सूर्यावर घडणार्या लहान-मोठ्या घटना पृथ्वीवर चुंबकीय वादळांसारखे परिणाम घडून आणतात. या घडामोडींचं स्वरूप विध्वंसात्मकही असू शकतं. या घडामोडींचं विश्लेषण अधिक तपशीलवार करता येण्यासाठी आपल्याकडे सूर्याचं त्रिमितीय चित्र असण्याची आवश्यकता आहे. एखादी सौरज्वाला उफाळली तर त्या सौरज्वालेचा विस्तार केवढा आहे, तिचा उफाळ किती व कोणत्या दिशेने आहे, सौरज्वालेतून किती प्रमाणात, कोणत्या दिशेने पदार्थ बाहेर उत्सर्जित केले गेले आहेत, ही सर्व माहिती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला अशा त्रिमितीय चित्रावरून मिळू शकते. पृथ्वीवरील दुर्बिणींतून, तसंच अंतराळातील सोहोसारख्या यानांकडून सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रं सतत टिपली जात असतात. […]