बंकटमल नावाचे एक व्यापारी होते. चांगला व्यापार करून त्यांनी भरपूर धन मिळविले होते. इतके, की ही संपत्ती ठेवायची तरी कोठे या चिंतेने त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा असूनही त्यांना सुख म्हणजे काय? हेच माहीत नव्हते.
एकदा ते असेच संपत्तीची काळजी करत करत गावाबाहेर फिरायला गेले. सायंकाळ सरत आली होती. पाखरे आपल्या घरट्यात परतत होती. निसर्गामुळे वातावरण सुंदर बनले होते. रस्ताच्या एका कडेला असलेल्या शेतात एक शेतकरी अत्यंत आनंदाने व उत्साहाने गाणे गात आपले काम करत होता.
बंकटमल त्याच्या जवळून जाताना त्याने त्यांना पाहिले व गाणे थांबवून स्मितहास्य केले. ते पाहून बंकटमलही तेथे थांबले. त्यांना त्या शेतकऱ्याच्या आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते. ते त्या शेतकऱ्याला म्हणाले, ‘ आज तुम्ही भलत्याच खुशीत दिसता. काय कोठे जमिनीत पैशाचा हंडा सापडला की काय?’
त्यावर शेतकरी म्हणाला, ‘ ‘ छे छे, मी एक साधा शेतकरी आहे. दिवसभर शेतात राबतो. जी काही कमाई होते तिचे मी चार हिस्से करतो व माझी ती जबाबदारी आहे, असे समजून कर्तव्यपूर्तीच्या आनंदात समाधान मानतो.
त्यावर बंकटमल म्हणाले, की चार हिस्से म्हणजे? त्यावर शेतकरी म्हणाला, ”माझ्या आई-वडिलांनी मला वाढविले. मात्र आता ते थकले आहेत; त्यामुळे कमाईचा एक हिस्सा त्यांना देतो. दुसरा हिस्सा माझ्या लहान मुलाबाळांना देतो कारण त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझी आहे तर समाजाचे ऋण म्हणून तिसरा हिस्सा दानधर्मात खर्च करतो व चौथ्या हिश्श्यात मी माझे घर चालवितो. ”
बंकटमलला पैसा कसा खर्च करायचा व आनंद कसा मिळवायचा याचा वस्तुपाठच मिळाला होता. त्याप्रमाणे त्याने ‘सुखी’ होण्याचा निर्णय घेतला.
Leave a Reply