शब्दांची पालखी – भाग तीन
मला पुढं ‘किशोर’ गवसला आणि वेड लावता झाला. २४ पानांची करमणूक आणि लोकसत्ता चांदोबामुळे मनाची घडवणूक नकळत सुरु असतानाच, बोरकरांच्या त्या अस्तावस्त घरात मला चांदोबाचं अधिक शहाणं भावंड म्हणता येईल असा ‘किशोर’ हाताशी लागला. ‘किशोर’ने माझ्या खांद्यावर मित्रासारखा हळूच हात टाकून, मला आजुबाजूला दिसू शकणाऱ्या माझ्याच जगातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ‘किशोर’मधल्या कथा माझ्याच वयाच्या मुलांच्या असायच्या. कथेतल्या मुलांचं वय साधारण माझ्याइतकंच असल्याने त्या कथा मनाला भावायच्याही.. चांदोबापेक्षा किशोरचं आकारासहीत असलेलं हे वेगळं जग मला आवडत होतं. […]