नवीन लेखन...

चाटा क्लास !!

उज्ज्चल राजकीय भविष्यासाठी एकच नाव 

दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट सूर्याजीराव रविसांडे, काका सरधोपटांची वाट पहात होते. सूर्याजीरावांचे मूळनाव ताकसांडे. ताकसांड्यांचे रविसांडे कसे झाले ह्याबद्दल, ताकसांडे ते रविसांडे या ताकसांडे घराण्याच्या इतिहास ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासूंनी तो ग्रंथ पहावा. (प्रकाशक रोजची पहाट प्रेस) तर सांगायचा मुद्दा आजच्या कथेचा आणि या इतिहासाचा काही संबंध नाही. परंतु वाचक जिज्ञासू असतात असे म्हणतात, म्हणून उल्लेख केला एवढेच. (टीप. या ग्रंथाच्या फारच थोड्या प्रती उपलब्ध आहेत त्यामुळे जिज्ञासूंनी आपली मागणी विनाविलंब नोंदवावी). आता मूळ कथेकडे वळूया.

वाचकहो, सूर्याजीराव काकांची चातकाप्रमाणे वाट पहात होते. हा चातक कसा असतो ते आम्हाला ठाऊक नाही पण तो चकोरीची वाट पहात असतो असे आम्ही बरेचवेळा वाचले आहे. आम्ही खूप वाचतो म्हणून लिहू शकतो. (नवोदित लेखकांनी नोंद घ्यावी). आता ही चकोरी कोण? काळी का गोरी तेही आम्हाला माहीत नाही परंतु सूर्याजीराव अगदी चातकाप्रमाणे काकांची वाट पहात होते हे खरे.

काका सरधोपट, रोजची पहाटचे प्रमुख वार्ताहर. वृद्ध आहेत. बटू मूर्ती, धोतर, सदरा, कोट, काडीचा चष्मा, टकलावर दोनचार केस, पायात कोल्हापुरी वहाणा, गळ्यात कागदपत्रांनी भरलेली शबनम, पांढऱ्या छपरी मिशा आणि पुढे आलेले दात अशी बावळी मूर्ती. काकांचा अवतार जरी असा बावळा होता तरी त्यांचे मुलाखत घेण्याचे कसब और होते. चारदोन प्रश्न विचारून मुख्य माहिती काढून घ्यायची आणि मग त्यात भरमसाठ मसाला भरून पानेच्या पाने भरून मुलाखत सजवणे यात त्यांचा हातखांड! एकेका दिवसात चारचार, पाचपाच मुलाखती पाडणे हा तर त्यांना अगदी पोरखेळ वाटायचा.

याच त्यांच्या कौशल्यावर सूर्याजीरावांनी आपली विशेषांक सम्राट म्हणून प्रतिमा तयार केली. ‘मुलाखत एक करीअर’ हा अभ्यासवर्ग काकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करावा असे सूर्याजीरावांच्या मनात होते, जोडधंदा म्हणून. अलीकडे हमखास यशाची खात्री देणाऱ्या अनेक प्रशिक्षणवर्गाचे, संस्थांचे पेव फुटले आहे. त्यातील प्रसिद्ध प्रशिक्षण संस्थांची माहिती घेऊन एक दणदणीत करिअर विशेषांक काढावा असे सूर्याजीरावांच्या मनात आले आणि आपली ही कल्पना त्यांनी काकांच्या कानावर घातली. काकांना सांगूनही बरेच दिवस झाले होते. अशा कामांची वाट लावण्यात (म्हणजे सुरळीतपणे) काका अत्यंत तत्पर असूनही हे काम अद्याप वाटेवरच का खोळंबले आहे याचे सूर्याजीरावांना कोडे पडले होते. तूर्तास ते रोजची पहाटसाठी रोजचे कोडे रचण्यात मशगूल होते. कोडे पुरे होत आले तरी काकांचा पत्ता नाही, त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. तेवढ्यात काका आले.

