नवीन लेखन...

चैत्राची चाहूल (असाही एक वसंतोत्सव)

फार्मवर सकाळी साडेपाचलाच जाग येते. समोरच्या कर्नाळा किल्ल्याने अजून काळोखाचे पांघरूण ओढलेले असते. मिनिटा मिनिटाला आकाश बदलत असते. काळेपणाच्या जागी राखाडी रंग, त्यानंतर फिकट निळसर होऊन किल्ला “उभा” राहतो. बकुळीच्या समोर चाफ्यावर,पक्षांसाठी टांगलेल्या फिडरमधे ठेवण्यासाठी डाळिंबाचे दाणे घेऊन मी हातात टॉर्च घेऊन निघतो. त्यावेळी दार उघडताना जरासा आवाज झाला आणि लगेच, घराला लागून असलेल्या शेवग्याच्या झाडावरून बुलबुलच्या आवाजातील मंजुळ घुंगुर वाजला पहा. जणूकाही तो भाऊंबंदाना कळवतो ” या रे, आला आपला खुराक.” तात्काळ बागेतील इतर वृक्षांवरील बुलबुल जोड्या, भुर्रकन उडून फिडर जवळील आंब्यावर आणि प्राजक्तावर आल्यात आणि मी दूर जाण्याची वाट पहात आहेत.
इकडे आकाश तांबडे होऊ घातलेले आहे. पाणकावळे (Cormorants), बगळे, ( Egrets ), चित्र बलाक (Painted Stork) थव्याने पाणथळींकडे रवाना होत आहेत. कावळेही काव काव करत इकडून तिकडे ये जा करत आहेत किल्ल्याच्या वर आकाशात तुरळक ढगांच्या कडा काही क्षणांसाठी सोन्याच्या झाल्यात. त्यांच्या मधून,किल्ल्याच्या मागून कोणी मुद्दाम सोडल्या सारखे केशरी प्रकाशझोत सुटलेत. सूर्यनारायणाची पालखी जवळ आलेली आहे. चला, हीच वेळ आपण बाहेर पडण्याची.
मी हंटर शूज चढवून, हातात माझा Nikon D- 300, पाठीला फोल्डिंग स्टूलची पिशवी, पाण्याची बाटली आणि बांबूची काठी घेऊन बाहेर पडतोय. मोबाइल silent mode वर आणि हाताला घड्याळ लावायचे नाही, हा कटाक्ष. घड्याळ चमकते आणि पक्षी बिथरतात.
ती पहा बकुळीच्या पानांआडून खारुताई चिडून फिडर वरील बुलबुलकडे रागाने पहात ओरडत आहे. हा सगळे दाणे संपवतो की काय! ही तिला चिंता. परंतु फिडर पर्यंत जाऊन त्याला हाकलून देण्याचं तिला धैर्य नाही. वर पहा म्हणजे त्याचे कारण समजेल. हरळ (Yellow Footed Green Pigeon) पक्ष्यांच्या मोठ्या थव्यावर हवेतल्या हवेत झडप घालून आपली सकाळची सोय करू पाहणारा एक गरूड आकाशात संथपणे गोल गोल फिरतोय.
आता बऱ्यापैकी उजेड झालाय. परंतु सूर्यदर्शन किल्ल्याच्या बेलाग कड्याने थोपवून धरले आहे. समोरच्या शेतामधील बांबूच्या बेटातील सर्वात उंच टोकावर बसलेला पांढऱ्या छातीचा खंड्या ( White Breasted Kingfisher) पहा. लांबलचक शीळ घालून, दिनक्रम सुरू होण्यापूर्वीच तो आपली हद्द जाहीर करतोय. त्या पहा आपल्या सुईसारख्या चोचीने फुलातील एकावेळी ठिपक्याएढीच मध पिणाऱ्या शिंजीर ( Sunbird ) च्या जोड्या शेवग्याच्या फुलांच्या झुबक्यांवर उतरून लगबगीने हळू आवाजात बोलत मधुप्राशन करत आहेत.
मी पडवीत अडकवलेल्या लाकडी खोक्यांमधे घरटी बांधून राहिलेल्या चिमण्यांची लगबग तर केव्हाच सुरू झाली आहे.
