तृतीया म्हणजेच तीज या दिवशी चैत्र गौरीची पुजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीला पाळण्यात म्हणजे झोक्यावर बसवून तिची पुजा अशी केली जाते. पूर्वी लाकडी चौकटीत मध्यभागी एक छोटासा झोपाळा आणि त्यात महादेवाचे पिंड कोरलेली असते. पाटावर बसवून तेल लावून गरम पाण्याने न्हाऊ घालून खणाची साडी नेसवली जाते. दोन्ही बाजुच्या कडेला पाच बांगड्या अडकवून. मंगळसुत्र एखाद्या दागिना घालून नथ अडकवून पाटावर बसवली जाते. मग यथासांग पुजा करुन गुळाची पोळी खीर असा नैवेद्य दाखवला जातो. समोरच्या बाजूला एका तांब्यात पाणी भरून ठेवले जाते. कैरीचे पन्हे आणि कैरीची डाळ हे वैशिष्ट्य असते.आज आमच्या घरी सून बाईंनी चैत्र गौरीची पुजा केली आहे.
या महिन्यात एखाद्या चांगला दिवस पाहून मोठे हळदीकुंकूचा कार्यक्रम ठेवला जातो. या दिवशी परत न्हाऊ घालून पण आरास करून हा दिवस साजरा केला जातो. पूर्वी घर मोठी असायची. म्हणून ओसरीवर घरातील सगळ्या लोखंडी पेट्या एका खाली एक पायऱ्या प्रमाणे रचून वरच्या बाजूला चैत्र गौरीला बसविली जाते. ती लहान दिसते म्हणून एका जाड बुडाच्या समयीला बांधून मग साडी नेसवली जाते. आणि खूप दागिने घालून चैत्र गौरी सजते. समोर दिवाळीचा फराळ ठेवलेला असतो. आणि संपूर्ण पायऱ्या खेळणी मांडून सुशोभित करण्यात येतात. ही खेळणी पण वेगळीच असायची आणि तीही फक्त याच दिवशी काढली जायची. फुलांच्या कुंड्या पायरीच्या बाजूला. मोठी संतरजी अंथरुन बाहेर सडा रांगोळी काढली जाते. मग बायका नटून थटून यायच्या घरातील लेकी सुना लगबगीने हळद कुंकू. पानसुपारी. चुरमुरे. अत्तर. गुलाब पाणी. हाताला चंदनाचा लेप. कैरीचे पन्हे. कैरीची डाळ. आणि शेवटी भिजवलेले हरबरे याची अगदी ओंजळ दोन वेळा भरुन ओटी भरली जाते. काकडीच्या फोडी. टरबुजाच्या फोडी पण देतात. घरातील बायका देखील नटूनथटून स्वागत करायच्या. खूप साड्या नसायच्या पण ज्या असतील त्या आनंदात नेसायच्या. ठराविक दागिने नथ घरात एक वेगळाच आनंद उत्साह असायचा. कालांतराने सजावटीचे रुप बदलून गेले. आता रहाणीमान. दागिने. कपडे. फराळाचे पदार्थ. आणि बायकांची संख्या कमी झाली आहे पण कैरीचे पन्हे व कैरीडाळ मात्र केली जाते. आणि आलेल्या बायकांना हळदीकुंकू आणि बाहेरचे पदार्थ मागवून म्हणजे समोसा. वडापाव असे काही तरी…
स्वरूप बदलले आहे तरीही संस्कार संस्कृती टिकवून ठेवली आहे हे फार महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षी व यंदाही कोरोना मुळे हे सगळं करता येत नाही पण घरातल्या घरात केले जात आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी पार्वतीला गौरी रुपात मनापासून प्रार्थना करुया की पुढच्या वर्षी अगदी मोठ्या धामधुमीत हा सण साजरा करण्यासाठी तिचा आशीर्वाद घेऊ या
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply