कन्फ्युज्ड माइण्डसेटमध्ये माणसं आपल्याला कोणतं बक्षीस लागलं बुवा, हे बघायला आणि चकटफू डिनर चाखायला सपत्नीक जातातही. आणि तिथेच फसतात. तिथे गेल्यावर तुमच्या बायकोच्या हातात येतो एखादा लेमनसेट. किंमत साधारण शंभर-सव्वाशे रुपये. हॉटेलचा पंचतारांकित भपका, बुफे जेवण याचा नाही म्हटलं तरी काही परिणाम तुमच्यावर होतोच. तुमच्या डोळ्यांमधले चंचल ससे मग एक डुलकी काढतात आणि आसपासची मार्केटिंग करणारी कासवं आपलं डोकं वर काढतात. एखादी तरुणी मधाळ आवाजात एखाद्या प्लॅण्टेशनची, रिसॉर्ट किंवा मोटेलची किंवा टाइम शेअरिंगची योजना तुमच्या गळी उतरवू लागते. तिला तुम्ही पटकन नाहीही म्हणू शकत नाही. किंवा नाही म्हणायला तुम्ही मध्यमवर्गीय सबबीने पटकन सांगता की मी आता चेकबुक आणलेलं नाही. इथेच तुम्ही अडकता. ती लगेच म्हणते ‘हरकत नाही, तुम्ही आता फॉर्म भरा. मी माझा एक माणूस तुमच्यासोबत घरी पाठवते. तुम्ही त्याच्यासोबत डाऊनपेमेण्टचा चेक द्या.’ एका लेमनसेट आणि बेचव जेवणाच्या बदल्यात तुम्ही लाख-सव्वालाखाच्या व्यवहारात अडकलेला असता. […]