रुद्राक्ष वृक्षाच्या टोकावर पिसं साफ करत हळद्या ( Golden Oriole ) बसलाय पहा. झाडा जवळून आपण जात असताना त्याला चाहूल लागलीच. निघून गेला. परत येईल किंवा त्या वृक्षावर नेहेमी येणारी “शामा”( White Rumped Shama) तरी येईल या आशेने आपण बाजूला सुरंगीच्या दोन झाडांच्यामधे, वरती पहात स्तब्ध उभे राहू. सुरंगीच्या नुकत्याच उमललेल्या ताज्या फुलांचा गंध काय वर्णावा! तिथून हलावेसे वाटत नाही. पण निघुया आणि Viggors’s Sundird या अप्रतिम रंगसंगतीने नटलेल्या पक्षाचे दर्शन घेण्यासाठी, Powder Puff च्या झाडाच्या फुलांवर नजर ठेऊन कामिनीच्या झाडाखाली उभे राहू.” चक चक” असा त्याचा आवाज ऐकलात? आसपासच आहे तो! न हलता उभे राहू…. पहा, आलाच तो. किरमिजी रंगाची छाती आणि पिवळसर पोट. डोकं आणि मान चमकत्या निळ्या रंगाची. Humming Bird सारखा हवेतल्या हवेत पंख हलवत लांब अणकुचीदार चोचीने मध शोषणाऱ्या याच्या मादीचे रंग मात्र तितकेसे ठळक नसतात. त्याच्या दर्शनाने आणि कामिनीच्या फुलांच्या सुवासाने आपली सकाळ मात्र अधिक प्रसन्न झाली.
आपण रानसई धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने वर डोंगरात निघालोय. थोडासा चढ आहे. कोवळी उन्हे अजून पसरलेली नाहीत. खडीरस्त्यावरून झप झप पाऊले टाकता येत नाहीत. साधारण दीड पावणेदोन किलोमीटर अंतर चाललो की पुनः एक चढ आणि नंतर मग बरंचसं अंतर जवळ जवळ सपाटीवरचा रस्ता आहे.
इथे पोचल्यावर पहावे तर मात्र सर्व दिशांना कोवळ्या उन्हाने उजळून टाकलेले आहे. वाळलेले गवतही सोनेरी झालय. झुडूपांची हिरवट तपकिरी कोवळी पालवी नुसती चमकत आहे. आसमंत वेगवेगळ्या वनस्पतींच्या, फुलांच्या संमिश्र सुगंधाने भरून गेलाय.
सर्व दिशांना कमी अधिक अंतरावर पळस फुललेले दिसत आहेत. आपण एखाद्या झाडाच्या पूर्वेकडून झुडुपा आड बसून उन्हात असलेल्या फुलांवर आलेले पक्षी कॅमेराने टिपता येतील असे त्यातल्या त्यात कमी उंचीचे झाड निवडू आणि त्याकडे दबकत जाउ.फोटो काढताना त्यांच्या पिसांवर उन किंवा चांगला उजेड असला की फोटोत रंग छान चमकतात.
परंतु त्या उडुगणाना ” Bird’s eye view ” असल्याने आपण जवळ जाईपर्यंत तीन चार जोड्या उडाल्या पहा. उडताना डोकं खाली दाबून घेणारे पर्ण पक्षी (Leaf Bird), सुभग (Indian Iora), तांबट (Copper Smith Barbet), लालबुड्या बुलबुल (Red Vented Bulbul) सतत कलकलाट करणाऱ्या सातबाया (Jungle Babblers) होत्या त्या. काळया कोतवालाची जोडी (Black Drongo) मात्र झाडाचे पहारेकरी असल्यासारखी, झाडाच्या टोकावर बसूनच आहे. ढीम्म हललेली नाही. इतर पक्षांनी मध आणि मधावर आलेल्या कीटकांचा फडशा पाडला तर आपल्यासाठी काय शिल्लक राहील याचीच त्यांना फिकीर आहे.
