नवीन लेखन...

चहा घेणार का?

पुणेकरांवरती विनोद करताना त्यांच्या या प्रश्नाला सगळेच हसून दाद देतात. मात्र बुद्धीवादी पुणेकराचा हा प्रश्र्न एकशे एक टक्के बरोबरच आहे. म्हणजे या प्रश्नातून तो अनेक शक्यतांचं समाधान करुन घेतो. उदा. तुम्ही नुकताच चहा घेतलेला असेल तर तुम्हाला लगेचच दुसरा घेण्याची इच्छा नसू शकते, तुम्ही पित्ताच्या त्रासामुळे चहा सोडलेला असू शकतो, तुम्ही फक्त काॅफीच घेणारे असू शकता, तुम्ही फक्त दिवसातून एकदाच, सकाळी चहा घेणारे असू शकता, चहाची तुम्हाला अॅलर्जी असू शकते. चहा घेतल्यावर तुमची भूक मंदावते, इत्यादी… मग विचार करा..एवढ्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका होकारात किंवा नकारात मागणारा, पुणेकर नक्कीच हुशाऽर आहे!!

चहा हे असं पेय आहे, ज्याला सहसा कोणीही नकार देत नाही. फार तर ‘अर्धाच कप’ अशी विनंती होऊ शकते. कामाच्या निमित्ताने किंवा नातेवाईकांकडे गेल्यानंतर चहासाठी विचारलंच जातं. काही जण न विचारता चहाचा कप तत्परतेनं समोर हजर करतात.

चहाचा कप देण्याच्या देहबोलीतून तुम्हाला त्या व्यक्तीचे तुमच्याबद्दलचे मत कळते. चहाच्या आग्रहातून आपुलकी समजते. तुम्हाला घरातच चहाचा कप आदळून समोर ठेवला जात असेल तर स्पष्ट नाराजी समजावी. वरती ‘गिळा आणि निघा’ची फोडणी असेल तर तुमचं काही खरं नाही. तीच जर ‘मी काय म्हणते,..’ नं सुरुवात होत असेल तर पहिल्यांदा तुमचा खिसा सांभाळा.

तुम्ही एखाद्याकडे गेलात, दोन तास गप्पा झाल्या. मात्र त्याने तुम्हाला चहाबद्दल विचारलही नाही तर, त्याचा उल्लेख ‘साधं चहाचं पाणीही दिलं नाही’ असा हमखास होतो.

पूर्वी चहाचे ब्रॅण्ड फारच मोजके होते. लिप्टन, ब्रुक बाॅण्ड, टाटा, रुबी, इ. आता वाघ बकरी, सोसायटी, ताजमहल, परिवार, विक्रम, टायगर, इलायची चहा, मसाला चहा, इ. अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

प्रवासात एसटी जेवणासाठी थांबल्यावर काही तरी घ्यावं म्हणून कॅन्टीनमध्ये बेचव चहा घेतला जातो. पूर्वी पुणे मुंबई रेल्वे प्रवासात डब्यामध्ये बादलीत कपांची चळत ठेवून चहाची मोठी किटली सगळ्या डब्यातून ‘चाय चाय’ ओरडत फिरणारे दिसायचे. आता कागदी कपात चहाची पिशवी टाकून तो गरम दुधाट पाणी ओततो आणि हातात देतो. त्या पिशवीला कपात कितीही वेळा डुबवलं तरी चहा फिकाच लागतो.

व्यवसायाच्या निमित्ताने मला कित्येकांना भेटावे लागते. त्यामुळे अनेकदा चहाच्या तोंडी लागावं लागतं. संस्कृती प्रकाशनच्या माईंकडे गेलं की, आधी पाणी आणि नंतर चहाचा कप येतोच. गेल्या सतरा वर्षांत तिथं असंख्य वेळा मी चहा घेतलेला आहे. सुरुवातीला बाहेरुन चहा मागवला जात असे. नंतर चहाचं मशीन आणून चहा होऊ लागला. काही दिवसांनी आॅफिसच्या वरती चहा करण्याची व्यवस्था करुन मिनाज, परवीन किंवा राहुल चहा करुन आणत असे. नंतर कोरा चहाचा प्रकार सुरू झाला. लिंबू असेल तर ‘लेमन टी’ होत असे. कधी आॅफिसमध्ये चहा करणारं कोणी नसेल तर फ्लास्कमधून चहा आणून दिला जात असे. आताही मी कधी जातो तेव्हा चहाची ‘संस्कृती’ अजूनही जपलेली आढळून येते.

