अगदी छोट्या दुकानांपासून ते मोठ्या मॉलपर्यंत सगळीकडेच ग्राहकांवर लक्ष ठेवण्यासाठी एक उपकरण लावलेले असते ते म्हणजे क्लोज सर्किट टीव्ही. त्याच्या मदतीने आतापर्यंत अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
किंबहुना रस्त्यांवरही महत्त्वाच्या ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावलेले असतात. टेहळणी हा सीसीटीव्हीचा एक प्रमुख उपयोग आहे. रस्त्यांवरील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठीही सीसीटीव्हीचा वापर करता येतो. एटीएम केंद्रातही असे कॅमेरे असतात. रेल्वे स्थानकांवरही अशा प्रकारचे क्लोज सर्किट टीव्ही हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, हे आपण मुंबई हल्ल्याच्या वेळी अनुभवले आहे.
१९४२ मध्ये जर्मन इंजिनीयर वॉल्टर ब्रच यांनी असा पहिला सीसीटीव्ही तयार केला. दुसऱ्या महायुद्धात रॉकेट स्टँडवर ठेवून त्याचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर सिमेन्स एजी यांनी या सीसीटीव्हीचे उत्पादन सुरू केले.
१९६० च्या मध्यावधीत या तंत्रज्ञानाचा उपयोग हा युरोपात सार्वजनिक ठिकाणी टेहळणीसाठी होऊ लागला. आज युरोपात असे ४२ लाख कॅमेरे असून त्यावर अर्थसंकल्पाच्या गुन्हे नियंत्रण तरतुदीतील दोन तृतीयांश पैसा खर्च केला जातो. अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यानंतर तेथेही त्यांचा वापर वाढला.
सीसीटीव्हीत पॅन, टिल्ट, झूम असे स्मार्ट कॅमेरे वापरले जातात व ते लक्ष्याच्या दृष्टिपथात असेपर्यंत माग काढतात म्हणजेच चित्रण करतात, हे चित्रण बघून गुन्हा कसा घडला, व्यक्ती कोण होती हे समजू शकते.
१९९० नंतर यात मोठा बदल झाला तो म्हणजे इन्फ्रारेड डायोडच्या वापरामुळे. डोळ्याला न दिसणारे किरण सोडले जातात, त्यामुळे असे कॅमेरे कुठेही लावणे शक्य झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आयपी कॅमेरा, नेटवर्किंग सीसीटीव्ही कॅमेरा, वायरलेस सिक्युरिटी कॅमेरा असे अनेक प्रकार आहेत. यात कॅमेऱ्याने केलेले व्हिडिओ व ऑडिओ चित्रण हे मॉनिटरकडे पाठवले जाते.
वायरचा वापर केलेले व रेडिओ ट्रान्समीटरचा वापर केलेले वायरलेस सीसीटीव्ही असे दोन प्रकार असतात. डिजिटल सीसीटीव्हीमध्ये मात्र इंटरनेट प्रोटोकॉल कॅमेऱ्याचा वापर केला जातो. त्यात ध्वनी व चित्र संदेशांचे रूपांतर पॅकेट्समध्ये करून ते इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित करता येते. यात एका शहरातून दुसऱ्या शहरात संदेश पाठवता येतो. वायरींचा वापर कमी होतो. प्रगत अशा सीसीटीव्हीमध्ये डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर वापरलेले असतात त्यामुळे त्याने टिपलेले फुटेज (चित्रफीत) अनेक वर्षे राहते.
Leave a Reply