आपण एखाद्या झुडुपाच्या आड सपाट दगड पाहून त्यावर बसुया. अगदी नसलेच तर आपले फोल्डिंगचे स्टूल काढू आणि मघाशी दूर गेलेले पक्षी परत येण्याची वाट पाहू.
सर्वसाधरणपणे जंगलात पिकनिकसाठी आलेली माणसे खाण्याच्या वस्तू आणतात आणि रिकामे डबे, पिशव्या तेथेच टाकतात हे माहीत झाल्यामुळे एखाद दोन कावळ्यांच्या जोड्या खरकट्याचा अंदाज घेण्यासाठी आपल्या आसपास येऊन बसतील. काव काव करतील आणि निघून जातील. आलेच पहा ते. हे कावळे असेपर्यंत इतर पक्षी जवळपास फिरकणार नाहीत. चला, बरं झालं कावळे निराश होऊन निघून गेले. आता आपण निश्चल बसायचं. पाणी पितानाही ते खाली दगडगोट्यांवर सांडणार नाही याची दक्षता घेऊ. ते वाळेपर्यंत ओला भाग चमकतो आणि पक्षी सावध होतात.
कोतवालाने पहा ओरडत हवेतच एक गिरकी मारली. कोणीतरी जवळ येत आहे. ती गिरकी म्हणजे जवळ येऊ पाहणाऱ्या पक्षांनी फुलांवर येऊ नये म्हणून त्यांना दिलेली warning च होती. शेजारच्या झाडावर पहा पळस मैना (Starling bird) जोडी आली आहे. अजिबात आवाज न करता ती पळसावर गेली. पण ती पलीकडच्या बाजूला असल्याने तिचा चांगला फोटो काढायला मिळणार नाही.
दबक्या आवाजात ओरडत इतर झाडांच्या खालच्या फांद्यांवरून उड्या मारत सातबायांचा (Jungle Babblers) घोळका आला पहा. यांचा आकार तुलनेने मोठा आणि डोळे सदा वटारलेले. कोतवालांचे यांच्यापुढे काही चालत नाही. त्यामुळे धीर येऊन चिमणी एवढा पिवळट पोपटी आणि पंखांवर पांढऱ्या रेषा असलेला सुभग (Indian Iora), चोचीच्या वर शेंदुराचा ठळक टिळा असलेला हिरवा तांबट (Copper Smith Barbet), तोंडावर राखाडी मास्क लावल्यासारखा गर्द हिरवा पर्णपक्षी (Leaf Bird) हे सगळे झाडावर आले आणि पटापट आपापले पुष्पगुच्छ निवडून वेळ न दवडता पोटभरीला लागले सुद्धा. कोतवाल पंख चोळत बसला. तो तरी किती जणांच्या मागे धावणार?
आता आपण फोटो काढू. ज्या पक्षाचा फोटो काढायचा त्याचे डोके, तो जेव्हा मध खाण्यासाठी किंवा फुलावरील किटक टिपण्यासाठी खाली वाकवतो त्याचवेळी आपण कॅमेरा डोळ्याशी घ्यायचा. तोही एकदम झटक्याने नाही.
स्थिर बसून हळू हळू पक्षावरची नजर ढळू न देता. त्या फुलावर आधीच कॅमेरा फोकस करून ठेवायचा आणि घास गिळण्यासाठी त्याने डोके उचलले की क्लिक करायचे. कॅमेरा झटक्यात खाली आणायचा नाही. त्याचा जोडीदार पक्षी झाडावरून उडाला की हाही त्याच्यामागे जाणारच. त्यामूळे, तिथेच फोकस करून तो उडायच्या तयारीत असतानाचा क्षण साधला तर आपल्याला पसरलेल्या पंखतील कमालीचे सुंदर रंग टिपता येतात. काढलेले फोटो कॅमेराच्या Display Screen वर पहायची घाई तर अजिबात करू नये. एकतर बॅटरी चा व्यय होतो किंवा तेवढ्यात अचानक लाभलेल्या आणखी एखाद्या सुंदर फोटोची आलेली संधीसुध्दा हातची जाते. आणि हो! Display वरचा फोटो आपल्या मनासारखा नाही असं झालं तर त्या खट्टू विचारात पुढच्या क्लिक मधील एकाग्रता ढळण्याचीही शक्यता असते.