“या काका, केवढा हा उशीर?”

“साहेब आपल्याच करिअर विशेषांकासाठी प्रसिद्ध संस्थांच्या संचालकांच्या मुलाखतींसाठी त्यांची वेळ घेण्याच्याच कामात गुंतलो होतो.”

“अहो पण हे काम सांगूनही बरेच दिवस झाले, मग एवढा उशीर का झाला?

“साहेब, त्यापूर्वी आपल्या महिला विशेषांकासाठी महिला उद्योजिका, इंजिनिअर, मेकॅनिक, वैमानिक, टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा चालक, घरगुती उद्योजिका, गायिका, नट्या अशा अनेक महिलांच्या सतरा विशेषांकांची जबाबादारी आपण माझ्यावरच टाकली होती. ती नुकतीच तर संपविली ना? अहो या महिलांनी माझ्या मुलाखती घेण्याच्या कौशल्याचा अगदी अंत पाहिला. भीक नको पण महिला आवर असे म्हणण्याची पाळी आली शेवटी.”

“ठीक आहे, समजले. आता मात्र करिअर विशेषांकाच्या मागे ताबडतोब लागले पाहिजे. जागतिक करिअर दिन पुढच्याच महिन्यात येऊन ठेपला आहे. कोणाकोणाच्या मुलाखतीचे जमवलेत?”

“तूर्त फक्त एकाच संचालकांची वेळ मिळाली आहे.”

“काय? फक्त एकच?”

“साहेब हे एकटेच असले तरी त्यांच्याकडे एवढे सामान आहे की त्यातून एक चांगला शंभर पानी दणदणीत विशेषांक होईल.”

“सामान? म्हणजे काय फर्निचर बिर्निचरवाले आहेत की काय?”

“छे छे साहेब, अहो सामान म्हणजे तसले काही नाही. अहो प्रचलीत मराठीत आपण त्याला मटीरियल म्हणतो ना ते मटीरियल-माहिती.”

“ओ आय.सी. असे कोण आहेत हे महाशय?”

“साहेब, अलीकडे प्रत्येक मोठमोठ्या शहरातील चौकाचौकातून ज्यांच्या हमखास यशाची खात्री देणाऱ्या जाहिरातींचे मोठमोठे फलक दिसतात ना त्या ‘चाटा’ क्लासाचेसंचालक श्रीयुत चारूहास टाकसाळे उर्फ चाटा.”

“अहो पण त्यांच्या एकट्याच्या संस्थेसाठी शंभर पानी विशेषांक काढायचा?एवढे काय मटीरियल आहे त्यांच्याकडे?”

“साहेब, त्यांचे राजकारणात हमखास यश कसे मिळवावे? याच्या प्रशिक्षणाचे वर्ग आहेत. त्यांच्या वर्गातून यशस्वी झालेल्या आणि सध्या राजकारणात सक्रीय, यशस्वी झालेल्या राजकारण्यांच्या वाढदिवसांच्या जाहिरातींचीच पंचवीस पाने आहेत. त्या प्रत्येक पानानंतर त्या राजकारण्याची माहिती, शिक्षण, अभ्यासक्रम, श्रीयुत चाटा यांचे विविध पोझमधले फोटो, तेही हसतमुख, फेटेवाले, टोपीवाले, झुल्पिकार, गल मिशाल, तलवारकट, दाढीवाले असा भरगच्च मामला आहे. हे पहा काही नमुने.”

नमुने पाहून सूर्याजीराव आनंदाने गाऊ लागले. “छान छान छान! वा! वा! काका छान! चला, चांगला मिळालय बकरा, लागा आता कापायला, म्हणजे आपलं कामाला!” काकांनी जाहिरातींची पाने, फोटो, मजकूर सूर्याजीरावांकडे सोपवला आणि चाटांच्या क्लासकडे त्यांनी चटाचटा प्रस्थान ठेवले.

