चिकमावगा (ॲम्ब्रोज बिअर्स याची एक कथा)
तरूण असतांना त्याचा बाप सैनिक म्हणून पाशवी जमातींशी लढला होता व त्याने देशाचा झेंडा दूरवर फडकवला होता. मळ्यावरच्या शांत जीवनांतही त्याच्यातल्या सैनिकाची धग जिवंत होती कारण एकदा पेटलेला तो अंगार कधीच विझत नाही. त्याला युध्दाची चित्रे असलेली पुस्तक आवडत आणि ती पाहून मुलालाही इतकी समज आली होती की त्याने लाकडी फळीची तलवार केली होती; अर्थात वडिलांना कदाचित ती तलवार वाटली नसती. आता तो मुलगा त्याच्या शूर जमातीला शोभेशा धीटाईने ती तलवार हातात धरून थांबत, हवेत फिरवत, पवित्रे घेत चालला होता. त्याला सहजतेने ह्या अदृश्य शत्रुंवर विजय मिळत होता. त्यामुळे त्याने शत्रुचा पाठलाग करत पुढे पुढेच जात रहाण्याची, सर्व सेनांनीकडून नेहमीच घडणारी, चूक केली आणि तो एका उथळ ओढ्याच्या कांठावर येऊन पोहोचला; त्याच्या कल्पित शत्रुने तो ओढा सहज वाऱ्याच्या गतीने पार केला होता. समुद्र पार करणाऱ्या त्याच्या जमातीची विजिगीषु वृती त्याच्याही लहानशा हृदयात धडधडत होती. त्याने त्यात मोठे दगड वगैरे शोधून काढून त्यांच्या आधाराने धडपडत तो ओढा ओलांडला व परत शत्रुचा पाठलाग सुरू केला. […]