श्रीराम रानडे सरांच्या घरी गेल्यावर गप्पा होतातच. काकू थोड्याच वेळात बिस्कीटं व चहा घेऊन येतात. त्यांची मनी खुर्चीवर डोळे मिटून शांत पसरलेली असते. चहा झाल्यावर पुन्हा गप्पांचा फड उभा राहतो.

डीटीपी करणाऱ्या चेतना वडके मॅडमकडे गेल्यावर कामासंदर्भात बोलणी चालू असतानाच त्या चहा कधी तयार करतात तेच कळत नाही. थोड्याच वेळात मोठ्या पसरट कपामध्ये चहा हातात दिला जातो. मला त्या कपाचे डिझाईन फार आवडलेले असते. चहा संपेपर्यंत मी त्यांच्याकडील ग्रे रंगाच्या गुबगुबीत मांजराच्या अंगावरून हात फिरवत असतो.

थोडं भूतकाळात… लेखक, प्रकाशक रामचंद्र जोरवर हे आमचे खास मित्र आहेत. तीस वर्षांपूर्वी आम्ही बालाजी नगरला नुकतेच रहायला गेलेलो असताना, जोरवर सर एलोरा पॅलेस जवळील नानक निवासमध्ये रहात असत. आम्ही सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्याकडे झालेले काम घेऊन जात असू. त्यावेळी त्यांच्या कन्येची शाळेत जाण्याची गडबड चालू असे. वहिनी त्यातूनही वेळ काढून आम्हाला चहा आणून देत असत. आज त्यांची कन्या एलएलबी झालेली आहे.

दिवाळी अंकांच्या निमित्ताने आम्ही श्रीकृष्ण करमरकर यांचेकडे महिनाभर नेहमी जायचो. काम झालं की, स्वतः करमरकर आम्हाला चहा नव्हे तर ‘स्पेशल काॅफी’ करुन देत असत. सदानंद प्रकाशनचे सदानंद खाडिलकर सकाळी दहाच्या ठोक्याला वरुन आॅफिसमध्ये यायचे. येतानाच घरातून चहाचा फ्लास्क भरुन आणायचे. जे कोणी सकाळच्या वेळेत येतील, त्यांना चहा हमखास मिळायचा.

रमेश देशपांडे हे आमचे मित्र येरवड्यात गुंजन टाॅकीजसमोर रहायचे. त्यांच्याकडे रविवारी गेलं की, दूध आणून चहा मीच करायचो. चहा, बिस्कीटं आणि गप्पा मारत संध्याकाळ कधी व्हायची ते कळतही नसे. पुन्हा त्यांना एकटं सोडून आम्ही घरी परतायचो.

कोथरूडला कधी डहाणूकर काॅलनीत विनया (देसाई) ताईंकडे गेलं की, त्यांच्या हातचा आल्याचा चहा पिल्याशिवाय समाधान होत नाही. त्यांचं ऐकतच रहावं असं बोलणं ऐकत ऐकत तास कधी होऊन जातो, ते कळतही नाही.

चहा हे एकमेकांशी बोलण्याचं एक निमित्त आहे. मनातील काही गोष्टी सांगायच्या असतील, मन मोकळं करायचं असेल तर ‘चल चहा घेऊ’ म्हटलं जातं. कित्येकदा चहा गार होऊन जातो, पण बोलणं चालूच रहातं. चर्चा लांबली तर चहाचे ‘राऊंड’ वाढतात.

मला कपातूनच चहा घ्यायला आवडतो. कागदी कप किंवा प्लॅस्टीकचे लेचेपेचे कप नकोसे वाटतात. बोट घालून काचेच्या कपात चहा ओतणाऱ्याच्या कानाखाली आवाज काढावासा वाटतो. कधी हाॅटेलपेक्षा टपरीवरचा चहा सुखावून जातो. महागड्या हाॅटेलमधला चहा डायबेटिसवाल्याला दिल्यासारखा फुळकवणी असतो. शूटींगमध्ये संपूर्ण युनिटला तासातासाला चहाचा रतीब चालूच असतो.
कधीकधी सकाळी घेतलेला कपभर चहा आपल्याला दिवसभर ताजंतवानं ठेवतो. आज तर ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ आहे…

मग काय ‘चहा घेणार का?’

– सुरेश नावडकर १५-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..