चाटांचे ऑफिस बोरिवली नॅशनल पार्कला लागूनच असलेल्या चारपाच एकराच्या निसर्गरम्य परिसरात होते. मुख्य इमारत आणि तिला चार फाटे होते. संपूर्ण इमारत आणि परिसर पंचतारांकित हॉटेलसारखा होता. काकांनी प्रशस्त आणि प्रचंड अशा स्वागतकक्षात प्रवेश केला. अभ्यागत मेजावर एक स्वागतसुंदरी बसली होती. तिने आपादमस्तक काकांचे निरीक्षण केले. भुवया वर केल्या, नाक उडवले आणि तिने विचारले, ‘येस? व्हाट कॅन आय डू फॉर यू?’

काकांनी आपले आय कार्ड दाखवले. तशी ती स्वागत सुंदरी चित्कारली,

“ओऽऽह! काका, काका सरधोपट ! वेलकम वेलकम!” तिचे फोन उचलून आत चाटा साहेबांशी संपर्क साधला.

“ओह! काका, आपण आत जा, साहेब आपलीच वाट पहात आहेत.” काका आत गेले. चाटांची खोली प्रशस्त आणि सुबक सजावटीची, वातानुकूलित होती. ‘चाटा’ साहेबांचा पोषाख मात्र फार साधा, खादीचा पांढरा झब्बा, जाकीट, धोतर, टोकदार गांधी टोपी, पायात वहाणा असा होता. व्यक्तिमत्त्व भारदस्त.

“या या काकासाहेब, दैनिक रोजची पहाटमध्ये आमच्या संस्थेची माहिती येणार ही चांगली गोष्ट आहे. बरं आपण काय घेणार? चहा, कॉफी, थंड पेय?”

“काहीही चालेल. मी आपला फार वेळ घेऊ इच्छित नाही. आपण सुरुवात करूया का?”

“हो अवश्य, विचारा.”

“साहेब, आपले नाव चारूहास टाकसाळे, मग चारूहास किंवा टाकसाळे असे नाव न ठेवता आपण हे ‘चाटा’ असे नाव का ठेवले? काही विशेष कारण?”

“हो आहे तर. काका, कोणत्याही करिअरची सुरुवात करताना त्याचे बाजारमूल्य वाढेल या दृष्टीने अगदी बारीकसारीक गोष्टीत लक्ष द्यावे लागते. मग नाव ही तर फार मोठी गोष्ट. आपल्याकडे ‘बाटा, टाटा’ ही नावे लोकांच्या तोंडात बसली आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या नावाच्या अद्याक्षरावरून हे ‘चाटा’ नाव निवडले. ‘बाटा, टाटा, चाटा!’ काय कसे वाटते?”

“वा, वा! चाटासाहेब, खरोखर चाटा नावानेच आपण फार योग्य सुरुवात केलीत. एखाद्या व्यवसायिकाप्रमाणेच आपण राजकारणाकडे पाहता वाटते?”

“हो, राजकारण हा आम्ही पूर्णवेळ व्यवसाय म्हणूनच पाहतो आणि त्याच उद्दिष्टाने हे प्रशिक्षण काढले आहे.’

“चाटासाहेब, राजकारण हे समाजसेवेचे मोठे साधन मानून त्यासाठी आयुष्य झोकून दिलेले मोठमोठे पुढारी आम्हाला ठाऊक आहेत. हा व्यवसाय न समजता हे त्यांनी व्रत म्हणून स्वीकारले असा इतिहास आहे. आपण या पवित्र व्रताकडे धंदा म्हणून कसे पाहता?”