पहा, एवढ्यात साडेआठ वाजले. उन्हाची किरणे दाहक होऊ लागली. पक्षांना ऊन सहन होत नाही. कणाकणाने खाणारे शिंजीर आणि कावळे सोडले तर इतर पक्षी फार तर साडेनऊ दहापर्यंत बाहेर असतात. मग झाडांच्या पानांच्या गर्द सावलीत जाउन बसतात. पुन्हा दुपारनंतर, उन्हं उतरायला लागली की यांचे उदरभरण सुरू.
अरे! पक्षांची किलबिल अचानक बंद झाली. आसपास गरुड (Eagle) किंवा शिक्रा (Sparrow Hawk) असे शिकारी पक्षी आल्याची चाहूल आहे ही.
आता परतीला लागूया. चालताना खाली आणि आकाशाकडे पहात चालायचे. तो पहा पोटावर ठिपके असलेला मातकट रंगाचा, डोक्यावर मागे झुकलेला तुरा असलेला सर्पभक्षी गरुड (Crested Serpent Eagle) जमिनीकडे नजर ठेऊन संथपणे गोल गोल चकरा मारतोय. त्याने खालच्या सपाट जमिनीवर गवतात एखाद्या सापाला हेरले असणार.
निसर्ग रचना अशी असते की डोंगरी सापांचा रंग एकतर गवतासारखा किंवा त्या तिथल्या मातीसारखा असतो. आकाशात गरुड पाहिला की साप गवतात बिलकुल हालचाल न करता पडून राहतो. गवतात हालचाल नसल्याने तो कुठे गायब झाला हे गरुडालाही पटकन समजून येत नाही. मात्र तळपत्या उन्हापुढे सापाचे काही चालत नाही. तो सावलीकडे किंवा एखाद्या कपारीत शिरायला सळसळत निघतो. मात्र, गरुड विजेच्या वेगाने खाली येऊन त्याला झपकन उचलून उंच नेतो. सापाचे वजन कमी नसते. त्यात गरुडनखे अंगात घुसलेली असताना, वेदनेमुळे आणि जीवाच्या आकांताने साप हवेतच प्रतिकार करतो. गरुडाने सापाला क्षणार्धात उचलताना अशा पद्धतीने पकडलेले असते की तो गरुडाला डंख करू शकत नाही. साप जास्तच वळवळ करू लागला तर कातळसदृश सपाट कठिण जागा पाहून गरुड उंचावरून सापाला त्यावर सोडून देतो. साप वरुन पडून आपटला की त्याचे उरलेसुरले बळही जाते. गरुड त्याला लगेच पुन्हा उचलून आरामात त्याच्या इष्ट भोजनस्थळी घेऊन जातो.
तो पहा लांब तिकडे निळ्या चमकत्या रंगाचे डोके, डोक्यावर तसाच तुरा, इतर अंग स्वच्छ पांढरे शुभ्र रंगाचे आणि बुलबुल च्या आकाराचा असूनही दोन पट्ट्यांची फुटभर लांब शेपटी आपल्या मागे हेलकावत डौलात उडत चाललेला ऐटबाज स्वर्गीय नर्तक (Asian Paradise Flycatcher).
आज दिवस छान गेला.चांगले पाच सहा प्रकारचे जंगलातील पक्षी जवळून पहायला मिळाले. वसंत दर्शनाबरोबरच डोंगरातील शुद्ध हवेत फिरून किती उत्साहित वाटते याचा अनुभव घेतला आपण.
वसंत ऋतूची हीच तर गंमत आहे. निसर्ग साद घालतो आणि बाहेरच्या पानगळी बरोबर आपला आळसही गळून जातो.
कोणत्याही झाडोऱ्यात फांदी हलली की स्थिर होऊन पहावे. कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे बागडणे अव्याहतपणे चालू असते. हीच माझ्या बागेभोवतीच्या चैत्रबनातून जाणवणारी चैत्राची चाहूल. हाच माझा वसंतोत्सव.
— अजित देशमुख.
9892944007

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..