काहीजण माणसाच्या सहीवरुन, त्याचा स्वभाव ओळखतात तर काही जण चेहरा पाहून, स्वभाव ओळखतात.. आपण आता एकेकाच्या ‘चहा’वरुन स्वभाव ओळखायचा प्रयत्न करु..
चहाला सहसा कुणीही ‘नाही’ म्हणत नाही. म्हणतात ना, चहाची तशी काही ‘वेळ’ नसते.. तरीही वेळेला ‘चहा’ हा लागतोच!
‘चला आपण ‘चहा’ घेऊया..’ असं स्वतःहून म्हणणारे सर्वसमावेशक स्वभावाचे असतात. ते चहा तर देतातच, शिवाय चहाचे पैसे दुसऱ्या कुणी देण्याच्या आधीच हे देऊन मोकळे झालेले असतात..
‘चहा’ घ्यायचा का?’ असे विचारणारे ‘तळ्यात की मळ्यात?’ स्वभावाचे असतात. त्यांच्या बोलण्यात आग्रह नसतो. एक कर्तव्य म्हणून ते फक्त ‘ऑफर’ देण्याचं काम करतात.
चहाला प्रथमदर्शनी ‘नाही’ म्हणणारे परिस्थितीचा अंदाज घेऊन वागत असतात. त्यांना मनातून चहा घ्यायचा असतो, पण लगेच ‘हो’ म्हणायला ते सहसा धजवत नाहीत.
समोर आलेला चहा ‘भुरका’ मारुन आवाज काढत पिणारे, कोण काय म्हणेल याची तमा न बाळगणारे असतात.
हातात आलेला गरम चहा लगेच पिऊन टाकणारे, कोणताही निर्णय घाईने घेणारे असतात. ‘जो होगा, देखा जाएगा’ असा त्यांचा स्वभाव असतो.
याउलट चहाचा प्रत्येक घोट सावकाश घेणारे, ‘रसिक’ स्वभावाचे असतात. त्यांना कोणतीही गोष्ट शिस्तीत करण्याची सवय असते. त्यांनी घेतलेले निर्णय, सहसा चुकत नाहीत..
चहाचा ग्लास अथवा कप दोन्ही हाताने पूर्ण कव्हर करुन पिणारे, जवळच्या माणसांची काळजी घेणारे असतात. आजारी माणसांबद्दल त्यांना विशेष सहानुभूती असते..
चहा गार झाल्यावरच पिणारे, कामसू स्वभावाचे असतात. ते कामाला प्राधान्य देतात, चहा गार असो वा कोमट, त्यांना काहीही फरक पडत नाही..
विशिष्ट प्रकारच्याच चहाची अपेक्षा करणारे ‘खाईन तर तुपाशी’ स्वभावाचे असतात. तो जर हवा तसा मिळत नसेल तर, ते कधीही तडजोड करत नाहीत.. अशी माणसं फारशी कुणात मिसळत नाहीत.
विशिष्ट ठिकाणीच चहा पिणारे ‘आग्रही’ स्वभावाचे असतात. त्यांच्या मित्रांना ते शेवटपर्यंत साथ देतात. अशा स्वभावाची माणसं, फार दुर्मिळ असतात..
चहा पिता पिता एखादा किस्सा सांगणारे, ‘हॅप्पी गो लकी’ स्वभावाचे असतात. जणू काही त्यांना, आनंदी जीवनाची ‘गुरुकिल्ली’ मिळालेली असते…
चहाचा कप नेहमी विशिष्ट पद्धतीने धरुनच चहा पिणारे, ‘जिनियस’ असतात. एखाद्या विषयातील ते ‘तज्ञ’ असू शकतात.
सर्वांना चहा सांगून, स्वतः चहा न घेणारे उत्तम सल्लागार असतात. त्यांची कोणत्याही बिकट परिस्थितीवर मात करण्याची, नेहमीच तयारी असते..
काहींना ‘कोरा चहा’ किंवा ‘गवती चहा’च हवा असतो, अशी माणसं मितभाषी असतात. ते स्वतःहून कधीही जादा बोलत नाहीत..
ज्यांची चहा घेतल्याशिवाय ‘बॅटरी’ चार्ज होत नाही, अशी माणसं सेकंड ओपिनियन घेतल्याशिवाय कोणताही महत्त्वाचा निर्णय घेत नाहीत..
उभ्याने कधीही चहा न घेता निवांत बसूनच चहा पिणारे, भविष्यासाठी तरतूद करुन समाधानी जीवन जगणारे असतात.
काहीजण कपातील, ग्लासातील चहा न संपवता, थोडा तसाच ठेवणारे जागरूक स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात कायम शंकाकुशंका घोंघावत असतात..
कपातील चहा बशीत ओतून शांतपणे त्याचा घोट घेणारे आततायी स्वभावाचे नसतात, त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट, ही सारासार विचार करुनच केलेली असते.
कोणीही भेटला की, चहा देणारे ‘गावमित्र’ असतात. त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. जसं सुवासिनीचं ‘हळदीकुंकू’ कोणतीही स्त्री नाकारु शकत नाही, अगदी तसंच यांनी देऊ केलेला चहा नाकारला जात नाही, कारण त्यामागे ‘जिवाभावा’ची आपुलकी असते..
चहाची वेळ अजिबात न चुकवणारे व कोणी सोबतीला नसेल तर एकट्याने चहा पिणारे, जिद्दी स्वभावाचे असतात.
चहावाचून ज्यांचं अडत नाही, असे बेफिकीर स्वभावाचे असतात. त्यांना एखादी गोष्ट मिळत नसेल तर दुसरा पर्याय शोधण्याकडे त्यांचा कल असतो..
कपातला चहा संपेपर्यंत काहीही न बोलणारे चिडखोर स्वभावाचे असू शकतात.. त्यांना व्यत्यय खपत नाही..
चहासोबत बिस्कीट किंवा टोस्टची अपेक्षा करणारे, कुणाशीही जुळवून घेणाऱ्या ‘दिलदार’ स्वभावाचे असतात..
कोणत्याही प्रकारचा चहा न पिणारे, चहाची चवही माहित नसणारे चौकटबद्ध जीवन जगणारे असतात..
शेवटी ‘चहा’ हे पृथ्वीवरील ‘अमृत’ आहे! ते प्रमाणात घेणं कधीही उत्तम… त्याच्या अति सेवनाशिवायही तुम्हाला जगता यायला हवं आणि आपल्या मित्रांसाठी, त्यांच्यासोबत दोन घोट घेऊन आनंदीही रहाता यायला हवं…
© – सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-८-२१.
Leave a Reply