“काका, धंदा हा शब्द आम्हाला मान्य नाही. आम्ही त्याऐवजी व्यवसाय हाच शब्द पसंत करतो. आता व्रत, ध्येय, समाजसेवा वगैरे म्हणाल तर हे सगळे आता कालबाह्य ठरले आहे. कोणतेही क्षेत्र मग ते शिक्षण, वैधक यासारखे तथाकथित पवित्र क्षेत्र सुद्धा आता लोक पैसा कमावण्याचे साधन मानू लागले आहेत. मग राजकारण्यांनी काय पाप केले आहे? लोकसेवेसाठी रात्रंदिवस मर मर मरायचे ते का? म्हणून त्यांनीही हळूहळू भत्ते, पगार, पेन्शन, सुविधा, वाहन, घर, दूरध्वनी, आरक्षण याची मागणी केली. हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागले की ही मागणी हा फक्त पॉकेटमनी आहे. या व्यवसायात प्रचंड पैसा आहे. ही गोष्ट लक्षात येऊन आम्ही हे प्रशिक्षण सुरू केले.”

“वा चाटासाहेब, हे खरोखरच अद्भूत वाटते. परंतु निवडणुकांतून यशस्वी होऊन समाजसेवेच्या मार्गाने राजकारणात प्रवेश करण्याची पद्धत असताना हे वर्ग कशाला? इथे शिकून राजकारणात कसा शिरकाव होतो? आपल्या वर्गातून प्रशिक्षण घेतलेली मंडळी काहीही समाजसेवेची पूर्वपीठिका नसताना आज राजकारणात यशस्वी झालेली दिसतात.

त्याचे रहस्य काय? झटपट समाजसेवा असे काही तंत्र आहे का?”

“काका, फार लांबलचक प्रश्न विचारला. आधुनिक राजकारणात समाजसेवा, ध्येय, साधी राहणी उच्च विचारसरणी असे विचार म्हणजे बुरसटलेले शेवाळ आहे. आता राजकारणात शिरकाव करण्यासाठी जी झुंबड उडते ती असल्या जुनाट विचारांनी नाही तर झटपट नगदनारायण प्रसन्न करून घेण्यासाठी. नगदनारायणामुळे जनता जनार्दनाला झुकवता येते हे आता लोकांना पटले आहे. या व्यवसायात प्रचंड पैसा आहे हे लक्षात आल्यामुळे या व्यवसायात चंचूप्रवेश व्हावा म्हणून प्रचंड धडपड करतात लोक. निवडणुका जिंकण्यासाठी लोकसेवा नाही तर प्रचंड पैसा लागतो आणि तो खर्च करून पुढे कसा वसूल करावयाचा तेही जनतेला खूश करून (मामा बनवून) हे तंत्र आत्मसात करावे लागते. त्यात आयुष्याची बहुमोल (कमाईची) वर्षे फुकट जातात. तसे होऊ नये आणि तरुण वयातच यशाचे शिखर गाठता यावे म्हणून आम्ही हे लोकसेवा व्रत घेतले आहे. त्यामुळे राजकारणात तरुण धडाडीचे नेतृत्व लवकर मिळावे हा आमचा हेतू आहे. त्सासाठी काही झटपट मार्ग आणि तत्त्वे आम्ही शिकवतो.”

“वा चाटासाहेब, ही समाजाची एक फार मोठी गरज आपण भागवीत आहात. बरं आता असं सांगा की हे पंचतारांकित संकुल आपण कसे उभारलेत? राजकारणात प्रत्यक्ष नोकऱ्या अशा नसतात, त्याही पाच पाच वर्षांनी जातात मग इथे येणारे प्रशिक्षणार्थी अगदी मोजकेच असणार. राज्यकर्ता पक्ष आणि विरोधी पक्ष धरून जेमतेम तीनचारशे जागा असतात. तर मग या संस्थेतून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी नंतर काय करतात? हा एवढा प्रचंड डोलारा आपण कसा सांभाळता?”

“काका, खरे आहे. प्रथम आम्ही फक्त पन्नास विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली. अल्पावधीतच त्या जागा आता पाचशेवर पोहोचल्या आहेत आणि लवकरच आम्ही पाच हजाराचा आकडा गाठणार आहोत.”

“काय सांगताय? पाच हजार? आणि तो कसा? इतक्या विद्यर्थ्यांना कुठे प्लेसमेंट देणार?”

