जातिभेदाला पहिली थप्पड
जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. […]