूप घेऊन अदृश्य होत असतो.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर,
B.E.(mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..