“काका, त्यासाठी मी एक योजना तयार केली आहे. अगदी तळागाळापर्यंत पोहोचण्याची.”

“ती काय? काहीतरी अद्भुत असणार!”

“हो अगदी नावीन्यपूर्ण. आज एकच मुख्यमंत्री असतो. पन्नास खात्यांचे पन्नास मंत्री असतात. त्यांचे प्रत्येकी एकदोन स्वीय साहाय्यक असतात. या स्वीय सहाय्यक पदासाठीही मोठी झुंबड असते. ती कळीची जागा असते. तर या पॅटर्नमध्ये आम्ही मूलभूत सुधारणा सुचवून नवीन ‘चाटा पॅटर्न’ शासनाकडे सादर केला आहे. तो मंजूर झाला तर आणि होईलच याची आम्हाला शंभरटक्के खात्री आहे. मग राजकारणात सक्रीय पदांची संख्या तीन चारशेहून पाचच काय दहा हजारापर्यंत जाऊ शकेल!”

“काय सांगता? चाटासाहेब, ही जादू आपण कशी करणार?”

काका, राज्य पातळीवर एक मुख्यमंत्री आणि पन्नास खात्यांसाठी पन्नास मुख्यमंत्री, त्या प्रत्येकाला दोन दोन उप.मु.मंत्री शिवाय चार चार राज्यमंत्री आणि या प्रत्येकाला दोन स्वीय साहाय्यक. शिवाय त्यांच्या खात्याच्या कामासाठी तूर्त प्रत्येकास चारचार मंत्री असा प्रस्ताव आहे.”

“काय सांगता?”

“काका, मध्येच बोलू नका. माझी योजना तर नीट ऐकून घ्या.”

“सांगा, सांगा चाटासाहेब. मोठी क्रांतीच करणार आपण असे दिसते.”

“हो. तर हे झाले राज्य पातळीवर. आपल्याकडे गावपातळीवर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती आहेत. त्यांचे आधुनिकीकरण करून हाच पॅटर्न तिथेही लागू करायचा, प्रत्येक जिल्ह्याला पन्नास खाती, पन्नास मुख्यमंत्री वगैरे वगैरे. शिवाय ग्रामपंचायत पातळीवर मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्री असा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव ऐकून मुख्य सचिवांचे डोळे पांढरे झाले परंतु मुख्यमंत्र्यांचे मात्र आनंदाने चकाकू लागले. हा अत्यंत क्रांतिकारी प्रस्ताव आहे असे त्यांनी प्रशंसोद्रार काढले. येत्या अधिवेशनातच हा प्रस्ताव मंजूर होईल.”

“वा चाटासाहेब, खरेच असे म्हणतात ना की, यशस्वी माणूस काही वेगळे करतो असे नाही तर तो फक्त ते वेगळ्या पद्धतीने करतो, हे आपल्याकडे पाहून पटते.”

“होय काका, या प्रस्तावाच्या मंजूरीआधीच आमच्या संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून झुंबड उडाली आहे. पैशाचा ओघ तर प्रचंड चालू आहे. स्वीस बँकेने आमच्यासाठी खास वेगळा विभागच सुरू केला. हे मात्र आपल्यातुपल्यात हां, मुलाखतीत येऊ द्यायचं नाही.” “आपल्या यशस्विततेची गोम समजली. आता झटपट यशस्वी होण्यासाठी काय सूत्र किंवा सूत्रे आपण वापरता? अभ्यासक्रम काय आणि किती वर्षाचा असतो? प्रवेशासाठी पात्रता काय लागते?”

“काका, हा अभ्यासक्रम कोणत्याही विद्यालयाकडून किंवा शिक्षण खात्याकडून मान्यताप्राप्त नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी कोणाला प्रवेश द्यायचा ते संपूर्णपणे आमच्या अधिकारात आहे. प्रवेशासाठी प्रथम पसंती अर्थातच विद्यमान राज्यकर्त्यांची, मोठमोठ्या पुढाऱ्यांची मुले-मुली, नातलग यांना असते. कारण त्यांना प्रशिक्षणानंतर लगेच सक्रिय होणे सोपे असते शिवाय त्यानंतरही संस्थेला ‘आर्थिक मदत देण्याचे त्यांचेवर बंधन असते तेही ते नीटपणे निभावतात.”

