भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी भरलेला आहे. कायदेभंगाची चळवळ, अहिंसक सत्याग्रह, शत्रूला हिंसक मार्गाने संपवण्याची क्रांतिकारक चळवळ असे सारे प्रकार या स्वातंत्र्यलढ्यात अंगीकारण्यात आले. हा सगळा इतिहास आज उपलब्ध आहे तो निरनिराळ्या स्वरूपातील पुराव्यांच्या रूपाने. ‘चलेजाव’ची १९४२ सालातली चळवळ. हा स्वातंत्र्यचळवळीतील आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनापेक्षा १९४२ ची चळवळ खूपच वेगळी होती. एकतर या चळवळीला एक असा नेता नव्हता, कारण गांधीजींपासून बहुतेक सारे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्यात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून उठले… योगोयोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्टला बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि पंधरा तारखेस स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्य चळवळीची आठवण जागवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे ठरेल.
[…]