“म्हणजे घराणेशाही का?”

“छे, छे. लोकशाहीत हा शब्द चूक आहे. शेवटी त्यांना लोकांनीच निवडायचे असते. लोकप्रतिनिधीच असतात ते! फक्त राजकारणात प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना भक्कम आधार असतो. थोडेफार प्रशिक्षण आमचे, बाकीचे बाळकडू त्यांच्या घरचे.”

“दुसरा निष्कर्ष किंवा पात्रता म्हणजे जात. जे जातीला घट्ट चिकटून राहतील, उठसूठ जात जात जप करतील किंवा करण्याची तयारी ठेवतील असे विद्यार्थी.”

“पण मग जातपात नष्ट कशी व्हायची?”

“काका ती नष्ट झाली तर कसे चालेल? एका फार मोठ्या वर्गाला आपण राजकारणाचा फायदा मिळविण्यापासून वंचित ठेवल्यासारखे नाही का होणार? आज या एकाच पात्रतेवर कितीतरी मागासलेल्यांना उच्च पदे मिळत आहेत. ती बंद करायची का? छे छे ते सामाजिक न्यायाच्या विरुद्ध आहे.”

“पण त्यामुळे समाज एकसंध न होता त्यात दुही निर्माण होणार नाही का?”

“काका अहो राजकारण हेच मुळी फोडा आणि झोडा आणि ओरपा या तत्त्वावर चालते, असे असताना आमल्याकडे हा आयताच पौराणिक वारसा आहे तो आपण जतन नको का करायला? या परिस्थितीकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून नको का पहायला?” “वा! चाटासाहेब आपले विचार महान आहेत.”

“आता ऐका तिसरे सूत्र. उच्चवर्गीय घराणे, पैसा, अशा पार्श्वभूमीचा विद्यार्थी. जो राजकारण प्रवेशासाठी थैलीचे तोंड मोकळे ठेवू शकतो. उदा. व्यापारी, उद्योगपती, कारखानदार (साखर), बडे शेतकरी, भांडवलदार, नट, नट्या, दलाल, ज्यांना पेट्या, खोकी यांची भाषा कळते आणि अंमलात आणता येते असे.”

“मग साध्या गरीब माणसाला काही वाव नाही असे समजायचे का?”

“छे, छे त्यांना पण प्रवेश आहेच पण त्यासाठी उपद्रव मूल्य हा चौथा निकष तपासावा लागतो.”

“तो कसा?”

“गरीब विद्यार्थी आहे. पण त्याच्यात उपद्रव क्षमता आहे म्हणजे तो साम दाम दंड भेद या मार्गाने जाण्यास कचरत नाही, एकदा या मार्गाने पैसा कमावल्यावर तो अक्कलहुशारीने खर्च करणे, गुंतवणे, एखाद्या व्यवसायात भागीदारी करून नवीन उद्योजक म्हणून कुत्र्याच्या छत्रीसारखे भराभर उगवणे; फोफावणे, आपले अनुयायी तयार करणे, वारा येईल तसे टोप्या फिरवणे या कलेत पारंगत असेल किंवा तशी लक्षणे ज्याच्यात दिसतात असे.”

“आता पाचवे सूत्र. तीन माकडे.”

‘तीन माकडे? ते काय?’

“काका, ती तीन प्रसिद्ध माकडे असतात ना? एक कानावर हात ठेवलेले, एक तोंडावर आणि एक डोळ्यावर तसे. ऐकायचे पण ऐकल्यासारखे दाखवायचे नाही, बोलायचे पण तोंड दाबून, पाहायचे पण पाहिले नाही असे दाखवायचे ही वृत्ती असणारा. असा एक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन आमच्या संस्थेतून बाहेर पडल्या पडल्या त्याच्या पक्षाच्या जमदग्नी वृद्ध पुढाऱ्यांशी जुळवून चक्क चार वर्षे मु.मंत्री राहिला होता. उच्चवर्गीय असून, बोला!”

“वा, वा! चाटासाहेब प्रवेशासाठी निकषांची पंचसूत्री तर अफलातूनच आहे. आता आपण प्रशिक्षण काय देता?”

“काका, ते आमच्या व्यवसायचे गुपित आहे. हा अभ्यासक्रम अत्यंत गुप्त असून त्याची माहिती देणे आमच्या व्यवसायावर विपरीत परिणाम करू शकेल. विपरीत म्हणजे कायद्याविरुद्ध नव्हे तर आमच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण करणारे होईल त्यामुळे ते आम्ही उघड करू शकत नाही. परंतु एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की आमच्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळविण्यासाठी श्रीमंतीच असावी ही अट नाही. म्हणतात ना ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. तसा गुंडा असलेला कोणीही आमच्या प्रशिक्षणास पात्र समजतो आम्ही.”

“चाटासाहेब, अहो गुंडा म्हणजे गुंड या अर्थाने काही ती म्हण नाही. गुंडा म्हणजे सर्वगुण संपन्न या अर्थाने आहे. अवगुणसंपन्न अर्थाने नव्हे !”

“काका मी कधी म्हणालो गुंड, मी गुंडाच म्हणालो. असे अनेक गुंडा आम्ही शिक्षण देऊन तयार करणार आहोत.’

“वा! वा! चाटासाहेब म्हणजे आपण प्रचलित लोकशाही गुंडळून नवीन गुंडालोकशाही निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहात. आपल्या गुंडा प्रशिक्षणास शुभेच्छा देऊन ही मुलाखत गुंडाळण्यापूर्वी एक प्रश्न आहे, विचारू?”

“हो विचारा की!

“चाटासाहेब, आपण आमच्या विशेषांकासाठी आपल्या संस्थेतील यशस्वी गुंडार्थी म्हणजे विद्यार्थी यांचे वाढदिवसांचे पानभर पंचवीस फोटो दिले आहेत पण ते सगळे एकाच दिवशी कसे छापणार?”

“काका ते फोटो आपण नीट पाहा त्यात तारीख नाही, फक्त वर्ष आहे. शिवाय येणारा प्रत्येक दिवस हा वाढदिवस नसतो का? गेलेला दिवस कधी पुन्हा येतो का? त्या अर्थाने सगळे दिवस हे वाढदिवसच असतात. नवीन जमान्यात प्रसिद्धीसाठी हा सोपा मार्ग  आहे. तरी तुम्हाला दिलेले फोटो फार थोडे आहेत. आम्ही आता पुढाऱ्यांची मुले, त्यांची नातवंडे, आईवडील, आजोबा-आजी, चुलते, पुतणे, मित्रमैत्रिणी अशा सगळ्यांच्याच वाढदिवसांचे फोटो लावण्याची पद्धत सुरू करणार आहोत. एकेकाचे कमीतकमी पन्नास तरी फोटो असतील. प्रत्येक चौकात वाढदिवसांच्या जाहिरातींचे एकावर एक चारचार-पाचपाच प्रचंड फोटो लावण्याचे प्रशिक्षण देणार आहोत. मुख्य चौकात चारही बाजूला चार मनोरे आणि त्यात उद्वाहनाची सोय म्हणजे प्रत्येक जाहिरात अगदी जवळ जाऊन पाहता येईल.”

“काय सांगता? चाटासाहेब, आपण या उद्योगात नुसतेच यशस्वी होणार नाही म्हणजे झालाच आहात पण भारतीय लोकशाहीचा झेंडा आपण त्रिखंडात जरूर फडकवाल अशी मला खात्री वाटले. धन्यवाद!”

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..